Saturday, 23 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 23.09.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचा विषय न्यायदानात येणारी आव्हानं हा आहे. बार काउंसिल ऑफ इंडिया पहिल्यांदाच या परिषदेचं आयोजन करत असून, न्यायप्रक्रियेचा कल, आंतरराष्ट्रीय याचिकांचं आव्हान, न्यायप्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण कायद्यांवर चर्चा होणार आहे.

****

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं २०१० मधे मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकात, इतर मागासवर्गीयांसाठी कोटा नव्हता, याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत काल ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर झाल्याचं त्यांनी स्वागत केलं. मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणी पूर्वी तसंच मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

भारतीय नौदल आणि भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांच्यात नवी दिल्ली इथं तांत्रिक सहयोग, तसंच संयुक्त संशोधन आणि विकासाबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित विविध शाखांमधल्या शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणं, संरक्षण क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाबाबत वैज्ञानिक समज वाढवणं आणि नवीन विकास उपक्रम हाती घेणं हे या सामंजस्य कराराचं उद्दिष्ट आहे.

****

पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे स्वत: शेतकऱ्यांच्या पुढाकारातून नोंदवण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज आणि उद्या विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती व्हावी, त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी ही मोहीम राबवत असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितलं.

****

No comments: