Sunday, 1 December 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 December 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परीषदेचा समारोप होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते परिषदेचं २९ तारखेला उद्घाटन करण्यात आलं होतं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला  उपस्थित आहेत.

****

सीमा सुरक्षा दल आज आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार नवी दिल्लीत काल प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” या राज्य शासनाच्या उपक्रमाची निवड करण्यात आली. तसंच लातूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं सुरु करण्यात आलेल्या लातूर मधल्या उमंग ऑटिझम अँड मल्टीडीसिबिलिटी रिसर्च सेंटरलादेखील या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****


राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा काल पुण्यात पार पडला. वायुदल प्रमुख एयर चिफ मार्शल अमर प्रीत सिंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमरप्रित सिंग यांच्या हस्ते कॅडेटसना विविध पदकं प्रदान करण्यात आले. १४७ व्या तुकडीतील ३५७ छात्र सैन्यदलात दाखल झाले. यामध्ये १९ मित्र देशांच्या छात्रांचा समावेश होता.

****

३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज पार पडली. “शाश्वत पर्यावरणासाठी धावणे, हे स्पर्धेचं घोषवाक्य होतं. या स्पर्धेमध्ये १२ हजारहून अधिक धावपटू धावले,  त्यात सुमारे  ८० परदेशी स्पर्धकांचा समावेश होता. 

****

आज जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना-नाको च्या वतीनं १९९२ पासून प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. या औचित्यानं आज मध्यप्रदेशातल्या इंदुर इथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस २०२४ या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सही रास्ते पर चले ही या वर्षी एड्स दिवसाची संकल्पना आहे.  एच आय व्ही बद्दल जागरुकता वाढवणं, उपचारासाठी अधिकार- आधारित दृष्टीकोनाला चालना देणं तसंच एच आय व्ही ने प्रभावित लोकांविरुद्ध भेदभाव संपवणं या उद्देशानं आज देशभरात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जळगाव इथं आज एड्स दिनानिमित्त, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील नर्सिंग महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रबोधनपर रॅली तसंच पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी एड्स आजाराबद्दल  मार्गदर्शन केलं तर जनशिक्षण संस्थान जळगावचे  संस्थापक अध्यक्ष विधिज्ञ संदीप सुरेश पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटकाने  एड्स बद्दल दक्ष राहत सावधानता बाळगावी असं आवाहन केलं. 

****

सिंगापूर इथे सुरु असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय बुद्धीबळपटू डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यातल्या कालच्या पाचव्या डावातही ४० चालींनंतर  बरोबरी झाली आहे. २ पूर्णांक ५ असे दोघांचे गुण असूने दोघेही जगज्जेतेपदापासून ५ गुण दूर आहेत. 

****

नांदेड विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे,  दक्षिण रेल्वे विभागानं आज काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - मनमाड रेल्वेगाडी नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती पूर्णा ते मनमाड दरम्यान धावेल. तर  मनमाड - नांदेड ही रेल्वेगाडी परतीच्या प्रवासात पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ते मनमाड ते पूर्णा दरम्यान धावेल.

****

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान एकादश संघासोबत कॅनरा इथं सराव सामना सुरु आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा पंतप्रधान एकादश संघाच्या २ बाद ३३ धावा झाल्या होत्या. मोहम्मद सिराज आणि आकाशदीपनं प्रत्येक एक बळी मिळवला.  

****

नांदेड जिल्हयातल्या इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानं काल प्रतिबंधित असलेला ७ लाख ९२ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा आणि या गुटख्याची वाहतूक करणारं सुमारे ७ लाख रुपये किमतीचं वाहन जप्त केलं तसंच या वाहनातून प्रवास करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

****


No comments: