Wednesday, 2 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

रिजर्व्ह बॅंकेनं आपल्या दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलन विषयक धोरण समितीनं हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे रेपो दर आता सहा पूर्णांक २५ वरून सहा टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्क्यांवरून पाच पूर्णांक ७५ टक्के झाला आहे. गेल्या सहा वर्षांमधला हा नीचांकी दर आहे. या निर्णयामुळे गृहकर्जाच्या व्याजदरातही कपात होण्याची शक्यता असल्यानं, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

****

देशभरातील ११ लाख ४४ हजारांहून अधिक पॅनकार्ड बंद किंवा रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. हे कार्ड एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अधिक वेळा जारी केलेली असल्यानं, ही कारवाई करण्यात आली असल्याचं, गंगवार यांनी सांगितलं.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सरकारने दहा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. सनातन संस्थेचे कार्यकर्ते विनय पवार आणि सारंग अकोलकर हे दोघे पानसरे हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातही या दोघांचा तपास सुरू आहे.

****

राज्य रस्ते विकास महामंडळ -एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत एका महिन्यात संपूर्ण चौकशी करून, ते दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. मोपलवार यांनी एका व्यक्तीशी मोबाईलवर केलेल्या संभाषणाची ध्वनीफीत एका दूरचित्रवाणी वाहिनीने प्रसारित केली आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करून मोपलवार यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करता यावी आणि ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण व्हावं यासाठी प्राईज चिट ॲन्ड मनी सर्क्युलेशन या मूळ कायद्यात सुधारणा करण्याची सूचना प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिली.
शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकविताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. तथापि, या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातील डेंग्यू आणि हिवतापासारख्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितलं. नांदेड जिल्ह्यात डेंग्यू तसंच हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात सदस्य अमिता चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात सावंत यांनी ही माहिती दिली. या आजाराच्या रूग्णांसाठी प्लेटलेट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, त्या कमी पडल्यास तत्काळ पुरवठा केला जाईल असं सावंत यांनी सांगितलं. राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं जिल्हाधिकारी स्तरावर भरण्याचे आदेश दिले असल्याचं ते म्हणाले.

****

ग्रामपंचायत इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली दहा लाख रुपयांची तरतूद वाढवण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

****

लोकशाही ही फक्त एक राजकीय व्यवस्थाच नसून ती जीवन पद्धती आहे. ती रुजवण्याची क्रिया निरंतर चालू राहिल्यास लोकशाही मजबूत राहील, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप कार्यक्रमात मुंडे बोलत होते.

****

औरंगाबादेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लवकरच कार्यालयीन कामकाज पध्दतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागानं विद्यापीठास गेल्या २० जून रोजी सादर केलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून विद्यापरिषदेनं सदरील अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या अभ्यासक्रमात विद्यापीठ तसंच महाविद्यालयातल्या कार्यालयीन कामकाज पध्दती, विद्यापीठ कायदा, कार्यालयीन स्थिती या बाबी समाविष्ट आहेत.

****

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जेदार संशोधन याबाबत तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर बी.ए.चोपडे यांनी दिला आहे. कुलगुरुंनी विद्यापीठातल्या सर्व प्राध्यापकांशी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

****

No comments: