Monday, 29 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.12.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 December 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

संरक्षण, विज्ञान, अंतराळ, क्रीडा अशा विविध क्षेत्रांच्या दृष्टीनं २०२५ हे वर्ष भारतासाठी संस्मरणीय ठरलं, अनेक अभिमानाचे क्षण या वर्षानं दिले; आता नवी उमेद आणि नव्या संकल्पासह २०२६ मध्ये पुढे जाण्यासाठी देश सज्ज आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मन की बातच्या १२९व्या भागात काल त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. सरत्या वर्षातील अनेक घटनांचा आढावा घेत त्यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही, हे, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला सांगितलं. प्रयागराज इथं झालेला महाकुंभ, अयोध्येत श्रीराम मंदिरावरचं ध्वजारोहण, वंदे मातरम या गीताची १५०वी वर्षपूर्ती, तसंच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. देशातल्या युवा शक्तीमुळे जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे असं पंतप्रधान म्हणाले. पुढच्या महिन्यात आपण देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत; स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आपल्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण कला आणि समृद्ध संस्कृतीच्या रक्षणासाठी देशाच्या विविध भागात होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. अँटीबायोटिक औषधांच्या अविचारी वापरामुळं निर्माण झालेल्या धोक्याविषयी पंतप्रधानांनी कालच्या मन की बातमध्ये चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधं घ्यावीत असं आवाहनही मोदी यांनी केलं.

****

लातूर-कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, शेतीपूरक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असून व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांनवणे यांनी पत्रात नमूद केलं.

****

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत द्यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा निश्चितीची तारीख बदलण्यात यावी, अशी विनंती मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. या अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानंतर उमेदवारांना वयोमर्यादा निश्चितीसाठी १ नोव्हेंबर, २०२५ ही तारीख निश्चित केल्याने अनेक उमेदवार या परीक्षेत वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र होतील, त्यामुळे ही मागणी करण्यात आल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

****

हिंगोली बसस्थानकात बसच्या चाकाखाली येऊन एका प्रवाशाचा मृत्यू झाला. राजेश अग्रवाल असं त्यांचं नाव असून, ते काल संध्याकाळी नर्सी इथं जाण्यासाठी बसस्थानकावर आले असता ही दुर्घटना घडली.

****

नाशिक शहरातल्या इंदिरानगर पोलिसांनी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या कवठेकर वाडीमध्ये टाकलेल्या छाप्यात सहा बांगलादेशी महिलांसह त्यांना अवैध वास्तव्याकरता मदत देणाऱ्या दलालास पोलिसांनी अटक केली. त्यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

****

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स रोबोटिक्स आणि ऑटोमेशन आणि जान्यू टेक्नॉलॉजीज प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टेककनेक्ट २०२६’ या रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून या स्पर्धेसाठी ३१ डिसेंबर  ते  १५ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

****

कतार मध्ये दोहा इथं सुरू असलेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत  भारताच्या अर्जुन एरिगाइसी आणि कोनेरू हम्पी यांनी काल झालेल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक जिंकले तर मॅग्नस कार्लसन आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांनी विजेतेपद पटकावले. कार्लसनने १० पूर्णांक ५ गुणांसह जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकले.

****

महिला हॉकी इंडिया लीग २०२५-२६ च्या पहिल्या सामन्यात एसजी पाईपर्सने रांची रॉयल्सचा २-० असा पराभव केला. काल रांची इथं झालेल्या सामन्यात एसजी पाईपर्सची कर्णधार नवनीत कौर आणि टेरेसा वियाना यांनी गोल केले. या विजयासोबतच पाईपर्सने त्यांची आघाडी कायम ठेवली आहे.

****

राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली आहे. काल सर्वात कमी सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 December 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी...