Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· रिजर्व्ह बँकेच्या ९० व्या स्थापना दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर
· मेरठच्या प्रचार सभेत पंतप्रधानांची भ्रष्टाचारावर टीका तर इंडिया आघाडीचा भाजपवर हल्लाबोल
· वंचित बहुजन आघाडीकडून अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
· बीड जिल्ह्यात अंबाजोगाई जवळ काल तीन जणांचा अपघाती मृत्यू
आणि
· पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा भक्तिभावानं साजरा
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला ते आज संबोधित करणार आहेत. १९३५ साली आजच्याच दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
दरम्यान, मोदी यांनी काल उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. ही निवडणूक फक्त सरकार स्थापन करण्यासाठी नाही तर देशाला विकसित राष्ट्र तसंच अर्थव्यस्थेला जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमाकांची आर्थिक महासत्ता करण्यासाठीची निवडणूक असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी आपण मोठी लढाई लढत आहोत आणि म्हणूनच आज मोठे भ्रष्टाचारी तुरुंगात असल्याचं मोदी यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी मोदी यांनी दिली. भाजपनं मेरठ इथून रामायण या गाजलेल्या मालिकेतले कलाकार अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे.
****
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची काल दिल्ली इथं रामलीला मैदानावर सभा झाली. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केलेल्या भाषणात देशात यंत्रणांचा गैरवापर सुरु असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र `इव्हीएम` नसेल तर भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या १८० जागाही जिंकू शकणार नाही, असा दावा केला. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या सभेत सहभागी झाले होते. आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची शंका होती, पण ती शंका आता वास्तवात उतरल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही पेच नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत या सभेपूर्वी बातमीदारांशी बोलत होते. मुंबईतल्या जागांवरूनही महाविकास आघाडीत कोणताच वाद नाही, आम्ही विचार करूनच उमेदवार दिले असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
****
महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याचं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यांवरून वाद सुरू असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीकडून कॉँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरसह सात जागांवर पाठींबा देणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही आंबेडकर यांनी यावेळी टीका केली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये हिंगोलीतून बी.डी.चव्हाण, लातूर - नरसिंहराव उदगीरकर, जालना - प्रभाकर बकले, तर सोलापूरहून राहुल काशिनाथ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदार संघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम आकाशवाणी घेऊन येत आहे. आज एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्तविभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.
****
आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या दरात वाढ झालेली नाही.
****
मिरज इथल्या सतार आणि तंबोऱ्याला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालं आहे. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीला हे मानांकन मिळालं आहे. मिरज सोडून इतर ठिकाणच्या कारागीरांना आता या वाद्यांची नक्कल करता येणार नाही, तसंच इतर ठिकाणची वाद्य आता मिरज या नावाने विकता येणार नाहीत.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, काल प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी अडवाणी यांना हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या निमित्तानं देशभरातल्या विविध चर्चमध्ये प्रार्थनासभांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई जवळ काल तीन जणांचा अपघाती मृत्यू झाला. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीसह जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाघाळा पाटी जवळ एसटी बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. सेवालाल राठोड, दिपाली जाधव, आणि त्रिशा जाधव अशी या मृतांची नावं आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा काल भक्तिभावानं साजरा झाला. राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान करून नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मानाच्या दिंड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यंदाचा समाधी सोहळा नाथांचा चतुःशतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळा असल्याने, मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. नाथ महाराजांच्या नावाने दिले जाणारे विविध पुरस्कार, आज प्रदान करण्यात येणार आहेत. श्रीसंत नरहरी सोनार महाराज संस्थान इथं आज सकाळी ११ वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगपुरा भागातल्या नाथमंदिरातही भाविकांनी नाथांचं दर्शन घेण्यासाठी काल गर्दी केली होती.
****
मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणी जिल्ह्याचा विकास का झाला नाही असा प्रश्न, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तसंच महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या इकोफ्रेंडली मतदार ग्रीन मतदार बुथ सूचनेनुसार नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा विष्णुपूरी इथं इकोफ्रेंडली मतदान केंद्र तयार केलं आहे. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी काल या बुथची पाहणी केली. संपूर्ण मतदान परिसर नैसर्गिक झावळ्यांनी, विविध रोपांनी तयार केला आहे.
****
मतदान प्रक्रियेप्रती युवकांनी जागरूक व्हावं तसच त्यांनी राष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी मतदान करावं, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केलं आहे. काल नांदेड इथल्या महात्मा गांधी मिशन- एमजीएम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. मतदान ही शक्ती असून तो एक देशसेवेचाच एक भाग आहे, असंही करनवाल यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं चालू आर्थिक वर्षात काल सायंकाळपर्यंत १८२ कोटी ७८ लाख २३ हजार ७७१ रुपये महसूल प्राप्त केला आहे. यामध्ये मालमत्ता कराच्या १५५ कोटी १९ लाख ८६ हजार २६८ रुपये तर पाणीपट्टीच्या २७ कोटी ५८ लाख ३७ हजार ५०३ रुपये महसुलाचा समावेश आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षातली ही विक्रमी वसुली असल्याचं, महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जालना शहराला जायकवाडी धरणातून होणारा पाणी पुरवठा चार तारखेपर्यंत बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेतल्याचं, जालना महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत. जवळपास दोनशे ७४ योजनांची कामे ठरवून दिलेल्या टप्प्यामध्ये होत नसल्यानं ठरलेल्या मुदतीत ही कामं पूर्ण होणार नसल्याचं दिसून येत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्याची पाहणी करून आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. अधिकाऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी त्यांनी पाणी बचतीविषयी चर्चा केली.
****
लातूर शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या २१ ठिकाणच्या जोडण्या महसूल विभाग आणि लातूर शहर महापालिका प्रशासनातर्फे काल खंडित करण्यात आल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment