Wednesday, 20 March 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 March 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक२० मार्च २०२४ सायंकाळी .१०

****

·      लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी;१९ एप्रिल रोजी मतदान. 

·      देशातली सर्व प्राप्तिकर कार्यालयं २९ ते ३१ मार्च या सुटीच्या काळातही सुरु राहणार.

·      चवदार तळे सत्याग्रहाच्या ९७व्या वर्धापन दिनानिमित्त महाड इथं देशभरातून अुनयायी दाखल.

आणि

·      जागतिक चिमणी दिवस विविध उपक्रमांनी साजरा.

****

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर ही पाच मतदारसंघं आहेत. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या मतदार संघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

****

प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. आयोगानं काल यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. यापूर्वी अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारीच  पोस्टाद्वारे मतदान करू शकत होते. आता प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी आयोगातर्फे सुकाणू अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. 

****

सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा - २०२४पुढे ढकलण्यात आली आहे. २६ मे रोजी होणारी ही परीक्षा आता येत्या १६ जून रोजी होणार आहे.

****

देशातली सर्व प्राप्तिकर कार्यालयं येत्या २९, ३० आणि ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही सुरु राहतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज हे निर्देश जारी केले. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात १८ पूर्णांक ७४ शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२-२३ च्या तुलनेत यावर्षी थेट कर संकलन १८ लाख ७५ हजार कोटी रुपयांनी वाढून २२ लाख २७ हजार कोटी रुपये झालं आहे. अर्थमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

****

देशाच्या युवा शक्तीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे भारताची स्टार्टअप इकोसिस्टम वेगाने भरभराटीला येत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं, स्टार्ट अप महाकुंभ मेळाव्यात ते आज बोलत होते. या स्टार्ट अप महाकुंभाचा आज समारोप होत आहे. या मेळाव्यात आघाडीचे गुंतवणूकदार, नव प्रवर्तक, आणि महत्त्वाकांक्षी नव उद्योजकांनी लक्षणीय सहभागाचा विक्रम प्रस्थापित केला.

****

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी काल केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं हे खातं रिक्त झालं होतं.

****

राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहीरात करण्यासाठी, तसंच चित्रीकरण आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, राज्य पुरातत्व संचालनालयाची लेखी परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. संचालयालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी करुन ही माहिती दिली. अशी परवानगी न घेतल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिली आहे. एका शितपेयाच्या कंपनीनं विनापरवानगी आपली जाहीरात मुंबईत अशा स्मारकावर झळकावल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. 

****

अमरावती लोकसभा मतदार संघाची जागा भारतीय जनतमा पक्ष लढवेल, या मतदार संघातला जो कोणी उमेदवार असेल, तो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढेल, असं भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोला इथं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

****

वंचित बहुजन आघाडी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीत सहभागी व्हावं, अशीच आपली भूमिका असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून,  कोणाचीही आडमुठेपणाची भूमिका नाही, येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

****

निवडणूक आयोगानं भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. सौरव राव ठाण्याचे आणि कैलास शिंदे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका पूर्व उपनगरे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून डॉ. अमित सैनी यांनी तर प्रकल्प अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी आज पदभार स्वीकारला. सैनी हे भारतीय प्रशासन सेवेतल्या २००७ या वर्षीच्या तुकडीचे तर बांगर हे प्रशासन सेवेतल्या २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

****

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात आता प्राथमिक शिक्षणाच्या कार्यकक्षेत आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वी इयत्ता पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण मानलं जात होतं. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. प्राथमिक शाळांसाठीचे सर्व निकष आता इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळांना लागू केले जाणार असून, शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं योजना आखल्या जाणार आहेत.

****

चवदार तळे सत्याग्रहाच्या सत्याण्णवाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज रायगड जिल्ह्यात महाड इथं देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. आज सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रायगड पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महाड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यानिमित्तानं अभिवादन केलं आहे, 

****

आज जागतिक चिमणी दिवस पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणस्नेही संस्था संघटना तसंच निसर्ग मित्र मंडळांच्यावतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले. वाशिम जिल्हा हरित सेनेचे मुकुंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाखाळा परिसरातील विविध वृक्षांवर घरटे लावले तसंच पक्षांना दाणे आणि पाण्याची व्यवस्था केली. कामरगांव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी आणि जनजागृती फेरीच्या माध्यमातून चिमणी वाचवा असा संदेश दिला. नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर आणि आजुबाजुच्या परिसरात पक्षांसाठी दाणा आणि पाण्याची सोय करावी असं आवाहन सामाजिक वनीकरण विभाग आणि हरित सेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथले पक्षीमित्र निसर्ग अभ्यासक शिक्षक संजय गुरव यांनी सुरू केलेल्या चिऊताई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमणीचे घरटे वाटपाच्या उपक्रमात आज देशभरातील पक्षी प्रेमी सहभागी होत आहेत.

 

छत्रपती संभाजीनगर इथं एन्व्हार्यमेंटल एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीनं पर्यावरण संबंधी चाचण्या करणाऱ्या एक्झोथर्म प्रयोगशाळेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी घरटी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पक्षीमित्र डॉ दिलीप यार्दी, हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद देशपांडे एक्झोथर्म चे CEO संदीप कुलकर्णी, संदीप भाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

मौलाना आझाद शिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पक्षी शास्त्रासंबंधी केलेल्या विविध उपक्रमांबद्दल एन्व्हार्यमेंटल एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने पक्षीमित्र दिलीप यार्दी यांच्याहस्ते संबंधितांचा सत्कार करण्यात आला.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी पूर्ण झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर इथं २ ते १८ मार्च दरम्यान उपांत्य फेरी पार पडली. या अंतर्गत एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यपद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई इथं एप्रिल महिन्यात होणार आहे.

****

नांदेड इथल्या धारेगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संतोष केंद्रे यांना अखिल भारतीय बाल ई साहित्य स्पर्धेत 'ऑक्सिजन' या लघुपटासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर भोकर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मिलिंद जाधव यांच्या ऑडिओला ज्युरी ॲप्रिसिएशन हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.  मेघालयचे शिक्षण मंत्री पी.संगमा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. संतोष केंद्रे यांना यापूर्वी 'भूक' आणि 'बदल' या लघुपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

****

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली परिसरात आज सकाळी झालेल्या एका खासगी बसच्या अपघातात बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथल्या शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन ही बस रायगडच्या दिशेने निघाली होती. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचं खोपोली पोलिसांनी सांगितलं आहे.

****

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथं १० लाख रुपयांची रोख, तसंच सावंतवाडी इथं चार लाख २२ हजार ४५० रुपयांचा मद्यसाठा स्थायी सर्वेक्षण पथकानं जप्त केला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीनं सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ४९ तलवारी ९४ खंजीर, ७ गुप्ती, २ बिचवा असा, एक लाख तेवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

****

No comments: