Sunday, 22 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.

****

आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या जनता की आदालतकार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.

****

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, संच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

****

धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.

****

अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छानी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या शतसंवादिनीया कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.

****

वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...