Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूची युती तर
काँग्रेस आणि रासपची आघाडी; महायुतीची घोषणा लवकरच होणार-मुख्यमंत्र्यांची माहिती
·
नगरपरिषदा अधिनियम १९६५ मध्ये सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची
मान्यता
·
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी
वाहतुकीला प्रारंभ
·
प्रेषित येशू खिस्ताचा जन्मदिन नाताळनिमित्त सर्वत्र विविध
कार्यक्रमांचं आयोजन
आणि
·
धाराशिव इथल्या लोकसेवा समितीचे विविध पुरस्कार प्रदान
****
मुंबई महापालिकेच्या
आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची
युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचे प्रमुख, उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी काल
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. जागा वाटप आणि अन्य माहिती देणं मात्र दोन्ही
नेत्यांनी टाळलं. याबाबत बोलतांना राज ठाकरे
म्हणाले…
बाईट- राज ठाकरे
उद्धव ठाकरे
यांनी यावेळी बोलतांना, मुंबई सोबत नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी ही युती झाली
असल्याचं स्पष्ट केलं. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू
असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी ही युती झाल्याचं
त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट - उद्धव ठाकरे
****
काँग्रेस
पक्ष राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार
असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जाहीर केलं. रासपचे अध्यक्ष
महादेव जानकर यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात
आली.
दरम्यान, मुंबई महापालिकेची
निवडणूक काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडीसोबत लढवणार असल्याचं,
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काल नागपूर इथं सांगितलं होतं,
मात्र वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य चुकीचं आणि जनतेत संभ्रम निर्माण
करणारं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राज्य समिती सदस्य जितरत्न पटाईत यांनी म्हटलं
आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी आपल्या
अनेक सहकाऱ्यांसह काल शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक इथं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
****
महानगरपालिका
निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल, असं मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फारसा
परिणाम होणार नाही, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
****
महानगरपालिका
निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडे ५ वाजता संपणार आहे.
या मुदतीनंतर कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध करता
येणार नाही, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात
ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासनं सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातल्या
जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत तसंच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी
२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास
कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नगर परिषदा, नगरपंचायती
औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणेचा निर्णय या बैठकीत
घेण्यात आला. या निर्णयामुळे नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला
सदस्यत्व तसंच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या सुधारणेचा अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने
मान्यता दिली.
धाराशिव
शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धविकास
विभागाची एक एकर जागा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. धाराशिवचे पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांनी याबाबत बोलतांना, या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने
दोन कोटीं रुपये मंजूर केले असल्याचं सांगितलं.
****
नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे. आज पहिल्या दिवशी
३० विमानांची ये-जा होणार असून, सुमारे चार हजार प्रवासी यातून प्रवास
करणार आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल वार्ताहर परिषदेत ही
माहिती दिली. प्रवासीसोबतच मालवाहतूक सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या देशांतर्गत असलेली ही सेवा, मार्च महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय
विमानसेवेपर्यंत विस्तारली जाणार आहे.
****
शाश्वततेच्या
तत्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
यांनी म्हटलं आहे. अरावली पर्वतरांगेबाबत उद्भवलेल्या भ्रामक माहितीच्या पार्श्वभूमीवर
ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. काँग्रेस पक्ष याबाबत नागरिकांची
दिशाभूल करत असल्याची टीका यादव यांनी केली. ते म्हणाले…
बाईट - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
दरम्यान, अरावली पर्वतरांगेत
आता नव्या खाणींना परवानगी दिली जाणार नाही. केंद्र सरकारने काल हा निर्णय जारी करत,
सध्या सुरू असलेल्या खाणींसंदर्भात सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचे
निर्देश दिले आहेत.
****
ख्रिस्ती
धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रेषित येशू खिस्ताचा जन्मदिवस, नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. या सणासह नववर्षानिमित्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा
दिल्या आहेत. नाताळनिमित्त सर्वच ठिकाणच्या चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात
आले असून, कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे.
**
नाताळनिमित्त
शासकीय सुट्टी असल्यामुळे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील
बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार आहे.
****
माजी पंतप्रधान
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात
येत आहे. हा दिवस सुशासन दिवस म्हणूनही पाळला जातो.
वाजपेयी
यांच्या जयंतीच्या अनुषंगाने धाराशिव इथल्या लोकसेवा समितीचे विविध पुरस्कार काल प्रदान
करण्यात आले. अंबाजोगाईच्या ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, धाराशिव जिल्ह्यात
पालावरची शाळा चालवणारे चंद्रशेखर पाटील, तसंच लातूरच्या मातोश्री
वृद्धाश्रमाला यावेळी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं हे १६
वं वर्ष आहे.
****
काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचं काल नंदुरबार जिल्ह्यात नवापूर
इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. नाईक यांच्या निधनामुळे अनुभवी मार्गदर्शक
नेतृत्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
विकसित
भारत रोजगार आणि उपजिवीका हमी ग्रामीण हे विधेयक संसदेनं नुकतंच मंजूर केलं, राष्ट्रपतींनीही
त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रातले
कृषी शास्त्रज्ञ पी पी शेळके यांनी या विधेयकातल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केलं.
ते म्हणाले…
बाईट – कृषी शास्त्रज्ञ पी पी शेळके
****
भारतीय
पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता हार्दिक सिंह याची मेजर
ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठीची शिफारसही
करण्यात आली आहे. यामध्ये योग अभ्यासक आरती पाल सह २४ खेळाडूंचा समावेश आहे.
****
कुटुंब
कल्याण मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले, यामध्ये छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव आणि बिल्डा या आयुष्मान उपकेंद्रांचा
समावेश आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी काल सुमारे तेराशेहून अधिक अर्जांची विक्री झाली, तर काँग्रेस
तसंच वंचित आघाडीचे प्रत्येकी एक असे एकूण दोन अर्ज दाखल झाले. लातूर मनपा निवडणुकीसाठी
गेल्या दोन दिवसांत एकूण ५१३ अर्जांची विक्री झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथं
अंगणवाडी सेविकांसाठीच्या ‘पोषण भी, पढाई भी’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल
समारोप झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यावेळी मार्गदर्शन केलं.
****
हवामान
राज्यात
काल अहिल्यानगर इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात बीड इथं नऊ पूर्णांक सहा, नांदेड १० पूर्णांक दोन, परभणी आणि धाराशिव इथं सरासरी ११, तर छत्रपती संभाजीनगर
इथं १२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment