Monday, 1 April 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      बँकांशी निगडित आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज-रिजर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      वाराणसीतल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी देण्याला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग

·      व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात तर राज्यात वीजेचे दहा टक्के वाढीव दर लागू

आणि

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांना उद्यापासून प्रारंभ

****

देशातल्या सर्व नागरिकांना बँकेतले आर्थिक व्यवहार सोप्या पद्धतीनं करता यावे यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयच्या स्थापनेला आज ९० ‍‍‍वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, मुंबईत घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, गव्हर्नर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श समजली जात असल्याचं सांगत, आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शाश्वत आणि गतिमान आर्थिक प्रगतीसाठी आरबीआयला सतत प्रयत्नरत राहावं लागणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी नव्वद रुपयांच्या विशेष नाण्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काल दिल्ली इथं रामलीला मैदानावर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी देशात यंत्रणांचा गैरवापर सुरू असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र `इव्हीएम` नसेल तर भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या १८० जागाही जिंकू शकणार नाही, असा दावा केला होता. गांधी यांच्या या विधानाचा निषेध करत, गांधी हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याचं, भाजपनं म्हटलं आहे.

****

दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयानं १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालय- ईडीनं केजरीवाल यांच्यावर केला आहे. कथित मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना २१ मार्चला अटक करण्यात आली होती.

****

वाराणसी इथल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात हिंदू समाजाला पूजा करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वाराणसी न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर सुनावणी घेत, दोन्ही समाजाच्या भाविकांना धार्मिक प्रार्थना करता यावी, यासाठी ज्ञानव्यापी मशिदीत स्थिती जैसे थे कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. हिंदू समाजाने दक्षिण द्वाराचा तर मुस्लिम समाजाने उत्तर दरवाजाचा वापर करण्याची सूचना करत, या प्रकरणी अंतिम निर्णय येईपर्यंत हीच व्यवस्था कायम ठेवण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात धार इथं भोजशाला परिसरातलं शास्त्रोक्त सर्वेक्षण थांबवण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसारच भारतीय पुरातत्व संशोधन विभाग - एएसआय या ठिकाणी सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणामुळे विवादित स्थळाच्या संरचनेत काहीही बदल होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना न्यायालयाने एएसआयला केली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या चार तारखेपर्यंत या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.

परभणी इथं आज तीन उमेदवारांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार गोविंद रामराव देशमुख यांनी चार अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी तीन अर्ज, तर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब कदम यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी दोन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहेत.

जानकर यांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर,उपस्थित होते. संविधान बदलाच्या चर्चा लोकांची दिशाभूल करण्यासाठी केल्या जात असून, त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

****

आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवि रामदास जाधव यांनी हा अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या दोन झाली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज दोन अर्ज दाखल झाले. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदार संघात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज भाजपच्या वतीनं तसंच अपक्ष अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आतापर्यंत २ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदार संघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम आकाशवाणी घेऊन येत आहे. आज एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. आज नागपूर मतदार संघाचा आढावा ऐकता येणार आहे

****

तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे सिलिंडर ३० ते ३२ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आता मुंबईत एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत एक हजार ७१७ रुपये इतकी झाली आहे.

****

राज्यात आजपासून नवीन १० टक्के वाढीव वीज दर लागू झाले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगातर्फे मार्च २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही वीज दरवाढ करण्यात आल्याचं महावितरणनं सांगितलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शहागंज परिसरातल्या दहा जणांवर महावितरणने आज वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या दहा जणांनी एक लाख चाळीस हजार १४३ रूपयांची वीज चोरी केल्याचं आढळून आलं. शहागंज शाखेचे सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या पथकानं राबवलेल्या तपासणी मोहिमेनंतर सर्व आरोपींना वीजचोरीचे निर्धारित बिल दिले असता ते भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर अथरगण यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत. दोन एप्रिलपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा, १६ एप्रिलपासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर २९ एप्रिलपासून सर्व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. तसंच तीन मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या आणि १३ मे पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयात एकूण १०५ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येतील. या परीक्षेचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहेत.

****

हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदान जनजागृती रथाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. तसेच पारधी यांनी कार्यालयातल्या 'मी मतदान करणारच' या अभियानांतर्गत स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन उद्घाटन केलं. या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातल्या प्रत्येक वार्ड आणि ग्रामीण भागात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सार्थक नलावडे आणि तनिष केंजळे यांनी महाराष्ट्र स्टेट ओपन बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेत अंडर 17 दुहेरी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे इथं २८ ते ३१ मार्च दरम्यान या स्पर्धा घेण्यात आल्या. सार्थक नलावडे हा एसबीओए पब्लिक स्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे.

****

परभणी जिल्ह्यात सेलू- ढेंळी पिंपळगाव दरम्यान सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे २, ६ आणि ८ तारखेलाकाही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं ही माहिती दिली.

****

हवामान

राज्यात आज सर्वाधिक ४१ सेल्सियस अंश तापमानाची सोलापूर इथं नोंद झाली. त्या खालोखाल बीड, अकोला आणि जळगाव इथं ४० अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बुलडाणा इथं ३८ पूर्णांक चार दशांश, परभणी ३६ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं ३६ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: