Wednesday, 31 December 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 December 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं आज दिल्ली इथं प्रकाशन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणा या दिनदर्शिकेतून प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईने दहावी आणि बारावी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा येत्या ११ मार्चपासून, तर बारावीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या दोन्ही परीक्षा आधी ३ मार्चपासून सुरु होणार होत्या, प्रशासकीय कारणांमुळे तारखांमध्ये बदल करण्यात आल्याचे सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.

****

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. खर्चाची मर्यादा वाढवली असली तरी त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्रमाचे छायाचित्र, खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत बिलं जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपेसाठी १५ लाख रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपेसाठी ९ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खर्चाच्या नोंदीत उशीर झाला किंवा तफावत आढळल्यास उमेदवारांना नोटीस बजावली जाणार असून, गंभीर उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशारा आयोगानं दिला आहे.

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. सकाळी ११ वाजेपासून छाननीला सुरुवात झाली. आज छाननी झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी ८७ जागांसाठी १ हजार २१ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. काल रात्री उशिरा पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती.

****

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागांसाठी २ हजार ३५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक ११८ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्या खालोखाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ८२ जागांवर, शिवसेनेचे ८० जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ जागांवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  ३४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ३१ जागांवर उमेदवार दिले आहेत.

****

उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे रेल्वे आणि विमानसेवा विस्कळित झाली आहे. दिल्लीसाठीच्या जवळपास ३०० हून अधिक विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याचं वृत्त आहे. १४८ उड्डाणं रद्द करण्यात आली असून २०० उड्डाणं उशिराने होत आहेत तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. खराब दृश्यमानतेमुळे काही रेल्वेगाड्या संथ गतीनं धावत आहेत, त्यामुळं त्यांच्या वेळांमध्ये बदल करत आल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे.

****

समाजमाध्यमांवर एआय-निर्मित छायाचित्र आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीतून राष्ट्रीय जल पुरस्कार मिळवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय ‘जल संचय – जन भागीदारी’ पुरस्कारांचं मूल्यांकन केवळ जेएसजेबी डॅशबोर्डवरील अधिकृत नोंदींवर आधारित करते. या प्रक्रियेत जीआयएस निर्देशांक, जिओ-टॅग छायाचित्रं आणि आर्थिक तपशील यांच्या माध्यमातून प्रत्येक जल पुनर्भरण संरचनेचा मागोवा घेतला जातो. जिल्हाधिकारी आणि जलशक्ती मंत्रालयामार्फत बहुस्तरीय तपासणी केली जाते. त्यानंतरच पुरस्कारासाठी शिफारस केली जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी यानं विश्व ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत कांस्‍य पदक जिंकलं. यापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतही अर्जुननं कांस्यपदक पटकावलं होतं. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगसीचं अभिनंदन केलं आहे. अर्जुनचं कौशल्य, संयम आणि बुद्धिबळावरील अपार जिद्द अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी अर्जुनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

****

राज्यात एक ते 31 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसंच विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्यानं रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती आणि जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” ही यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना आहे.

****

No comments: