Tuesday, 23 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी

·      राज्यात १०८ रुग्णवाहिकांच्या संख्येत दुपटीनं वाढ करण्याचा शासनाचा निर्णय

·      मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात सर्वेक्षणाला प्रारंभ

आणि

·      ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातला ठराव शिवसेनेच्या नाशिक अधिवेशनात मंजूर

****

थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजी बोस यांना आदरांजली वाहिली. नेताजींच्या कार्याचं देश कायम स्मरण करेल, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी नवी दिल्लीत संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात नेताजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

पराक्रम दिवसाच्या औचित्यानं पराक्रम पर्व या नऊ दिवसांच्या उपक्रमाची आज संध्याकाळी पंतप्रधान सुरुवात करणार आहेत. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात हा उपक्रम होणार असून यात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेसंबंधी माहिती देणारे विविध कार्यक्रम तसंच छायाचित्रं आणि दस्तावेजांचं प्रदर्शन, यांचं आयोजन होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं आखण्यात आलेल्या भारत पर्व या नऊ दिवसांच्या उपक्रमाचंही पंतप्रधान आज उद्घाटन करणार आहेत. या पर्वात भारताचं समृद्ध वैविध्य दर्शवणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हे पर्व दिल्लीच्या रामलीला आणि माधवदास पार्क, या मैदानांवर आयोजित होत आहे. पराक्रम पर्व आणि भारत पर्व ही दोन्ही पर्वं येत्या एकतीस जानेवारीपर्यंत सुरू राहतील.

****

प्रजासत्ताकाचं पंचाहत्तरावं वर्ष साजरं करण्याचा एक भाग म्हणून 'आमचं संविधान-आमचा सन्मान' या देशव्यापी अभियानाला उद्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. आपल्या राष्ट्राला बांधून ठेवणारी सामायिक मूल्यं साजरी करणं आणि भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा ठाम पुनरुच्चार करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे.

****

शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमीट ठसा उमटवणारे बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीनं वाढणार असून, या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका आणि बोट अँब्युलन्सचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्यानं ३६ बोट अँब्युलन्स विविध अपघाती समुद्र किनारे आणि नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्यानं येणार आहेत. सध्या १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून, या पुढे अशा एक हजार सातशे छपन्न रुग्णवाहिका सेवा देणार आहेत.

****

मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. ३१ जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण ३६ जिल्हे, २७ महानगरपालिका आणि ७ कॅन्टॉन्मेंट बोर्डांमधे होणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कुणबी नोंदीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा आणि आंदोलन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -

मागासवर्ग आयोग 24 बाय 7 काम करतोय. आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही कायदा करायचा आहे, तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे. आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे, हे सरकार निर्णय घेणारं आहे. त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघाला आहे. या मोर्चेकऱ्यांची २५ जानेवारीच्या रात्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पंचवीस तारखेला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले पाचही बाजार बंद राहणार असून २६ जानेवारीलाही सार्वजनिक सुट्टी असल्यानं सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे.

दरम्यान, या मोर्चातल्या आंदोलकांच्या निवास आणि जेवणाचं नियोजन करण्यासाठी वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या मराठा मोर्चाच्या कार्यालयात वॉर रूम सुरू करण्यात आली असून, या वॉर रूम मधून नवी मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांच्या व्यवस्थेचं नियोजन केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणारे ठराव आज शिवसेनेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं, त्यात हे ठराव संमत करण्यात आले. यावेळी पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि भारत मातेच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह राज्यभरातले पदाधिकारी उपस्थित होते. दानवे यांनी यावेळी बोलताना सरकारकडून सर्व सामान्य शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू असल्याची टीका केली. नाशिक जिल्ह्यात कांद्याचं गेल्या काही दिवसांत प्रचंड नुकसान झालेले असले तरीही उत्पादकांना कसल्याही प्रकारचं शासनाकडून अनुदान मिळालं नसल्याचं दानवे यांनी नमूद केलं. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरही दानवे यांनी टीका केली.

****

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेसची जिल्हानिहाय आढावा बैठक पुण्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. कोल्हापूर इथल्या रेणुका सावंत आणि सतीश सावंत यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.

बाईट - रेणुका सावंत आणि सतीश सावंत, जि.कोल्हापूर

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला आजपासून सुरुवात झाली. अभ्यासक डॉ विजय कुमार वावळे यांनी 'द प्रॉब्लेस ऑफ द रूपी ग्रंथ आणि आजची प्रासंगिकता', या विषयावर भाष्य केलं. विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्र विषयावर अधिक संशोधन करावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीत नाव उलटून ६ महिला नदीपात्रात बुडाल्या. चामोर्शी तालुक्यात गणपूर जवळ आज सकाळी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह सापडले असून, अन्य महिलांचा शोध सुरू आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...