Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज मुंबईतील सायन कोळीवाडा इथल्या गुरु नानक सभा गुरुद्वारामध्ये वीर बाल दिवसानिमित्त
आयोजित कीर्तन सत्संगाला उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गुरुद्वारा
गुरु तेग बहादूर दरबार' इथं 'गुरु ग्रंथ साहिब'समोर नतमस्तक होत अभिवादन
केलं. वीर बाल दिवस हा शीखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहजी यांचे
वीर शहीद साहिबजादे यांच्या अद्वितीय बलिदानाला नमन करण्याचा दिवस असल्याचं मुख्यमंत्री
फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गुरु गोविंद सिंहजी यांच्या
संपूर्ण परिवाराने दिलेले बलिदान हे भारताच्या तसेच जागतिक इतिहासातील अतुलनीय उदाहरण
असून, इतक्या मोठ्या त्यागानंतरही गुरु गोविंद सिंहजी आपल्या ध्येयापासून कधीही विचलित
झाले नाहीत असं ते म्हणाले. गुरु गोविंद सिंहजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या
संरक्षणासाठी अढळ राहण्याचा संदेश संपूर्ण जगाला दिला असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्याचा महत्त्वाकांक्षी
प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग पूर्वीच्या रेखांकानुसारच तयार करावा, अशी मागणी
पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या
भागातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान, सरकारने जो महामार्ग बदलण्याचा
निर्णय घेतला तो योग्यच आहे, सरकारच्या या नव्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना
याचा फायदा होणार असल्याचं, भाजपचे किसान मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी म्हटलं
आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात सोलापूरपासून
बदल करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातील
शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध नसून जमिनी द्यायला तयार असल्याचं म्हटलं आहे.
****
भारतातील परकीय चलनसाठ्यात
वाढ झाली असून १९ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात चलनसाठा चार पुर्णांक तीन अब्ज अमेरिकन
डॉलरनं वाढून ६९३ पुर्णांक तीन अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. तर सोन्याचा साठा दोन पुर्णांक सहा अब्ज डॉलर्सनं
वाढून तो ११० पुर्णांक तीन अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे.
****
विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये
पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष
मोहिम सुरू आहे. यामुळे आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती
अर्थ मंत्रालयानं काल दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल
फंड, लाभांश, समभाग आणि सेवानिवृत्तीचे लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती. भारतीय
बँकांमध्ये अशा प्रकारचे ७८ हजार कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला
नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नगरपालिका नगराध्यक्षांविरोधात
अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत राज्य शासनानं कडक तरतुदी लागू केल्या आहेत. नगराध्यक्षांवर
अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याठिकाणी सदस्यांना संधी दिली जाणार नसून तिथं थेट
फेरनिवडणुकीचीच तरदूत आहे. जिथं एका पक्षाचा
नगराध्यक्ष निवडून आला असला तरी बहुमत मात्र दुसऱ्याच पक्षाला मिळालं अशा ठिकाणी नगराध्यक्षांवर
अविश्वासाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, यावर आळा घालण्यासाठी नियमांत
तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षांनी पदग्रहण केल्यानंतर पहिल्या एका
वर्षात तसंच कार्यकाळाच्या अखेरच्या सहा महिन्यांत अविश्वास प्रस्ताव सादर करता येणार
नाही, अशी तरतूद नियमांत करण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार राजकीय अस्थिरता निर्माण
होण्यास आळा बसणार आहे. नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचा असल्यास कायद्यात
नमूद केलेल्या कठोर अटींची पूर्तता करणं बंधनकारक राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, अविश्वास प्रस्ताव
मंजूर झाल्यास नगराध्यक्षांचं पद रिक्त होईल आणि त्यानंतर थेट फेरनिवडणूक घेतली जाईल.
****
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक
असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुकादेवीचं दर्शन घेण्यासाठी नाताळच्या सुट्यांमुळे
भाविकांची गर्दी वाढली आहे. २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं.
दररोज रात्री साडे आठ वाजता मंदिर बंद होतं, मात्र गेल्या दोन दिवसांपासून
रात्रीच्या साडे नऊवाजेपर्यंत दर्शन सुरू असल्यानं आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन
मंदिर समितीनं रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय
घेतला आहे.
सध्या पहिल्या पायरीपासून
गर्दी होत असून दर्शनासाठी दीड तास लागत आहे. स्कायवॉकचं काम आणि श्री परशुराम मंदिराच्या
पायऱ्यांचं काम सुरू असल्यानं नेहमीच्या एकाच मार्गाने ये-जा सुरू आहे. भाविकांचं कमी
वेळेत दर्शन व्हावं, दर्शनाच्या रांगेत घुसखोरी रोखता यावी, यासाठी २०
स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा
परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं ५३ व्या तीन दिवसीय जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचं
आयोजन परवा २९ डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे उद्घघाटन छत्रपती संभाजीनगर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांच्या उपस्थितीत होईल.
****
No comments:
Post a Comment