Monday, 29 December 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 December 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

·      पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी

·      अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

·      व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल

आणि

·      फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अर्जुन एरिगेसी तसंच कोनेरू हम्पी यांना कांस्यपदक

****

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये पक्षांतर तसंच युती सारख्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत.

मुंबईत काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीने सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवलं आहे. आमदार सना मलिक यांनी आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, एकूण १०० जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा महायुतीने द्यावा अशी मागणी, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज सात उमेदवारांची यादी जाहीर केली. 

**

ऑल इंडिया एमआयएम पक्षाने ठाणे महानगरपालिकेसाठी पाच, तसंच वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. आपला पक्ष भिवंडी निजामपूर तसंच तळोजा इथंही उमेदवार देणार असल्याचं पक्ष प्रवक्ते इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

**

पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार यांनी आज ही घोषणा केली.

तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आघाडीची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे सचिन आहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १६५ नगरसेवक असलेल्या पुणे महापालिकेत काँग्रेस ६० जागा, तर ठाकरे गटानं ४५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागांबाबत पुढील चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. तसंच, पुण्यात मनसेलाही आघाडीत सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

**

जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३७ जागा लढवणार आहे.

अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० उमेदवारांची, तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाने १७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

इचलकरंजी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याचं कारण देत पक्षाने स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या शिव शाहू विकास आघाडीतून माघार घेतली.

**

धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये युती न होऊ शकल्यामुळे अखेर शिवसेनेने स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख सतिष महाले यांनी आज ही माहिती दिली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील स्वतंत्रपणे धुळे महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, धुळ्यात आघाडी एकत्रितपणे लढणार असून कॉंग्रेस ३०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-मनसे ३० तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १४ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

**

शिवसेनेनं प्रकाश महाजन यांची प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. महाजन यांनी नुकताच मनसे मधून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला.

**

परभणी महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी शहरातल्या १४६ ठिकाणी ३४१ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर राखीव कर्मचाऱ्यांसह अठराशे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना पाच जानेवारीला पहिलं प्रशिक्षण तर १० जानेवारीला दुसरं प्रशिक्षण देण्यात येणार असून, यासाठी ७९ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

****

अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. अरावली पर्वत रांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली, आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एजी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे, आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं.

नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार, अरावली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीतकमी १०० मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अरावली पर्वतरांगांच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मागितलेली सर्व मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात अर्थतज्ञ आणि त्या क्षेत्रातल्या तज्ञांची मते ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक बैठक घेणार आहेत. निती आयोगाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयोगाचे इतर सभासद या बैठकीला हजर असतील.

****

ग्रामीण रोजगारासाठीच्या व्हीबी जी राम जी या कायद्यामुळे राज्य सरकारांना गेल्या सात वर्षांच्या तुलनेत १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे, तसंच राज्यांच्या निधी वितरणात देखील सुधारणा होईल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे. उत्पादक मालमत्ता निर्मितीला चालना देणं, उत्पन्नात वाढ करणं तसंच नियमन प्रणाली कार्यक्षम करणं हे या कायद्यामुळे साध्य होणार आहे. पारदर्शकता, नियोजन, तसंच जबाबदारी ठरवून रोजगार निर्मिती केल्यामुळे आधीच्या कायद्यातल्या संरचनात्मक त्रुटी नव्या कायद्यामुळे दूर होतील, असं एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर सौम्य कांती घोष यांनी म्हटलं आहे.

****

कतारमधील दोहा इथं झालेल्या फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी याने १३ पैकी साडेनऊ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले, तर महिला गटात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिनं ११ पैकी साडेआठ गुणांसह तिसरं स्थान पटकावलं. अर्जुनसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असून, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक रॅपिड स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. हम्पीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत सातत्य दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अर्जुन आणि कोनेरू हम्पी यांचं अभिनंदन केलं आहे.

****

नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला.

****

लातूर-कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, शेतीपूरक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, या महामार्गाच्या माध्यमातून व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांनवणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत द्यावी किंवा त्यानुसार वयोमर्यादा निश्चितीची तारीख बदलण्यात यावी, अशी विनंती आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानंतर उमेदवारांना वयोमर्यादा निश्चितीसाठी एक नोव्हेंबर, २०२५ ही तारीख दिल्याने अनेक उमेदवार या परीक्षेत वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र होतील, त्यामुळे ही मागणी करण्यात आल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

****

बीड इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाची सुरूवात कीर्तन महोत्सवानं करण्यात येत आहे. यासाठी ३१ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं किर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यात विदर्भात बर्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं नऊ पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक पाच, तर धाराशिव इथं १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: