Thursday, 21 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 21.09.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 21 September 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ सप्टेंबर  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत ४५४ मतांनी मंजूर

·      आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं आकर्षण असलेली डेक्कन ओडिसी रेल्वे नव्या रुपात धावण्यास सज्ज

·      बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई;दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

आणि

·      महालक्ष्मींच्या स्वागतासाठी गृहलक्ष्मींची लगबग;ग्राहकांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलल्या

सविस्तर बातम्या

महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत दोन तृतीयांश पेक्षा अधिक मतांनी मंजूर झालं. या विधेयकाच्या समर्थनात ४५४, तर एमआयएमच्या दोन्ही खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. नव्या संसद भवनात अद्याप मतदानाची डिजिटल यंत्रणा कार्यान्वित नसल्यानं पारंपरिक पद्धतीने कागदावर मतदान घेण्यात आलं. सर्व सदस्यांनी सायंकाळी कामकाजाची वेळ संपल्यानंतरही उशीरापर्यंत थांबून रात्री नऊ वाजेच्या सुमारास हे विधेयक बहुमतानं मंजूर केलं. संसदेच्या नवीन वास्तूत संमत झालेलं हे पहिलंच विधेयक आहे. राज्यसभेत हे विधेयक संमत झाल्यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर त्याचं नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने कायद्यात रुपांतर होईल.

काल सकाळी लोकसभेत या विधेयकावर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चर्चेला प्रारंभ केला. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केलं जाईल. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १८१ जागा महिलांसाठी राखीव असतील, आणि आरक्षणाची ही तरतूद १५ वर्षांसाठी असेल, यानंतर संसदेच्या परवानगीने त्यात वाढ करता येणार असल्याची माहिती मेघवाल यांनी दिली.

काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याची घोषणा करत, हे विधेयक तत्काळ अंमलात आणावं, मात्र यासोबतच जातनिहाय जनगणना करुन इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जातीच्या महिलांना संधी द्यावी, अशी मागणी गांधी यांनी केली.

द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी यांनी यावेळी बोलताना, या विधेयकाची १५ वर्षांची मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणासोबतच मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण तसंच धनगर आरक्षणाच्या मुद्यांकडेही सदनाचं लक्ष वेधलं.

भाजपचे निशिकांत दुबे, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या गीता वांगा, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंग, बीजू जनता दलाच्या राजश्री मलिक यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

****

राज्यसभेत काल चांद्रयान तीन मोहिम आणि आदित्य एल वन या सौर मोहिमेची प्रशंसा करत यामध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात आलं. या विषयावर लोकसभेत आज चर्चा होणार आहे.

****

संहिताबद्ध कायद्यापेक्षा मानवाधिकारांचं सर्वार्थाने पालन करणं, ही आंतरराष्ट्रीय समुदायाची नैतिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत आशिया प्रशांत मानवाधिकार मंचाच्या वार्षिक साधारण सभा आणि द्वैवार्षिक परिषदेचं, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. लोकसभेत काल संमत झालेलं महिला आरक्षण विधेयक हे स्त्री पुरुष समानतेसाठी महत्त्वपूर्ण क्रांती ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या दोन दिवसीय परिषदेत मानवी हक्काबद्दलच्या जाहीरनाम्याची ७५ वर्षे तर राष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि पॅरिस तत्त्वे यांची ३० वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे. यावेळी  पर्यावरण आणि हवामान बदल याविषयी चर्चा होणार आहे. 

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे कनेक्ट झाले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सीएमओ महाराष्ट्र या व्हॉटसॲप चॅनेलला प्रारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून मिळणार आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनेलला फॉलो केलं आहे.

****

दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अशी मागणी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ते काल सोलापूर इथं 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या कार्यक्रमात बोलत होते. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्र घरकुल योजना राबवण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलताना कडू यांनी, शेतकऱ्यांनी नेहमीच सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यापेक्षा, आपल्या पिकांचा उत्पादन खर्च कमी करावा असं आवाहन केलं. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचं ते म्हणाले.

****

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डेक्कन ओडिसी रेल्वे नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. आज दुपारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सेवेचा शुभारंभ होणार आहे. २००४ ते २०२० पर्यंत या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या रेल्वेच्या सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यांमधल्या पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई करत पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेवराई तालुक्यातल्या हिंगण गावात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत, सहा ट्रॅक्टर, सात केन्या, चार दुचाकी आणि २५० ते ३०० ब्रास वाळू साठा जप्त केला.

****

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात आज घरोघरी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होणार आहे. गौरींच्या स्वागतासाठी गृहलक्ष्मींची लगबग सुरू आहे. गौरींच्या स्थापनेसाठी आवश्यक पूजा साहित्य, मखर, कपडे, अलंकार तसंच अन्य खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. गौरी पूजनासाठी निरनिराळी फळं, भाज्या, तसंच फुलांच्या बाजारपेठाही सजल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध गुलमंडी परिसरात केवडा, कमळ आणि सोनचाफ्यासह, विविध प्रकारची फुलं आणि हारांच्या खरेदी विक्रीसाठी व्यावसायिक आणि ग्राहकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी होत असते.

दरम्यान, राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं. परवा घरोघरी स्थापन झालेल्या गणेशाचं भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन केलं.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात यंदा विद्यार्थ्यांनी झाडांच्या बिया असलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केल्या. कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या मूर्ती परिसरातले शेतकरी, शाळा, शासकीय कार्यालयांना मोफत भेट देण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....

Byte…

कळमनुरी तालुक्यातील दुर्गम भागातील कवडा , तेलंगवाडी , टव्हा, धावंडा , गोरलेगाव , निमटोकबिबथर आशा डोंगराळ भागातील 50 विद्यार्थ्यांनी  बाप्पांच्या मातीच्या  मूर्ती साकारल्या आहेत ‌.बाप्पांच्या विसर्जनानंतर यात ठेवलेल्या बिया पुन्हा उगवून झाडे तयार होतील. या उत्सवानंतरही झाड देणारे बाप्पा विद्यार्थ्यांच्या आणि भक्तगणांच्या लक्षात राहतील.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शाळांसाठी स्मार्ट गुरु ॲप कार्यान्वित केलं आहे. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या माध्यमातून ऑनलाईन हजेरी सोबतच, शाळांची सर्वंकष माहिती, शिक्षक प्रोफाइल, शाळांची प्रतवारी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती, शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधा आणि आवश्यक भौतिक सुविधांबाबत माहिती मिळणार आहे. या ॲपच्या प्रभावी वापरासाठी तसंच विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज लक्षात घेत, महापालिकेनं सावित्रीबाई शिक्षण नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संपूर्ण राज्यभरातला अशा प्रकाराचा हा पहिलाच नियंत्रण कक्ष आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नागापूर ग्रामपंचायतीने शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रमासह लोकसहभागातून गावाचा कायापालट केला आहे. नागापूरचा हा आदर्श इतर गावांनी घेण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत त्या नागापूर इथं स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करताना बोलत होत्या. नागापूरने राबवलेल्या उपक्रमांवर माहितीपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही करनवाल यांनी दिली.

****

लातूर शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या सुमारे नऊशे झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी पाणीसाठे झाकून ठेवावेत, अंगणात पाणी साचून राहू देऊ नये, घराची दारे तसंच खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात आणि ताप आल्यास, अंगावर न काढता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना महापालिकेनं केल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...