Thursday, 19 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date:  19 September 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.

****

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 

जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.

****

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.

****

बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.

****

महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

****

यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

****


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.

****

चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.

****

चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.

काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.

****s

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...