Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप
संमेलनातून केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारे नेतृत्त्व
तयार होईल, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत
भारत मंडपम इथं सोल लीडरशीप संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यावेळी उपस्थित होत. राष्ट्र
उभारणीसाठी नागरिकांचा विकास खूप महत्त्वाचा असून, स्कूल ऑफ
अल्टिमेट लीडरशिपची स्थापना विकसित भारताच्या प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वाचं
पाऊल आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन
दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर
यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यावेळी उपस्थित असतील. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन,
विविध परिसंवाद, असे कार्यक्रम होणार आहेत.
****
केंद्र सरकारनं
समाजमाध्यमांवरील विविध प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसाठी भारतीय कायदे आणि माहिती
तंत्रज्ञान नियम, 2021
अंतर्गत नियमावली जारी केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी कायद्यानं प्रतिबंधित
असलेला कोणताही कंटेंट प्रसारित करू नये आणि कंटेंटचे वयानुसार वर्गीकरण करावं अशी
सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे.
****
देशात मागच्या दहा वर्षात आरोग्यावर
होणारा खर्च चौसष्ट टक्क्यांवरून घटून सुमारे एकोणचाळीस टक्के इतका झाल्याची माहिती
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय आरोग्य
संवाद २०२५, या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह राष्ट्रीय आरोग्य योजना आणि अन्य अशा योजनांमधून
पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमुळे खर्चात ही घट झाल्याचं ते म्हणाले. देशातली सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या या योजनांअंतर्गत येते, असं नमूद करत, नुकतंच सत्तर वर्षांवरच्या सर्व नागरिकांना
आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करून घेण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचं वाहन बाँबनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज
दोन व्यक्तींना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथून या दोघांना आज
सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अभय शिंगणे आणि महेश वायाळ अशी या दोघांची नावं असून, त्यांची मुंबईत गोरेगाव पोलिस
ठाण्यात चौकशी सुरू आहे. काल एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर पोलीसांनी
तात्काळ कारवाई सुरू करून चोवीस तासात संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
****
पीक विमा कंपनीकडे असलेला नव्व्याण्णव
कोटी रुपयांचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या मागणीसह परभणी
जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, नाफेडनं शिल्लक सोयाबीनची खरेदी करावी,
या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी इथं
गोदावरी नदीपात्रात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन
मागे घेण्यात आलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला
आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा
राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१०
विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित
वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या या दहावीच्या परिक्षांमध्ये
अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात शिक्षण विभागानं सात भरारी पथकांसह एकशे
छप्पन्न बैठी पथकं स्थापन केली आहेत. प्रत्येक केंद्रावर
बैठे पथक पूर्णवेळ उपस्थित राहणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं
पथक कोणत्याही क्षणी परीक्षा केंद्रावर अचानक येऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपली
मातृभाषा जपण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी कटीबद्ध राहू या, असं त्यांनी याबाबतच्या संदेशात
म्हटलं आहे.
****
चॅम्पियन्स चषक क्रिकेट
स्पर्धेत आज अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ब गटातल्या
संघांदरम्याचा हा पहिलाच सामना आहे.
****
No comments:
Post a Comment