Thursday, 17 August 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 17.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                Language Marathi         

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

**   मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप पिकं संकटात

**   गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या दरात केंद्र सरकारकडून सुमारे ७० टक्के कपात

**   बैलगाडी शर्यतींसंदर्भात नियमावली तयार होईपर्यंत अशा आयोजनाला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

      आणि

**   मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर नसल्याचा खासदार राजू शेट्टी यांचा आरोप



****

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाला. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण घसरलं आहे. विभागात आतापर्यंत ६० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातली खरीप पिकं संकटात सापडली आहेत. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांत उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण, चांगलं असलं तरी, पावसात खंड पडल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसात मराठवाड्यात ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, गेल्या एक जानेवारीपासून ही संख्या आता ५८० झाली आहे.

दरम्यान, येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

****

चालू आर्थिक वर्षात दीर्घकालीन जलसिंचन निधीसाठी नऊ हजार वीस कोटी रुपयांपर्यंत अर्थसंकल्पीय संसाधनं उभारण्यास, केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डच्या रोख्यांच्या माध्यमातून हा निधी उभारला जाईल. नाबार्डतर्फे राज्यांना वार्षिक सहा टक्के दरानं कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार असून, प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रकल्पाअंतर्गतच्या ९९ सिंचन लाभ प्रकल्पांना गती देण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल.

****

हृदयात बसवण्यात येणाऱ्या स्टेंटनंतर आता गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या दरात केंद्र सरकारनं ७० टक्के कपात केली आहे. पूर्वी या शस्त्रक्रियेचा दर, एक लाख १४ हजार रुपये इतका होता, तो आता तो सुमारे ५५ हजार रुपये इतका निर्धारित करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे दीड ते दोन कोटी रुग्णांना गुडघे बदलाची शस्त्रक्रिया करावी लागते, या रुग्णांना या निर्णयाचा फायदा होणार असून, वार्षिक एक हजार पाचशे कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. कर्करोग तसंच ट्यूमर वरील उपचार साधनांच्या किमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे.

****

बैलगाडी शर्यतींसंदर्भात सरकार जोपर्यंत नियमावली बनवत नाही तोपर्यंत बैलगाडी शर्यतींच्या आयोजनाला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला मनाई केली आहे. प्राण्यांना पोहाचणाऱ्या इजेच्या संदर्भात अद्याप नियमावली तयार केली नसल्यामुळे मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एन.एस.जामदार यांच्या पीठानं हा मनाई आदेश दिला. या संदर्भात दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले आहेत. दरम्यान, या नियमावलीचा मसूदा तयार असून, संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी तो मसूदा संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर सांगितलं.

****

मराठा आरक्षणापाठोपाठ बैलगाडी शर्यतीबाबतही उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चहाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. काही लोक संधीसाधू असतात, त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही, असं ते म्हणाले. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षात कथित प्रवेशाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

****

राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेचा निकाल पाहता येईल असं महाराष्ट्र परीक्षा नियामक मंडळाचे नियंत्रक आर.के.रहाणे यांनी सांगितलं आहे.

****

देशातल्या ग्रामीण भागातले पोस्टमन आणि इतर कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कमलेश चंद्र आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करा, सातवा वेतन आयोग तसंच निवृत्ती वेतन लागू करावं, या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

****

पारशी नववर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज साजऱ्या होत असलेल्या पतेती या पारशी नववर्षारंभानिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीसंदर्भातर सरकार गंभीर नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ते काल सिल्लोड इथं कर्जमुक्ती शेतकरी मेळाव्यात बोलत होते. दुष्काळी भागात तत्काळ पंचनामे करून मदत केली नाही, तर मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांवर कर्ज होणे ही शेतकऱ्यांची चूक नसून तर ती सर्वस्वी जबाबदारी सरकारची असल्याचं शेट्टी म्हणाले.
                                           ****

लातूर जिल्ह्यात खरीप पिकं जगवण्यासाठी मांजरा प्रकल्पातून पाणी सोडावं अशी मागणी मराठवाडा विकास मंडळ आणि लातूर, उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीनं केली आहे. समितीचे सदस्य बी.बी.ठोंबरे यांनी यासदंर्भात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदन दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मांजरा धरणातून लातूर, कळंब, अंबाजोगाई आदी शहरांना पाणीपुरवठा होत असल्यानं, त्यासाठी वार्षिक २५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खरीपासाठी ४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यानंतरही धरणात वर्षभर पुरेल एवढं पाणी शिल्लक राहणार असल्याचं, ठोंबरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी अत्यल्प पाऊस झालेल्या वडीवाडी, कार्ला, माळी पिंपळगाव आणि हिसवण या गावांना भेटी देऊन, पीक परिस्थितीची पाहणी केली. कापुस, सोयाबीन, मुग, उडीद  यासह फळ पिकंही हातची गेली आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत तातडीनं उपाययोजना करण्यात येतील, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. कारला हे गाव उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याबद्दल सरपंच कैलास बाभुळकर यांचा लोणीकर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

****

जलयुक्त शिवार प्रमाणेच शासनानं नव्यानं सुरु करण्यात आलेल्या, चारायुक्त शिवार, आणि मासळीयुक्त तलाव या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महोदव जानकर यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात मुलींच्या नियोजित वसतीगृहाचं भूमिपूजन जानकर यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. देवणी इथल्या वळू संशोधन केंद्रासाठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं सांगून, हा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळपास २५ गावांत काल दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन दशांश एक इतकी नोंदली गेली. लातूरपासून १५० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचं केंद्र होतं

****

मराठवाड्यातल्या संशोधक विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर बी..चोपडे यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं विद्यापीठ उपकेंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ञानाचं प्रतीक असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवण्याचं आवाहनही, कुलगुरूंनी केलं. यावेळी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले आहेत. महाराजस्व अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौका इथं आयोजित समाधान शिबिरात ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

नागपूर-मुंबई-नागपूर नंदिग्राम एक्सप्रेसला नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या बोधडी बुजुर्ग इथं थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे. हा थांबा सहा महिन्याच्या कालावधीसाठीच असेल, असं दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातर्फे आयोजित स्वच्छ रेल - स्वच्छ भारत - दर दिवशी स्वच्छते कडे’ या पंधरवड्याला काल नांदेड रेल्वे स्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अखिलेश कुमार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात, नांदेड विभागातली सर्व स्थानकं, रेल्वे कार्यालयं तसंच रेल्वे गाड्यांमध्ये या अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत काल औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, हिंगोली, मुदखेड, किनवट, आदी रेल्वे स्थानकावर स्वच्छता करण्यात आली.

****

परभणी शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळपास सव्वा तास हा पाऊस झाला, या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...