Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३० डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आघाडीचे अर्थतज्ज्ञ आणि निती आयोगाच्या सदस्यांसोबत सविस्तर
चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित राहणार
आहेत. सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा भाग असलेल्या या चर्चेत देशासमोरील विविध वित्तीय
मुद्दे, सध्याची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील
प्राधान्यक्रम यावर सखोल विचारमंथन होणार आहे. अर्थसंकल्प अधिक समावेशी, विकासाभिमुख आणि वास्तववादी बनवणे
हा या बैठकीचा उद्देश आहे. तज्ज्ञांनी मांडलेल्या सूचनांमुळे वित्तीय धोरण आखताना सरकारला
दिशा मिळणार असून, उद्योग, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्याला
चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
***
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास
संस्था, डिआरडीओच्या मदतीनं तयार केलेल्या
पिनाक या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी झाली. या अग्निबाणाची
क्षमता १२० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक साधण्याची असून, चाचणीमध्ये अग्निबाणानं हे लक्ष्य
पूर्ण केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल डीआरडीओचं अभिनंदन
केलं आहे.
***
मुंबईत भांडुप इथं बेस्टच्या बस चालकाकडून
बस मागे घेताना बसखाली १३ जण चिरडले गेले. यात ४ जण ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. काल
रात्री साडे नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं
समजतं. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या
वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
***
राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी
अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल
आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध
होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.
दरम्यान, विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये
पक्षांतर तसंच युती सारख्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक
घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत.जागा वाटपाच्या हालचालींनाही वेग आला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या
निवडणुकीसाठी काल पर्यंत शिवसेनेच्या वतीने ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
***
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी
महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे
उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार असं वाटप करण्यात आलं आहे.
***
कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत
झालं असून ८१ पैकी भाजपा ३६ जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेनेला ३० तर राष्ट्रवादी
काँग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फुट पडली असून राष्ट्रवादी
काँग्रेस शरचंद्र पवार पक्षानं तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळं कोल्हापुरात
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस
पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. तर महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे.
***
महाराष्ट्र लोकसेवा आयोग-एमपीएससीच्या
अध्यक्षपदी भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना
जारी केली आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून पुढील सहा वर्षे किंवा वयाची
६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.
***
बीड जिल्हा परिषदेतील वाहनचालक असलेल्या
चौघांना कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर परिचर अर्थात सेवक या
पदावर कार्यरत असलेल्या ३५ जणांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गात पदोन्नती देण्यात
आली आहे.
***
दरम्यान, बीड जिल्हा परिषदेतील गेल्या तीन
वर्षापासूनचे जिल्हा शिक्षक पुरस्कार उपमुख्यमंत्री
तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या वितरित केले जाणार आहेत. २०२३ ते २०२५
या तीन वर्षांसाठी ६४ शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात प्रत्येक जिनिंगवर
शेतकऱ्यांच्या कापूस ऑनलाईन प्रक्रियेची व्यवस्था करण्याची मागणी राजेंद्र आमटे यांनी
केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतः करता येत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना
करावा लागतो त्यामुळे प्रत्येक जिनिंगवर शेतकऱ्यांच्या वतीने ऑनलाईन नोंदणी, सातबारा अपलोड, बाजार समितीची संमती आणि स्लॉट बुकिंग
ही संपूर्ण प्रक्रिया जिनिंगमार्फतच करून देण्याची व्यवस्था करावी असं त्यांनी म्हटलं
आहे.
****
No comments:
Post a Comment