Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. ४ पूर्णांक ५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी बसल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली. भूकंपाचा दुसरा धक्का ३ पूर्णांक ६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. हिंगोलीतील वसमत तालुक्यात कुरुंदा तसंच दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपांचा केंद्रबिंदू होता.
यासंदर्भात हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले…
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर जवळ असलेल्या रामेश्वर तांडा आणि जाम या परिसरात भूकंपाचे सौम्य झाटके जाणवले त्याचा रिस्टार स्केल वरचा स्केल 4.5 आणि 3.6एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचे झटके जाणवले त्यामुळे समाजामधल्या बाकी गावांमधल्या घाबरटीचा वातावरण निर्माण झालेलं होत. आणि मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी लोकांचा अवरणेस आपण केलेला होता आणि याहि निमित्ताने माझी या परिसरातील सर्वच गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे कि आपल्या घरावरील असलेले दगड काढून घ्यावे व कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता अश्या प्रकारचे धक्के येत असतील तर आपण मोकळ्या जागेत येऊन खाली बसून राहील पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची दुर्घटना आपल्याला होणार नाही.
दरम्यान, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही नागरिकांना सतर्र्कतेचे आवाहन केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातही धक्के जाणवले.
***
म्हैसूर येथील बीईएमएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या पंधराशे अश्वशक्तीच्या इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. ही कामगिरी देशाच्या संरक्षण क्षमतेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. यात संरक्षण तंत्रज्ञानातील तांत्रिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दिसून येते.
***
राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या मतदार नाव नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झाली आहे.आतापर्यंत ९ कोटी २० लाख ५५ हजार १९६ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असून यात ४ कोटी ७८ लाख ६२ हजार ३३७ इतके पुरूष आणि ४ कोटी ४१ लाख ८७ हजार ३०१ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या ५ हजार ५५८ इतकी आहे तसंच ५२ हजार ७६९ मतदार शंभर वर्षावरील आहेत. २३ जानेवारी २०२४ पर्यंत अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अद्ययावत मतदार याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं आयोगामार्फत कळवण्यात आलं आहे.
***
बीड उपविभागातील बीड तालुक्यात २०, गेवराई तालुक्यात २१ तर शिरूर तालुक्यात २ अशा तीन तालुक्यात ४३ गावात टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून प्रकल्पांमधला जलस्तर खालावत चालला आहे. बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर काही प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यात गेलं आहे. बहुतांश गावात पाणी टंचाई निर्माण झाली असल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
***
तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, महिला युवा खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं पुण्यात भारतीय लष्करानं आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी, म्हणजे लष्करी युवती क्रीडा कंपनी स्थापन केली आहे.
या कंपनीच्या पहिल्या प्रवेश रॅलीच्या उद्घाटनाच्या दिवशी, देशभरातील तब्बल ९८० मुलींनी निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला. १२ ते १६ या वयोगटातील मुलींच्या क्रीडाविषयक प्रशिक्षणाद्वारे निवड झालेल्या मुलींना त्यांचं कौशल्य दाखवण्याची तसंच देश आणि भारतीय लष्कराचा सन्मान वाढवण्याचीही संधी मिळेल.
***
नंदूरबार विसरवाडी रस्त्यावर विसरवाडी नजिक कुंभारपाडा फाट्याजवळ आज सकाळी दूध वाहतूक करणारा टेम्पो उलटून अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात टेम्पोतील दुधाचे कॅन खाली पडल्याने रस्त्यावर दुधाचा सडा पडल्याचे दिसून आले. या घटनेत हजारो लीटर दूध वाया गेले.
***
No comments:
Post a Comment