Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. ९२ वर्षीय डॉ मनमोहनसिंग यांचं काल रात्री निधन झालं. देशसेवेसाठी, निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन त्यांनी मिळवलेलं यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले...
एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा। एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाए दी। एक चुनौती पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई। पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी डॉ मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं देशानं एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
डॉ. मनमोहनसिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळं देशानं जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू आणि विद्वान व्यक्तिमत्व गमावले, असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगतीच्या ४५ व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत आठ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यात विविध राज्यांतील शहरी वाहतुकीचे सहा मेट्रो प्रकल्प आणि रस्ते जोडणी आणि औष्णिक उर्जेशी संबंधित प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
****
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
क्रिकेट- महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय वेस्ट इंडिज संघानं घेतला होता. अवघ्या १६२ धावांवर वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. भारताकडून दीप्ती शर्मानं ३० धावा देत ६ बळी टिपले तर रेणूका सिंगने ४ खेळाडू बाद केले. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने जिंकत भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारताच्या पाच बाद १६४ धावा झाल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment