Friday, 22 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      विधानसभा निवडणुकीसाठीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून.

·      ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या तिसऱ्या पद्म फेस्टिव्हला छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ.

आणि

·      ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत आजपासून पहिला सामना.

****

विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या होणार आहे. या मतमोजणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप  स्वामी यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सर्व नऊ मतदार संघात एकूण २०८ टेबलद्वारे मतमोजणी होणार आहे, यासाठी नियुक्त ८५२ कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी तीन हजाराहून पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केल्याची माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली...

वोटींग मशिन्सच्या मोजणीसाठी १२६ टेबल, पोस्टल बॅलटच्या मोजणीसाठी ७० टेबल आणि एटीबीपीएस च्या मोजणीसाठी १२ टेबल्स असे एकूण २०८ टेबल्स पूर्ण नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत. यासाठी ८५२ काऊंटींग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. मायक्रो ऑब्जरवर २४२ लावलेले आहेत. आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेसाठी जवळजवळ तीन हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत. एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पावर आपण लावलेला आहे, एकूण ५७७८ इतका मॅन पावर काऊंटींगच्या कामासाठी लावलेला आहे.

****

परभणी जिल्हा प्रशासनाचीही मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघापैकी परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, जिंतूर इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, गंगाखेड इथं संत जनाबाई महाविद्यालयात, तर पाथरी इथं शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतमोजणीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशानं कलम १६३ लागू केलं आहे. उद्या सकाळी सहा वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हे कलम लागू राहणार असल्याचं या बाबतच्या पत्रात स्पष्ट केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात मतमोजणी कर्मचाऱ्यांचं सरमिसळीकरण काल पार पडलं. यावेळी सहाही मतदारसंघातले प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि उमेदवार उपस्थित होते.

****

दरम्यान, विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६९ पूर्णांक ६४ टक्के मतदान झालं. जिल्ह्यात सिल्लोड मतदार संघात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली. त्या खालोखाल पैठणला ७७ पूर्णांक ५३ टक्के, वैजापूर सुमारे ७६ टक्के, गंगापूर ७४ टक्के, फुलंब्री ७२ टक्के, कन्नड ६९ टक्के तर औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम मतदार संघात प्रत्येकी सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली.

****

जालना जिल्ह्यात एकूण ७२ पूर्णांक ६७ टक्के मतदान झालं. सर्वाधिक ७७ पूर्णांक ३६ टक्के मतदान भोकरदन विधानसभा मतदार संघात झालं आहे. त्याखालोखाल घनसावंगी मतदारसंघात ७७ पूर्णांक १६, बदनापूर - ७४ पूर्णांक ७२, परतूर - ७० पूर्णांक ७२ तर जालना विधानसभा मतदारसंघात ६४ पूर्णांक ३९ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एकूण ६५ पूर्णांक ५८ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक सुमारे ७० टक्के मतदान परंडा विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी सुमारे ६२ टक्के मतदान उमरगा मतदारसंघात झालं. तुळजापूर - सुमारे ६७ टक्के तर उस्मानाबाद मतदारसंघात ६३ पूर्णांक ७३ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण ६९ पूर्णांक ४५ टक्के मतदान झालं, यापैकी सर्वाधिक ७६ पूर्णांक ३३ टक्के मतदान भोकरमध्ये झालं. त्या खालोखाल नायगाव - ७४ टक्के, मुखेड - ७० पूर्णांक १४ टक्के, किनवट - सुमारे ७२ टक्के, हदगाव - ७१ पूर्णांक ७७ टक्के, नांदेड उत्तर - ६० टक्के, नांदेड दक्षिण - ६४ टक्के, लोहा - ७५ टक्के आणि देगलूर मतदारसंघात ६३ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही ६७ पूर्णांक ६१ टक्के मतदान नोंदवलं गेलं.

****

बीड जिल्ह्यात एकूण ६८ पूर्णांक ८८ टक्के मतदान झालं. गेवराई मतदारसंघात - ७२ पूर्णाक ७२ टक्के, माजलगाव - ६७ पूर्णांक २४, बीड - ६२ पूर्णांक १८, आष्टी - सुमारे ७३, केज - ६३ पूर्णांक ४८ आणि परळी मतदारसंघात ७५ पूर्णांक २७ टक्के मतदान झालं.

