Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत काल समारोप.
• महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
• विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफितप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
• फेंगल चक्रीवादळामुळं राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट.
आणि
• सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधु आणि लक्ष्य सेननं पटकावलं विजेतेपद, महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या ५९ व्या अखिल भारतीय परिषदेची सांगता झाली. सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांमध्ये व्यत्यय आणणाऱ्या डिपफेकच्या संभाव्य गुन्ह्यांबद्दल तसंच डिजिटल फसवणूक, सायबर-गुन्हे आणि एआय तंत्रज्ञानामुळं निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी पोलीस नेतृत्वाला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आकांक्षी भारत या भारताच्या दुहेरी एआय शक्तीचा उपयोग करून आव्हानाचं संधीत रूपांतरित करण्याचं आवाहन केलं. तसंच स्मार्ट पोलिसिंगचा मंत्र विस्तारून पोलिसांना व्यूहात्मक, सावध, अनुकूलक्षम, विश्वासार्ह आणि पारदर्शक बनण्याचं आवाहन केलं. शहरी पोलिसिंगमध्ये घेतलेल्या पुढाकारांचे कौतुक करून, प्रत्येक उपक्रम एकत्रित करून देशातील १०० शहरांमध्ये संपूर्णपणे लागू करावा असं त्यांनी सुचवलं. समारोप सत्रात पंतप्रधानांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित केले.
****
महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरु आहे. लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी काम करणारं सरकार स्थापन होईल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी काल सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये खातेवाटपावरून मतभेद नाहीत. तसंच मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले.
एक बैठक आमची अमितभाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची. आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक-बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, एवढी मेजॉरिटी दिली. आता चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जी अपेक्षा जनतेची आहे, ती आम्ही पूर्ण करणार. आणि जनतेबरोबर आम्ही उत्तरदायीत्व आहोत. त्यामुळे आता विरोधकांना काही काम राहिलं का?
****
ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. अपयश आल्यानंतर विरोधकांनी आता ईव्हीएमचा मुद्दा पुढं केला असल्याचं शिंदे म्हणाले.
ई व्ही एम ची चर्चा चालू आहे. झारखंड मध्ये ते जिंकले आणि त्याच बरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले, तेव्हा काही ई व्ही एम चांगलं होतं? आत्ता पण लोकसभेत त्यांचा एक माणूस जिंकलाय पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंड मध्ये असेल, यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळालंय. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिलंय. लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिलंय. लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटीनं आलंय.
****
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीमधल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून, त्याला कोणत्याही नेटवर्क, वाय - फाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळं या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या बाराशे वरुन जास्तीत जास्त १५०० पर्यंत वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची, मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील यांची, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. विधीमंडळ पक्षाचा नेता या बैठकीत ठरवण्यात आलेला नाही. अधिवेशन काळात विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
****
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागानं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीमेचा तिसरा टप्पा पूर्ण केला. या मोहिमेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रानं चांगली कामगिरी करत २० लाख डिजीटल जीवन प्रमाणपत्राचं उद्दिष्ट साध्य केल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी राज्यसरकारकडून २६७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे; त्यानंतर आता ऑक्टोबर अखेरपर्यंतचं अनुदान वितरित केलं जाणार असल्याची माहिती पुणे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. यासाठी संबंधित संस्थांनी तातडीनं प्रस्ताव सादर करावेत असं ते म्हणाले.
****
देशात एड्सनं होणाऱ्या मृत्यूची संख्या ७९ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर एचआयव्ही संसर्गात २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये ४४ टक्क्यांनी घट झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं जागतिक एड्स दिनानिमित्त काल मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी ते बोलत होते.
****
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाच डिसेंबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि महिला दुहेरी प्रकाराचं विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं सिंगापूरच्या खेळाडूवर २१-६, २१-७ असा विजय मिळवला. तर, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात सिंधुनं चीनच्या वू ल्यु यू हिचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत मात्र भारतीय जोडगोळीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
****
दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये ११ व्या कॉमन वेल्थ कराटे स्पर्धेत सोलापूरच्या कुमारी आर्या साईनाथ यादव हिनं रौप्य पदक पटकावलं. ३९ देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आर्यानं ५३ किलो वजनीगटात रौप्य पदक पटकावलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्याचं अभिनंदन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सहा रंगमंचावरून एकूण ३६ कलाप्रकारांचं सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या कांचन वाडी परिसरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात काल विधी पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट -२०२५ घेण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी ही परिक्षा काल पार पडली. ४५० विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी तर १२१ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवराज नाकाडे यांचं काल लातूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षाचे होते. १९९४ ते १९९९ या काळात ते विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल लातूर जिल्ह्यातील गंगापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या सातारा परिसरातील खंडोबा अर्थात मार्तंड भैरव यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. ८०० वर्षा पेक्षा अधिक काळाची या यात्रेची परंपरा असून या यात्रेत राज्यभरातून लोखा भक्त प्रतिवर्षी सहभागी होतात. येत्या सात ते नऊ डिसेंबर दरम्यान दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर देवस्थानांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment