Saturday, 20 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:20.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२ टक्के मतदान;त्रिपुरात सर्वाधिक ८० टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी ४८ टक्के मतदान;महाराष्ट्रात गडचिरोलीत ६७ टक्क्यांवर मतदानाची नोंद

·      तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली;उस्मानाबाद इथं ७७ तर लातूर इथं ५० अर्ज दाखल;आज अर्जांची छाननी

·      चौथ्या टप्प्यात औरंगाबाद इथं सहा अर्ज तर जालन्यात एक अर्ज दाखल

आणि

·      दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आठवडाभरावर;नेत्यांच्या सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ लोकसभा मतदारसंघांमधल्या एक हजार ६२५ उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं. पहिल्या टप्प्यात अंदाजे ६२ पूर्णांक ३७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त ८० टक्के मतदान त्रिपुरामध्ये नोंदवलं गेलं. पश्चिम बंगालमधे ७७ पूर्णांक ५७ टक्के, पुद्दुचेरीत ७३, आसाम ७२, मेघालय ७०, मणीपूर तसंच सिक्किम ६८, छत्तीसगड ६३, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश तसंच तमिळनाडुमध्ये ६५, उत्तरप्रदेश ५८, राजस्थान ५७, उत्तराखंड ५४, नागालँड तसंच मिझोराम मध्ये अनुक्रमे ५६ आणि ५३ टक्के, अंदमान निकोबार तसंच लक्षद्वीपमध्ये अनुक्रमे ५७ आणि ५९ टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी ४८ टक्के मतदान झालं.

राज्यातल्या नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात सरासरी ६० पूर्णांक २२ टक्के मतदान झालं.

यापैकी सर्वाधिक सुमारे ६७ पूर्णांक १७ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर इथं तर त्या खालोखाल भंडारा-गोंदिया मतदारसंघात ६४ पूर्णांक आठ टक्के, चंद्रपूर इथं ६० टक्के, रामटेक ५८ पूर्णांक ५० टक्के, तर नागपूर इथं सर्वात कमी ५३ पूर्णांक ७१ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले आहेत. उस्मानाबाद मतदार संघात ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज तर लातूर मतदार संघातही ३६ उमेदवारांचे ५० अर्ज दाखल झाले आहेत. रायगड मतदार संघातून ४० अर्ज, बारामती ६६ अर्ज, सोलापूर ५३, माढा ५५, सांगली ३९, सातारा ३३, रत्नागिरी-सिंधुदुर्ग १३, कोल्हापूर ४१, तर हातकणंगले मतदारसंघात ५५ अर्ज दाखल झाले आहेत.आज या टप्प्यातल्या अर्जांची छाननी होणार असून, २२ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे.

****

लातूर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंजगोलाई ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल पर्यंत मिरवणूक काढली.

****

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

****

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी काल अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजय राऊत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

****

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भाजपचे नारायण राणे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद मतदार संघात काल सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात बहुजन महा पार्टी आणि हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षांचे प्रत्येकी एक तर बाकी चार अपक्ष उमेदवार आहेत.या मतदारसंघात गेल्या दोन दिवसात एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत, तर काल २५ जणांनी ५३ अर्जांची उचल केली. यामध्ये संदिपान भुमरे यांच्या नावे दोन तर विनोद पाटील यांच्या नावे एका अर्जाची उचल करण्यात आली आहे.

****

बीड लोकसभा निवडणुकीसाठी काल ३० उमेदवारांनी ६८ अर्जांची उचल केली.

जालना मतदार संघातून काल दुसऱ्या दिवशी एकूण २४ जणांनी ४९ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. या मतदार संघातून गेल्या दोन दिवसांत ५८ जणांनी १४६ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, काल मंगेश संजय साबळे या अपक्ष उमेदवारानं अर्ज सादर केला. 

****

शिर्डी लोकसभा मतदारसंघात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते.

****

नौदल उपप्रमुख, व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे येत्या ३० तारखेला निवृत्त होणार आहेत. त्रिपाठी यांनी नौदलाच्या विनाश, किर्च आणि त्रिशूल या जहाजांचं नेतृत्व केलेलं आहे.

****

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा दिवस आठवडाभरावर आला आहे. प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रचारसभांना वेग आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्धा मतदार संघात तळेगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस तसंच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. काँग्रेस आणि मित्रपक्षांची भूमिका कायम विकासविरोधी शेतकरी विरोधी असल्याची टीका करत, मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. दरम्यान, मोदी यांची आज नांदेड इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. कौठा इथं आज सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे देशवासियांना २०४७ चं स्वप्न दाखवत आहेत, मात्र ते देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल नांदेड इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ नवामोंढा इथं झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. आगामी काळात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच करेल असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारचा जो धाक बसायला हवा तो नसल्याचं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलत होते. सांगलीच्या जागेचा तिढा एकमताने सुटावा यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं.

****

औरंगाबादचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वैजापूर इथं मेळावा घेतला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत.

****

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं, स्पष्ट केलं आहे. काल मुंबई इथं पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल उस्मानाबाद मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी त्यांनी शमशुद्दीन ख्वाजा दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली. 

****

बीड मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक सुशांत कुमार यांनी काल केज विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन आढावा घेतला, तसंच आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांनी केज तालुक्यातल्या अंतर जिल्हा सिमेवरील माळेगाव स्थिर सर्वेक्षण पथकास भेट दिली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आढावा घेतला. १५ ऑगस्ट २०१९ पासूनच्या नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशीर सत्यता तपासून अहवाल सादर करावा, असे असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात काल संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसात पिंपळगाव इथं वीज पडून मल्लिकार्जुन माटाळकर या शेतकर्याचा मृत्यू झाला.

****


बुलडाणा जिल्ह्यात काल पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून चार अवैध पिस्तुल, १७ जिवंत काडतूस आणि ३ मोबाईल असा २ लाख १७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात पुढील कारवाई सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं ४३, परभणी ४२, नांदेड, बीड तसंच छत्रपती संभाजीनगर इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...