Tuesday, 17 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 17 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १७ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध-पंतप्रधानांचं प्रतिपादन 

·      आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

·      आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती

·      दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता

आणि

·      आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम लढत

 

सविस्तर बातम्या

ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधानांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे.

****

देशभरात आजपासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मराठवाड्याचा मुख्य ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोर्कापणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

****

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते,नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.

****

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनतर्फे उद्या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचं औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचं, विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

****

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्यासांठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.  

****

आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे.

हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासननिर्णयही काल जारी झाले.

****

दृष्टीहीन आणि कर्णबधीर प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.

****

 दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेनं शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली असून, निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.

नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्ह्यात आज अडीच हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी नांदेड शहरातील ९ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.

****

जालना इथं घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रीम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली इथं मोदकाचा गणपती अर्थात विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे एक लाख ५१ हजार मोदकांचं वाटप केलं जाणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात काल चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर आज अनंत चतुर्दशीला सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं परवा १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं उद्या १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

****

परभणी इथं दरवर्षी प्रमाणे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काल सामुहिक विवाह सोहळा पार पडला, यंदा या सोहळ्यात ४० जोडपी विवाहबद्ध झाली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं.

****

श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आज आपण थायलंडमधल्या गणेशोत्सवाविषयी अर्पिता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ या...

महाराष्‍ट्रीयन पद्‌धतीनं गणपतीची पूजा आणि स्थापना होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. पुजेचं साहित्य इथं सहज उपलब्ध असतं. पण उकडीचे मोदक देखील आता गेले काही वर्ष आम्ही महाराष्ट्रीयन गृहणींकडून बनवून घेतो. इथल्या काही सभासदांचं थायी मित्र सुद्धा गणपतीच्या दर्शनाला अगदी आवर्जून येतात. भारताची कमी वाटणार नाही असं ढोल, ताशा, मोदक, आरत्या, अथर्वशीर्ष हे सगळं करत तो एक अर्धा दिवस का होईना पण खूप आनंदात घालवतो.

****

चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. काल उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

****

बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ची ई पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता मोबाइल ॲपवरून करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. या हंगामाची ई पीक पहाणी करण्यासाठी शासनाने २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यात आज ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत धाराशिव जिल्ह्यात कालपर्यंत तीन लाख ९२ हजार ४२४ महिलांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार ८५१ महिलांनी अर्ज केले आहेत.

****

बीड इथं काल बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या काही नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ पूर्णांक ३४ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...