Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२४ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरोने
LVM-3 उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने
‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ या दूरसंवाद उपग्रहाचं
यशस्वी प्रक्षेपण करत, ऐतिहासिक टप्पा गाठला
आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी हे
प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकेच्या ‘AST स्पेस मोबाइल’ या कंपनीचा
हा उपग्रह सहा हजार १०० किलो वजनाचा असून, तो थेट स्मार्ट फोनपर्यंत हाय-स्पीड 4G आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बनवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या
प्रक्षेपणामुळे दुर्गम भागात इंटरनेट सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या उपग्रहामुळे टॉवर
आणि फायबरशिवायचं उपग्रहाच्या माध्यमातून थेट मोबाईल कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार असून, इंटरनेटच्या विश्वात नवी क्रांती
घडणार आहे.
जागतिक समुदायासाठी हे एक महत्वाचं
योगदान असल्याचं इसरोचे अध्यक्ष डॉ. व्ही नरायाणन यांनी म्हटलं आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल
त्यांनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागातलं प्रक्षेपण
वाहन पथक तसंच AST स्पेस मोबाइल च्या उपग्रह प्रकल्प
पथकाचं अभिनंदन केलं. श्रीहरिकोटा इथून झालेलं हे एकशे चारावं प्रक्षेपण असून, एलव्हीएम थ्री प्रक्षेपण वाहनाची
ही नववी सलग यशस्वी मोहीम आहे, ज्यामुळे या वाहनाची १०० टक्के विश्वसनीयता
अधोरेखित झाली असल्याचंही नारायणन यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या
यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक करत, हा भारतासाठी एक महत्त्वाचा
टप्पा असल्याचं म्हटलं आहे. LVM3 च्या हेवी-लिफ्ट यशामुळे
गगनयान मोहिम, व्यावसायिक प्रक्षेपणे
आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत झाली असून, भविष्याच्या पिढ्यांसाठी आत्मनिर्भरता वाढवण्यास मदत होईल, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत
जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष १९८६
मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या
ऐतिहासिक घटनेनिमित्त हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.
****
समुद्रप्रताप ही भारतातली पहिली स्वदेशी
बनावटीची प्रदूषण नियंत्रण नौका काल गोवा शिपयार्ड लिमिटेड इथं औपचारिकपणे भारतीय तटरक्षक
दलात दाखल झाली. या अत्याधुनिक नौकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, रिमोट कंट्रोल गन्सद्वारे चालणारी
एकात्मिक अग्निशमन प्रणाली तसंच इतर महत्त्वाची सागरी प्रदूषण नियंत्रण साधने यांचा
समावेश आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांनुसार डिझाइन आणि विकसित
करण्यात आलेली ही नौका सागरी प्रदूषण नियंत्रण, सागरी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, आणि भारताच्या आर्थिक स्वामित्व सागरी
क्षेत्राच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
****
देशात प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये
भरती होण्याचं प्रमाण ८९ टक्क्यांपर्यंत वाढल्यानं माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली
आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी
नड्डा यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात धार आणि बेतूल जिल्ह्यांमधल्या
वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. सुमारे ५६० कोटी रुपये
खर्चून ही महाविद्यालयं उभारली जाणार असून, खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून ती चालवली जाणार आहेत.
****
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शासनाच्या
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. धान, मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना
याचा फायदा मिळेल.
****
अकोला इथं विमान पायलट प्रशिक्षण
केंद्राला मंजुरी मिळाली आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला
होता. या प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळणार
असल्याचा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला. हे पायलट प्रशिक्षण केंद्र येत्या चार
महिन्यांत सुरू होणार असून, केंद्र सरकारने संबंधित
संस्थेला अधिकृत मंजुरी दिली आहे.
****
नांदेड इथल्या नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण
यांचं आज निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. मराठवाडा
विद्यापीठाच्या नांदेड उपकेंद्राचे ते अनेक वर्षे संचालक होते.
****
राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि
तत्सम अंमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज झाला
आहे. यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातल्या अधिकाऱ्यावर
निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
****
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या
प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धीसाठी जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आणि प्राधान्याने
काम करावे, विशेषतः जिल्हा परिषदांनी या अभियानाला
सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश ग्रामविकास
आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते
बोलत होते. पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी
यांनी समन्वयाने काम केल्यास अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment