आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१८ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
समाजातल्या क्षमतांबरोबरच
व्यवस्थांचं एकत्रीकरण करण्याची गरज व्यक्त करतानाच देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी
सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं नीति आयोगानं आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ऑफ चेंज कार्यक्रमात स्टार्ट अप योजनत
सहभागी झालेल्या दोनशे नवउद्योजकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत
होते. विविध क्षेत्रातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवा उद्योजकांनी नवीन कल्पना
आणि उपाय सुचवावेत असंही आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पथकर
संकलनासाठी फास्टॅग्जची उपलब्धता वाढावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मोठं
पाउल उचललं असून, या फास्टॅगजची ऑनलाईन तसंच ऑफलाईन विक्री करण्यात येणार आहे. ऑफलाईन
विक्रीसाठी पथकर नाक्यांजवळ सामायिक सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, तर प्राधिकरणाच्या
आणि हे टॅग्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँकांच्या संकेतस्थळावर या टॅग्जची ऑनलाईन खरेदी
करता येईल, असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात
सांगितलं आहे.
****
जमिनींच्या दस्तऐवजांचं संपूर्ण
संगणकीकरण १५ ऑगस्ट पर्यंत करण्याची राज्य सरकारची योजना तांत्रिक अडचणींमुळे रखडली
असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. माहितीचे तपशील भरताना मोठ्या प्रमाणावर त्रुटी
होत असून, हे प्रमाण साधारण ३० टक्के असल्यानं कामात विलंब होत आहे. १५ ऑगस्टपर्यंत
संपूर्ण ४३ हजार ९४३ गावांमधल्या जमिनीचं संगणकीकरण पूर्ण होणं अपेक्षित असताना १४
ऑगस्टपर्यंत फक्त तीन हजार ८९३ गावांचं काम पूर्ण झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या २२ तारखेला बँक कर्मचारी
संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. बँकींग क्षेत्रात सुधारणांच्या नावाखाली खाजगीकरणाला
वाव दिला जात असल्याच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.
****
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीच्या
विशेष फेरी अंतर्गत आज आणि उद्या या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित
करावयाचे आहेत. विशेष फेरीच्या यादीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं
अनिवार्य असून, प्रवेश रद्द करता येणार नसल्याचं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे
कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment