Saturday, 20 April 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर

·      निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी;लातूर इथं पाच अर्ज बाद

·      दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी प्रचार सभांना वेग;महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड तसंच परभणीत प्रचार सभा

आणि

·      शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

****

महायुतीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून पैठणचे विद्यमान आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं ट्वीटरवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिवसभरात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. किरण सखाराम बर्डे या अपक्ष उमेदवाराने आज दोन अर्ज दाखल केले तर हर्षवर्धन रायभान जाधव आणि देविदास रतन कसबे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. आज दिवसभरामध्ये दहा उमेदवारांच्या नावाने १४ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत ९५ उमेदवारांच्या नावानं १८५ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातून वितरित केले आहेत. तर एकूण ११ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.

****

जालना लोकसभेसाठी आज तिसऱ्या दिवशी एकूण ७ जणांनी १७ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. तर मागील तीन दिवसांत ६५ जणांनी १६३ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, आज कडुबा म्हातारबा इंगळे या अपक्ष उमेदवारानं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता उमेदवारांना येत्या २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली आहे.

****

बीड लोकसभा निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी दिनांक २० रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी २५ अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी ३९ उमेदवारांनी ९२ अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी ३० उमेदवारांनी ६८ अर्ज घेतले होते. तीन दिवसामध्ये एकूण ८० उमेदवारांनी १८५ अर्ज घेतले आहे. दरम्यान, भारतीय जवान किसान पार्टीकडून रामा खोटे या एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आतापर्यंत या मतदार संघात चार अर्ज दाखल झाले आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले, या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया आज घेण्यात आली. सोमवरी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात राज्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या अकरा मतदारसंघासाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.

 

लातूर इथं दाखल ५० अर्जांपैकी पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले, तर ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज वैध ठरले आहेत.

सातारा इथं २४ पैकी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात दाखल ४० उमेदवारी अर्जांपैकी २१ उमेदवारांचे २७ अर्ज वैध ठरले असून ७ उमेदवारांचे १३ अर्ज अवैध ठरले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी तसंच हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदार संघात आता प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मतदार संघांमध्ये प्रचारसभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्ध्यातल्या सभेनंतर आज नांदेड तसंच परभणी इथं प्रचार सभा घेतली. भारतातील मजबूत लोकशाहीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे, मतदान ही लोकशाहीतली सर्वात मोठी ताकद असल्यानं, या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी या सभांमधून केलं. काल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकडे काँग्रेसनं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर या सभांना उपस्थित होते.

नांदेड इथं महायुतीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली इथून बाबुराव कदम कोहळीकर, तर परभणीतून महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत.

****

ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच पंतप्रधान नरेंद मोदी सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर इथं आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप नेमका कशासाठी आणि कोणासाठी केला होता याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला पाहिजे, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी आज औरंगाबाद इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना इथले उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत.

****

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आज सकाळी बीड इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र, या निवडणुकीसाठी शिवसंग्रामची भूमिका आपण ठरवणार असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण शासकीय सेवेतून निवृत्ती घेतली, मात्र समाजहित सर्वात महत्त्वाचं असल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मतदारांनी भावनिक न होता, मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज कवठेमहांकाळ तालुक्याचा दौरा केला. तालुक्यातील लांडगेवाडी, शिरढोण, मळणगाव, जाय गव्हाण, बोरगाव, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी तसंच इतर कांही गावांमध्ये सभा तसंच बैठका घेतल्या. यावेळी भाजपासह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.

****

वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केलं आहे. त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. जो मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी बाहेर पडतो, तो मतदार लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला का बाहेर पडत नाहीं याचा विचार करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

धुळे इथं आज जिल्हा मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत जिजामाता ज्येष्ठ नागरिक संघ, तसंच सखी वन स्टॉप सेंटर आणि बार कौन्सिल या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मतदाराचं प्रबोधन करुन त्यांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं तसंच मतदान प्रतिज्ञाचंही वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेनंतरही कमी अधिक प्रमाणात हा पाऊस सुरू होता. या पावसामुळे लातूर शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

नांदेड शहर आणि परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रारंभी धुळीचे वादळ आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ७२९ हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झालं. ६४९ हेक्टरवरील आंबा, ७१ हेक्टरवरील कांदा आणि साडे आठ हेक्टर क्षेत्रातल्या भाजीपाल्याच्या पिकाचं नुकसान झाल्याचं, कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.

****

No comments: