Saturday, 20 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:20.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या २६ तारखेला मतदान होणार असून, यासाठीच्या प्रचाराला वेग आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नांदेड जिल्ह्यात कौठा इथं, महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काल पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या विशेषत: नवमतदारांचे पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले. यानंतरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत नागरीकांनी देशाचं भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आवर्जुन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

रिपब्लिकन पक्षाचे राषट्रय अध्यक्ष रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातले महायुतीचे लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

यानंतर परभणीतही महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. 

परभणी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार संजय जाधव निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर इथं, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

****

नांदेड तसंच हिंगोली लोकसभा मतदार संघामधल्या निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना नऊ विधानसभा मतदार संघात नेऊन सोडणं तसंच २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्‍यानंतर परत आणण्‍यासाठी १०८ बसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी तसंच कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्‍या केंद्रावर २४ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्‍हा प्रशासनानं केलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह ११ मतदारसंघांचा समावेश आहे. २२ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे.

****

स्वीप कार्यक्रमाअंतर्गत काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध १८ शाळांमधल्या तीन हजार विद्यार्थी आणि २०० शिक्षकांनी एकत्र येऊन शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात मानवी रांगोळी, प्रभात फेरी आणि पथनाट्याचं आयोजनं केलं होतं. यावेळी खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याबाबत आई वडिलांना पत्र लिहून घेण्यात आलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत ७२ गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार केलं, तर एक हजार ९४१ संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरातल्या तेरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे शोध पथकांना हत्यारे बाळगणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्रेते तसंच अंमली पदार्थ विक्रेत्यांना तातडीने  ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

येत्या २२ एप्रिल ते १७ मे या कालावधित होणारी एमएच-सीईटी परीक्षा नांदेड जिल्ह्यात आठ परिक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही, असे आदेश जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ७२९ हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झालं. सर्वाधिक ५०५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान सुरगाणा तालुक्यात झालं आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी ६४९ हेक्टर आंबा पिक, ७१ हेक्टरवरील कांदा आणि साडे आठ हेक्टर क्षेत्रातल्या भाजीपाल्याच्या पिकाचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.

****

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - हजरत निजामुद्दीन - नांदेड या गाडीच्या चार फेऱ्या मंजूर केल्या आहेत. ही गाडी २० आणि २७ एप्रिलला नांदेड इथून सकाळी पावणे नऊ वाजता सुटेल आणि परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, जळगाव, भोपाळ, आग्रा, मथुरा मार्गे हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ आणि २८ एप्रिलला हजरत निजामुद्दीन इथून रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी निघून याच मार्गाने मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी नांदेडला पोहोचेल.

****

No comments: