Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
मुंबई मनपासाठी ठाकरे
बंधूची युती तर काँग्रेस आणि वंचितची आघाडी
·
मनपा निवडणुकीसाठी
महायुतीची घोषणा लवकरच होणार-मुख्यमंत्र्यांची माहिती
·
नगरपरिषदा अधिनियम १९६५
मध्ये सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
आणि
·
शाश्वततेच्या तत्वावर
आधारित विकासच अर्थपूर्ण - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचं
प्रतिपादन
****
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. या दोन्ही
पक्षांचे प्रमुख,
उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद
घेऊन ही घोषणा केली. जागा वाटप आणि अन्य माहिती देणं मात्र दोन्ही नेत्यांनी
टाळलं. याबाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले -
बाईट- राज ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना, महाविकास आघाडी कायम असून, मुंबई सोबत नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी ही युती झाली असल्याचं स्पष्ट केलं. उर्वरित महापालिकांच्या संदर्भात एक-दोन दिवसांत शिक्कामोर्तब होईल, तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी ही युती झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - उद्धव ठाकरे
****
काँग्रेस पक्षाने राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद
निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जाहीर केलं. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत आज
झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा
करण्यात आली.
दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस
पक्ष, वंचित बहुजन आघाडीसोबत लढवणार आहे. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज
नागपूर इथे ही घोषणा केली. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक
परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला काँग्रेसच्या
शुभेच्छा, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मनसे सोबत जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असं
वडेट्टीवार यांनी सांगितलं. वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर टीकाही
केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
नाशिक इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश
सोहळा पार पडला.
****
महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल, असं
मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते
आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल
त्यांनी आनंद व्यक्त केला,
पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फारसा परिणाम होणार नाही, असं
मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
****
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी
रोजी सायंकाळी साडे ५ वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित
माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध
किंवा प्रसारित करता येणार नाही. राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही
माहिती दिली आहे.
****
राज्यातील ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासनं
सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे दोन्ही कार्यक्रम मित्रा संस्थेच्या माध्यमातून
राबवण्यात येणार आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत
तसंच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित
करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
मध्ये सुधारणेचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आला. या निर्णयामुळे नगरपरिषदा आणि
नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व तसंच मतदानाचा अधिकार
मिळणार आहे. या सुधारणेचा अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा
पुतळा उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाची एक एकर जागा देण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळाने घेतला. यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील
पिढ्यांपर्यंत पोहोचेल,
असा विश्वास, धाराशिवचे पालकमंत्री
प्रताप सरनाईक यांनी वर्तवला आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने
दोन कोटीं रुपये मंजूर केले आहेत
****
इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज ब्लु बर्ड
ब्लॉक २ या अमेरिकन दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपण करण्यात आलं. या
उपग्रहामुळे भारत आणि अमेरिकेच्या स्मार्टफोन धारकांना वेगवान ब्रॉडबँड सेवा मिळू
शकेल.
****
शाश्वततेच्या तत्वावर आधारित विकासच अर्थपूर्ण असल्याचं, केंद्रीय
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. अरावली पर्वतरांगेबाबत
उद्भवलेल्या भ्रामक माहितीच्या पार्श्वभूमीवर ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष
मुलाखतीत बोलत होते. काँग्रेस पक्ष याबाबत नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका
यादव यांनी केली. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
****
ख्रिस्ती धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रेषित येशू खिस्ताचा
जन्मदिवस, नाताळचा सण उद्या साजरा केला जात आहे. या सणासह नववर्षानिमित्त राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू,
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नाताळनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे लातूरच्या विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग उद्या गुरुवारी बंद राहील.
परवा २६ तारखेला बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरु राहणार आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूपसिंग नाईक
यांचं आज नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
नाईक यांच्या निधनामुळे अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
विकसित भारत रोजगार आणि उपजिवीका हमी ग्रामीण हे विधेयक
संसदेनं नुकतंच मंजूर केलं,
राष्ट्रपतींनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. हिंगोली
जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रातले कृषी शास्त्रज्ञ पी पी शेळके यांनी या
विधेयकातल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले -
बाईट – कृषी शास्त्रज्ञ पी पी शेळके
****
कुटुंब कल्याण मंत्रालयाचे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय
स्तरावरील पुरस्कारांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री
तालुक्यातल्या गणोरीतल्या किनगाव आणि बिल्डा या २ आयुष्मान उपकेंद्रांची २०२५-२६
या वर्षासाठीच्या उत्कृष्ट राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा प्रणाली केंद्र या प्रतिष्ठित
पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
****
उमीद पोर्टलवर वक्फ मालमत्तेसंदर्भातल्या माहितीची नोंद
करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणानं सहा
महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ५ डिंसेबरला संपली होती. ती वाढवून देण्याची
मागणी राज्य वक्फ मंडळानं केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट
करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी आज दिले आहेत. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना वेळेत आणि
प्रभावीपणे मिळवून द्यावा असे निर्देश बीडचेजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी
संबंधितांना दिले आहेत. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या
बैठकीत ते बोलत होते.
****
हवामान
राज्यात आज अहिल्यानगर इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नाशिक इथं नऊ पूर्णांक पाच,
जळगाव इथं नऊ पूर्णांक सात, तर पुण्यात नऊ
पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद
झाली.
मराठवाड्यात बीड इथं नऊ पूर्णांक सहा, नांदेड १० पूर्णांक
दोन, परभणी ११, धाराशिव ११ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर इथं
१२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment