Sunday, 21 April 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राज्यातल्या अकरा मतदारसंघांत ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध

·      देशात आता स्मार्ट खेड्यांची गरज - नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

·      पक्ष प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळणार नाही- उद्धव ठाकरे

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघाचं बंगळुरू संघासमोर २२३ धावांचं आव्हान

****

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे. या टप्प्यासाठी राज्यातल्या अकरा मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. अर्ज छाननीमध्ये रायगड लोकसभा मतदार संघात २१, बारामती- ४६, उस्मानाबाद- ३५, लातूर- ३१, सोलापूर- ३२, माढा इथं ३८ अर्ज वैध ठरले आहे. त्याच बरोबर सांगली इथं २५ अर्ज तर सातारा- २१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- ९, कोल्हापूर- २७ आणि हातकणंगले मतदारसंघात- ३२ अर्ज वैध ठरले असल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे.

****

देशात आता `स्मार्ट` शहरांची नव्हे तर `स्मार्ट` खेड्यांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांना आता अन्नदाता होण्यासोबत ऊर्जादाता, इंधनदाता बनवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. देशामध्ये इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉलचे पंप उघडण्यात आल्यास प्रदूषणापासून मुक्ती मिळेल आणि सोबत देशाचा इंधनावरचा खर्च कमी होईल, असं त्यांनी नमूद केलं. शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर व्हावा. मराठवाडा, विदर्भात कापूस, संत्रा, सोयाबीन या पीक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले जात असल्याचं गडकरी म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच खासदार अशोक चव्हाण यांनी मनोगतं व्यक्त केली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची देगलूर इथंही प्रचार सभा झाली त्यावेळी विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली असली तरी आपण प्रचारगीतातून हे शब्द वगळणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. यासाठीचा न्यायालयीन लढा आपण लढू, असंही ते मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. काही दिवसांपूर्वी आपण मशाल चिन्हासाठीचं प्रचारगीत बनवलं होतं. मध्यप्रदेश आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तर, सत्ता आल्यास सर्वांना मोफत अयोध्या दौरा घडवण्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. हे प्रकार धर्माच्या आधारावर मत मागण्याचा प्रचार नाही का, अशी विचारणा आपण निवडणूक आयोगाकडे केली होती, असं ठाकरे म्हणाले. त्याबाबतचं स्मरणपत्रही आपण पाठवलं होतं पण अद्याप निवडणूक आयोगानं यावर आपल्याला उत्तर दिलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं.

****

भारत आज पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि आपल्याला आता लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायचं असेल तर हे सरकार पुन्हा यायला हवं, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज बुलडाणा लोकभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल इथं सभा घेतली, त्यावेळी नड्डा बोलत होते. मजबूत आणि स्थिर सरकार होतं म्हणून आपण ३७० कलम हटवू शकलो, तीन तलाक रद्द करू शकलो. आता आपल्याला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवायचा असेल तर भाजप पुन्हा सत्तेत यायला हवं, असंही नड्डा यांनी यावेळी नमूद केलं.

****

जगातले प्रमुख उद्योगपती एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे कारण त्यांना आता देशात सरकार बदलणार असल्याचा अंदाज आला असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत या संदर्भातलं निवेदन केलं.

****

जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावीर जयंतीनिमित्त क्रांती चौक-पैठण गेटमार्गे गुलमंडी अशी मिरवणूक काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातही बोईसर, पालघर शहर तसंच सांगली शहरातही महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.

****

आज नागरी सेवा दिन आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाता संघानं निर्धारित २० षटकांत सहा बाद २२२ धावा केल्या. त्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३६ चेंडुंमध्ये ५० धावा तसंच फिलीप्स सॉल्टच्या १४ चेंडुंमध्ये ४८ धावांचा समावेश होता. आतापासून थोड्या वेळापुर्वी पर्यंत बंगळुरू संघानं तीन षटकांत एक बाद पस्तीस धावा केल्या आहेत.

आजचा दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.

****

नांदेडमध्ये आज नवमतदार आणि शाळकरी खेळाडुंनी मतदान जनजागृती ‍फेरी आणि उपक्रमामध्ये सहभाग घेतला. शहरातले मान्यवर, खेळाडू, शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी या फेरीमध्ये सहभागी झाले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते `मतदान करणारचं` या `सेल्फी पॉइंट`चं यावेळी उद्घाटन करण्यात आलं.

****

लातूर लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनातर्फे 'स्वीप' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूरच्या सायकल संघटनेतर्फे मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. 'सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' असा संदेश याद्वारे देण्यात आला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय इथं ही फेरी सुरू झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरुन पुन्हा कार्यालयात फेरीचा समारोप झाला.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या सेालापूर लेाकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी आर्जांच्या छानणी काल झाली. यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसंच सेालापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. माढा लोकसभेसाठीच्या चार उमेदवारांचे आठ तर, सोलापूर लोकसभेच्या नऊ उमेदवारांचे दहा उमेदवारी अर्जही अवैध ठरले. या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

****

बालसाहित्य लिहिणाऱ्यांनी नव्या पिढीच्या संकल्पना समजून घेण्याबाबत जागरुक राहायला हवं, अशी अपेक्षा नामवंत कवी प्रा. दासू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन काल पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथं झालं, त्यावेळी वैद्य बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी या संमेलनाचं उदघाटन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज दिवंगत संजय उबाळे अर्थात बुध्दप्रिय कबीर यांच्या ५५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावरचं `कॉम्रेड, जयभीम` या डॉ. श्यामल गरूड लिखित काव्यात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सुभाष लोमटे, प्रा.राम बाहेती, मंगला खिवंसरा, प्रा.दिलीप महालिंगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू वाल्मिक सरवदे यांनी यावेळी मनोगतं व्यक्त केली. बुद्ध लेणी परिसरातल्या विहारामध्ये झालेल्या या प्रकाशानाला दिवंगत बुद्धप्रिय कबीर यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी इथं उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत २१ लाख रुपये किंमतीपेक्षा अधिक रकमेचा बनावट, विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातली ही कारवाई असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

मुंबई-पुणे जलद महामार्गावर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण मोटार अपघातामध्ये एका पोलिस उप निरीक्षकचा मृत्यू झाला. सूरज चौगुले असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ते मुंबईच्या विक्रोळीमधील पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

****

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातल्या मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रीक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. पैकी आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ३७४ मेट्रीक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४५.४४ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे पर्यंत नाल्‍यातील गाळ काढण्‍याचं काम पूर्ण केलं जाईल, असंही मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

No comments: