आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२१ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
सक्तवसुली संचालनालय -ईडी तसंच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सी.बी.आय. सारख्या संस्थांना सरकार अथवा कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करु दिलं पाहिजे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी एका खासगी वाहिनीला काल मुलाखत दिली, त्यावेळी मोदी बोलत होते.
****
नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशात होत असलेल्या परिवर्तनाचं आणि देश पुढं जात असल्याचं द्योतक असल्याचं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केलं आहे. त्यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत मार्गदर्शन केलं, त्यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.
****
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज महावीर जयंतीनिमित्त क्रांती चौक-पैठण गेटमार्गे गुलमंडी अशी मिरवणूक काढण्यात आली.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या, १८००-२२१-९५० या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर १८ एप्रिलपर्यंत ७ हजार ३१२ लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक, म्हणजे १ हजार ५७५ दूरध्वनीची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे.
****
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात आज खामगाव शहरात माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार मुकुल वासनिक प्रचार सभा होणार आहे. तर, संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल इथं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची जाहीर सभाही आज होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात देगलुर आणि मुखेड इथं आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच वीजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
*****
No comments:
Post a Comment