Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२४
सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज प्रक्रियेला वेग;औरंगाबाद इथून महायुती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
· उस्मानाबाद इथून चार तर लातूर इथून तीन उमेदवारांचे अर्ज मागे
· गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल यांचा
बिनविरोध विजय
आणि
· १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याला कॅनडातल्या कँडीडेट बुद्धिबळ
स्पर्धेचं अजिंक्यपद
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज
दाखल करण्याला आता वेग आला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दिवसभरात
चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे
यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास
आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या
उपस्थितीत खैरे यांची प्रचार रॅली काढण्यात आली.
महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संदिपान भुमरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, आज १९
उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली असून आतापर्यंत ११४ उमेदवारांनी २१९ अर्जांची उचल
केली आहे.
बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी
अर्ज दाखल केला. दरम्यान, या मतदार संघात आज तीन वाजेपर्यंत १४
उमेदवारांनी २६ अर्जांची उचल केली आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आजही २२ जणांनी
२३ उमेदवारी अर्ज घेतले. आतापर्यंत ७७ जणांनी १८६ अर्ज घेतले आहेत, तर आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार
डॉ. हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज
भरला. हिना गावित यांनी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार
श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार
सुजय विखे पाटील यांनी तर शिर्डी लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे
यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर राहता इथं झालेल्या प्रचार सभेला मुख्यमंत्री तथा
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील सांनी संबोधित
केलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज
मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे ३१ उमेदवार
निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या उमेदवारांना चिन्ह वाटपही आज करण्यात
येत आहे.
लातूर मतदार संघातून छाननीअंती वैध ठरलेल्या
३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी आज माघार घेतली, आता
२८ उमेदवार या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे
राहुल गायकवाड यांच्यासह अकरा जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता या मतदार संघात महाविकास
आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या
रिंगणात आहेत.
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर
उमेदवार विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता या मतदार संघात भारतीय जनता
पक्षाचे संजय पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पैलवान
चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले महायुतीच्या
उमेदवार अर्चना राणा जगजीत सिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे
निंबाळकर यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे
यांनी परस्परांच्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीवरून खुलासा करण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या
आहेत. मुंबई इथल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय इथं रुग्णांवरील उपचारादरम्यान शासकीय
योजनेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एका खाजगी प्रसारमाध्यमाला
दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावरून अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रतिनिधींनी
हा मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आचारसंहिता भंगाची कारवाई
करावी अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती त्यावरून ही नोटीस
बजावण्यात आली आहे.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक
अंतुले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अनेक विकास कामे होत असतील
तर या सरकारला का पाठिंबा देऊ नये, अशी भावना अंतुले
यांनी व्यक्त केली. आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या
उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
****
दरम्यान, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षानं आज निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. आरोग्य, शिक्षण,
स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या
पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी सांगितलं. अठरापगड जाती तसंच बारा बलुतेदारांचा विचार करणारा आणि त्यांच्या
सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा जाहीरनामा, राज्यासह देशाच्या
विकासप्रक्रियेला पुढे नेणारा असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे
****
श्रोतेहो, राज्यातल्या
लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका,
स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय
महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं
सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा
घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता
वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय
जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी
आज त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार
नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, तर उर्वरित
उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या एका १४ वर्षीय लैंगिक अत्याचार
पीडित मुलीच्या गर्भपाताला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. २८ आठवड्यांचा हा
गर्भ काढून टाकण्यासाठी मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठातांना डॉक्टरांचं
एक पथक नियुक्त करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे, तर या गर्भपातासाठी तसंच उपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च राज्य सरकार वहन करणार
आहे. गर्भपाताच्या कायद्यानुसार विवाहिता, दिव्यांग, अल्पवयीन तरुणी किंवा अत्याचार पीडितांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची
परवानगी आहे, मात्र या प्रकरणात १४ वर्षीय बालिकेच्या शारीरिक
तसंच भावनिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानं, न्यायालयानं गर्भपाताची परवानगी दिली आहे.
****
भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर युवा बुद्धिबळपटू
डी.गुकेश यानं कॅनडा इथं झालेल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.
ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेशने आज झालेल्या
१४व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली आणि १४ पैकी
नऊ गुणसंख्येच्या बळावर विजय मिळवला. यानंतर विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना
चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच ग्रॅंडमास्टर
विश्वनाथन आनंद यांनी सर्वांत तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन केलं आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या
निवडणूक खर्चाची पहिली तपासणी येत्या शनिवारी २७ तारखेला होणार आहे. निवडणूक संनियंत्रण
कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी ही माहिती दिली. निवडणूक खर्च निरीक्षक
संजीब बॅनर्जी यांच्याकडून ही तपासणी केली जाणार आहे. निवडणूक काळात तीन वेळा नोंदवही
तपासणी केली जाणार असल्याचंही याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे निवडणूकीच्या
अनुषंगानं सुरू असलेल्या तपास मोहिमेत गावठी बनवाटीचे दोन पिस्तूल, एक खंजीर तसंच सात जणांकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. तसंच जुगार अड्यांवर
छापे घालून पोलिसांनी ९१ हजार ६१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधिक्षक
श्रीकांत धिवरे यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड इथं गोदावरी नदीपात्रात हजारो मासे
मृत आढळले आहेत. बंदा घाट परिसरात आज हे चित्र दिसून आलं. जून २०२० मध्येही असा प्रकार
घडला होता.
****
No comments:
Post a Comment