Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· आसाममध्ये १८ हजार ५३० कोटींच्या पायाभूत - औद्योगिक विकास प्रकल्पांचं पंतप्रधान
मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन
· ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची
निवड,
एक ते चार जानेवारी दरम्यान साताऱ्यात साहित्यिकांची मांदियाळी
· जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताच्या मीनाक्षी आणि जस्मिन
यांना सुवर्णपदक
आणि
· आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान दरम्यान थोड्याच वेळात सामना
****
भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे
आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज आसाममध्ये
दरांग इथं १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन
आणि भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आसामचा विकास जलदगतीनं
करण्याचा डबल इंजिन सरकारचा निर्धार आहे, संपूर्ण देश आज विकसित
भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवावर्गाचं बहुमोल
योगदान आहे,
असं पंतप्रधान म्हणाले.
****
देशभरात आज हिंदी दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. १९४९
मध्ये आजच्याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतली हिंदी, देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती. आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या
जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. तब्बल ५२ कोटींहून अधिक लोकांची ती पहिली भाषा आहे. हिंदी
दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासीयांना शुभेच्छा
दिल्या आहेत. हिंदी हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर आपली ओळख आणि मूल्यांचा जिवंत
वारसा आहे,
असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक पटलावर
हिंदीला मिळणारा वाढता आदर ही देशासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे असं सांगून
हिंदीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्याचा आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा
संकल्प करूया,
असं आवाहन त्यांनी केलं आहे. तर हिंदी भाषा देशातल्या विविध
भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते, असं अमित शहा यांनी म्हटलं
आहे. शहा यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं पाचव्या अखिल भारतीय राजभाषा
परिषदेचं उद्घाटन झालं.
****
सातारा इथं होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल
भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं ही निवड झाली.
याच बैठकीत सातारा येथील साहित्य संमेलन येत्या एक ते चार जानेवारी २०२६ दरम्यान घेण्याचाही
निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी बैठकीनंतर ही माहिती
दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले हे या संमेलनाचे
स्वागताध्यक्ष आहेत. पानिपत, पांगिरा, संभाजी,
झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्याचं लेखन विश्वास पाटील यांनी केलं
आहे.
****
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज मुंबई येथे सपत्निक आगमन झाले. अहमदाबाद
येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत
केले. यावेळी राज्यपालांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांतर्फे मानवंदना
देण्यात आली तर राजभवन येथे पोहोचल्यावर मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.
उद्या सकाळी ११ वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
घेणार आहेत.
****
जहाल नक्षलवादी शंकर भिमा महाका याला, पोलिसांनी आज गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या तिरकामेटाच्या जंगलातून अटक केली. भामरागड दलमचा
सदस्य,
३२ वर्षीय महाका हा खून, जाळपोळ
आणि भूसुरुंग स्फोटासारख्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी होता. पोलिसांच्या घातपातासाठी
तो तिरकामेटाच्या जंगलात वावरत होता. भामरागड तालुक्यात धोडराज-इरपणार मार्गावरील रस्त्याच्या
कामावरील दोन कोटी रुपये किमतीच्या १९ वाहनांची जाळपोळीत त्याचा कथित सहभाग होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ सप्टेंबर रोजी असलेल्या
७५व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभरातल्या
सर्व शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश, ऑपरेशन
सिंदूर,
पर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये
राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री
दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था
वेगाने विकसीत होत आहे. देशाचा विकास दर ग्रोथ सात टक्के आहे. जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्था
अकराव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर आली असल्याचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, खासदार डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मोदी सरकारने जीएसटी कर रचनेत अमूलाग्र
बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबरपासून नवरात्रीच्या मुहुर्तावर नवीन कर
रचनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी घेतलेल्या
पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज, शिवसेना
- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केंद्र सरकार विरोधात क्रांती चौकात ‘माझं कुंकू
माझा देश आंदोलन’ करण्यात आलं. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे २६ नागरिक
मृत्युमुखी पडले. मात्र, यात सहभागी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देण्यात आल्यानं पक्षाच्या
महिला आघाडीतर्फे ‘सिंदूर’ सोबत घेवून आंदोलन केलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या
नेतृत्वातील या आंदोलनानंतर सिंदूर आणि आपल्या भावना व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान
कार्यालयास टपालानं पाठविण्यात आलं.
****
जायकवाडी धरण ९९ पूर्णांक ३४ शतांश
टक्के भरलं असून, धरणाच्या दहा ते २७ अशा
१८ दरवाजांमधून नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, कोणीही विनाकारण धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
पैठण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळं ऊस पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
दादेगाव-दावरवाडी रस्त्यालगतच्या परिसरतल्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस भूईसपाट झाला.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची
वाहनं नेण्यास आणि चालवण्यास पोलिसांनी बंदी घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईही होणार आहे. दापोली तालुक्यात कर्दे किनाऱ्यावर
एकानं वाळूतून धोकादायक पद्धतीने चारचाकी चालवल्यानं नुकतीच गंभीर दुर्घटना घडली होती.
संबंधिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगानं किनाऱ्यांवर वाहनं नेता
येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक अडथळ्यांची व्यवस्था करण्याची गरज यानिमित्तानं समोर
आली आहे.
****
सोलापूरसह परिसरातील मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मध्यरात्री,
जुना पुना नाका इथल्या नाल्याच्या पुलावर प्रचंड पाण्यात रिक्षा
नेण्याच्या प्रयत्नात रिक्षाचा चालक प्रवाहात
वाहून गेला. त्यानंतर, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील
यांच्यामागे आपला हात असल्याच्या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
प्रमुख शरद पवार यांनी इन्कार केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्वामी नारायण सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाचे एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शिबीरस्थळी
प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. उद्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील मोर्चासाठी
पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार देखील रस्त्यावर उतरणार आहेत, असे रोहीत पवार यांनी सांगितले.
****
मुष्टियुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दोन महिला खेळाडूंनी
सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ब्रिटनच्या लिव्हरपूल इथं आयोजित या
स्पर्धेत,
भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं महिल्यांच्या अठ्ठेचाळीस किलो
वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. पॅरीस ऑलिंपिकची कांस्य पदक विजेती आणि अनेक आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कझाकिस्तानची नझीम कायझाईबे हिला नमवून मीनाक्षीनं हे
मोठं यश मिळवलं. तर, भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक
विजेती जैस्मीन लँबोरियानं महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या
ज्युलिया सेरेमेटाला पराभूत करत विजेतेपदासह सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय भारताच्या
नुपूर श्योराणला ८० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळालं. याच स्पर्धेत पूजा राणीनं कांस्य
पदक पटकावलं.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान
या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. रात्री आठ वाजता खेळाला सुरुवात
होईल. गेल्या फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
****
भारत - चीन दरम्यान आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना
हांगझोऊ इथं सुरू आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजता
सुरू झाला. या अंतिम सामन्यातील विजेता संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं
होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
****
प्रशासकीय क्षेत्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण विकास, सार्वजनिक प्रशासन व नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपमुख्य
कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना यंदाचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार ओमप्रकाश यादव यांना देण्यात
येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी, १७
सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिर पुणे
येथे होणार आहे.
****
शासन आपल्या दारी संकल्पनेतून मिशन वात्सल्य योजनेद्वारे सर्व
विधवा आणि एकल महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती
तटकरे यांनी दिली आहे. कोविड संसर्गजन्य आजाराच्या लाटेत दोन्ही पालक गमावलेली अनाथ
बालकं आणि पती गमावलेल्या विधवांना शासकीय योजनांचा लाभ होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment