Wednesday, 24 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 24.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०

****

·      अर्थसंकल्पावर संसदेत चर्चेला प्रारंभ-विरोधकांचा सभात्याग तर सरकारकडून आरोपांचं खंडन

·      शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      वंचित बहुजन आघाडीची राज्यात उद्यापासून सात ऑगस्टपर्यंत आरक्षण बचाव यात्रा

आणि

·      मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

****

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर आज संसदेत चर्चा सुरू झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही, असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामण यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातल्या चर्चेत सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही, असं नाही, असं सीतारामण यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.

     

तत्पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने आज संसद भवनाच्या आवारात निदर्शनं केली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधीचं वाटप करताना विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही तर राज्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला. मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या आक्षेपांना उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर आपण संसदेच्या बाहेर आणि आतही आंदोलन करणार असल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं.

      लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेचं कामकाज सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी निदर्शनं केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या या कृतीला आक्षेप घेत, विरोधी पक्षांची ही कृती योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनीही विरोधी पक्षांवर टीका केली. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यावर विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत सहमती दर्शवली होती, त्यामुळे त्यांची ही कृती योग्य नाही, असं रिजिजु म्हणाले.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याची माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

****

राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत इथल्या हळद संशोधन केंद्राबाबत आज मुंबईत आढावा बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपये निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तीन वर्षांत हा प्रकल्प तयार करावा, तसंच शासकीय अभिसरण योजनांचा लाभ या केंद्रास देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक असून त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं, मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही मागणी केली आहे.

****

राज्यातली विकासकामं नियोजित वेळेत मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत ते आज बोलत होते. प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर झाला, तर प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचं दीर्घकालीन नुकसान होतं, असं पवार यांनी नमूद केलं. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा पवार यांनी यावेळी घेतला.

****

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये दोन ते चार ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार असून, पक्षाच्या मंडल रचनेतील सर्व ७७८ मंडलांमध्ये नऊ ते ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशने आणि बैठका होणार आहेत. भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाने यासाठी विभागवार नियोजन केलं असून, मराठवाड्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसंच राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे हे नेते तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

****

नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमचा सदस्य असलेल्या लच्चू ताडो या नक्षलवाद्यानं आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शासनानं त्याच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६७० नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, असं पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.

****

राज्यात शांतता आणि सलोखा टिकून रहावा यासाठी उद्या २५ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ही आरक्षण बचाव यात्रा उद्या चैत्यभूमीपासून सुरू होणार आहे. राज्यभरात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येत्या ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथे त्यांचं उपोषण सुरू होतं. सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा, सरकारला जी सत्ता महत्त्वाची वाटते ती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागू, असा गर्भित इशारा जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

****

नांदेड महापालिकेच्या तेवीस मदत केंद्रांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज संकलित करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा हजार अर्ज दाखल झाले असून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरावेत, असं आवाहन नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.

      परभणी जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून या योजनेच्या प्रचारासाठी पालम,गंगाखेड आणि पूर्णा इथे कार्यशाळा घेण्यात आल्या. पूर्णा तालुक्यात एकूण १३ हजार २९० महिलांचे अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी जीवराज यांनी दिली

****

 

धाराशीव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टर नीतिन गुंड, या वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज रंगेहात पकडलं. समुदाय आरोग्य कर्मचाऱ्याची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी गुंड यांनी ही लाच मागितली होती.

****

नांदेड जिल्हा गृहरक्षक दल - होमगार्डमध्ये रिक्त असलेला ३३५ सदस्यांचा अनुशेष भरण्यासाठी येत्या सोळा ऑगस्टपासून होमगार्ड नोंदणीचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुकांना यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील, असं नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कळवलं आहे.

****

मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांची जयंती छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे. शहरातील टिळक पथावर पैठण दरवाजा इथं गोविंदभाईंच्या पुतळास विविध संस्था-संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...