****

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सुमित पंडित या तरुणाने मतदानाच्या दिवशी बोटावर शाई असलेल्या मतदारांची मोफत दाढी कटींग उपक्रम राबवला. पंडित यांनी आपल्या माणुसकी केशकर्तनालयात अनेक मतदात्यांना सलून सेवा मोफत पुरवली तर मतदान केलेल्या अनेक महिलांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केल्याचं, पंडित यांनी आकाशवाणीला सांगितलं...

माझं जटवाडा रोडला सलूनचं दुकान आहे, माणुसकी सलून. तिथे मी भरपूर योजना राबवतो. ज्या दिवशी मतदान होतं एक अनोखी योजना राबवली होती की जो दाता मतदान करून येईल, बोटावरची शाई दाखवेल, त्याची आपल्या सलूनमध्ये मोफत दाढी आणि कटींग करून देण्यात येईल. त्यामध्ये आम्हाला जवळपास अठरा लोकांनी प्रतिसाद दिला त्या योजनेला. जवळपास २३ महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन महिलांचा देखील सन्मान केला.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात घेतली जाईल, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा तीन ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत. दहावीच्या परीक्षा १८ मार्चपर्यंत तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या ८६ दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं आहे.

****

भारतातल्या जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि या स्थळांची सुयोग्य मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत असून, याकडे केंद्र सरकारने अधिक लक्ष द्यावं, असं निरीक्षण, पुरातत्व वास्तू तज्ज्ञ पद्मश्री के के मोहम्मद यांनी नोंदवलं आहे. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने तिसऱ्या पद्म फेस्टिव्हला कालपासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरुवात झाली. या कार्यक्रमातल्या दुसऱ्या सत्रात झालेल्या प्रकट मुलाखतीत मोहम्मद यांनी हे मत नोंदवलं. दरम्यान, या कार्यक्रमात काल, पद्मभूषण राम नाईक, हिंदी क्रिकेट समालोचक पद्मश्री सुशील दोशी, तसंच पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या मुलाखती झाल्या. शेवटच्या श्वासापर्यंत बासरी वाजवत राहण्याचा मानस चौरसिया यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या सांस्कृतिक सभागृहात होत असलेला हा पद्म फेस्टिवल उद्या २३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. यामध्ये बारा संवाद सत्र तसंच दोन सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आजपासून पर्थ इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार काही वेळातच सात वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसून, जसप्रित बुमराह कर्णधार असेल. फलंदाज शुभमन गील देखील दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकणार नाही. मालिकेतला दुसरा सामना सहा डिसेंबरपासून, तिसरा सामना १४ डिसेंबरपासून, चौथा सामना २६ डिसेंबरपासून, तर पाचवा आणि शेवटचा सामना तीन जानेवारी पासून खेळण्यात येणार आहे.  

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल शामराव बोधनकर स्मृति पुरस्कारांचं वितरण झालं. ‘स्वातंत्र्यसैनिक शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार’ पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे यांना, तर ‘समाजसेवी इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार’ डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात आला. आदिवासी संस्कृती स्त्रीप्रधान असून, या संस्कृतीचे आम्ही पाईक असल्याचं, स्मिता कोल्हे यांनी सत्काराच्या उत्तरात सांगितलं.

****

धाराशिव शहरातल्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातले दुकाने निरीक्षक विवेक हेडाऊ यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं, तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हेडाऊ यांनी २०१२ मध्ये राज ऑफसेट आणि स्टेशनरी सप्लायर्स या दुकानाचा परवाना नुतानीकरण करण्यासाठी दुकानाच्या मालकाकडून २०० रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी हेडाऊ यांना ही शिक्षा झाली आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या इलेक्ट्रीक बस उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात २३ ई-बस सुरु आहेत. बीड विभागात विविध मार्गावरच्या प्रवाशांची या बससेवेला पसंती मिळत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...