Thursday, 3 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 3 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केला.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मोपलवार यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. यामुळे झालेल्या गोंधळामुळे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आलं. मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांची एका महिन्यात चौकशी करण्यात येईल, तोपर्यंत त्यांना पदावरून दूर केलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषित केलं.

राज्यातल्या लातूरसह १४ जिल्ह्यात लहान मुलींची तस्करी सुरू असून, सरकारचं लक्ष कुठे आहे, असा सवाल लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी ३०० मुलींची तस्करी करणारी महिला कॉंग्रेसची कार्यकर्ती असल्याचा आरोप केला. या तस्करी प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं कामगार मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. गेली १५ वर्षे हा गोरख धंदा सुरू असून,  आता यावर आमचं सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले.

कर्जमुक्ती आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारनं तात्काळ रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली. शिवसेनेचे सर्व आमदार यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विधानपरिषदेतही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी गदारोळ केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर आज दुसर्या दिवशीही बहीष्कार घातल्यामुळे गणसंख्येअभावी कामकाज दोन वेळा तहकूब झालं.

सत्ताधार्यांचा कामकाजावर बहीष्कार हा संसदीय लोकशाहीतला काळा दिवस असून, विरोधकांनी सभागृहात लोकांचे प्रश्न उपस्थित करायचे नाही का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला.

****

लोकसभेत आज बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करणारं विधेयक आवाजी मतदानानं पारित करण्यात आलं. बँकांच्या थकीत कर्ज मालमत्तेशी संबंधित किंवा पुनर्रचित गंभीर प्रकरणं हाताळण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला संबंधित कर्ज प्रकरणांसंदर्भात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी संबंधित बँकांना निर्देश देण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत. अशी थकीत प्रकरणं निकाली काढण्यासाठी सल्ला देण्याकरता समिती किंवा प्राधिकरण स्थापन करण्याचे अधिकारदेखील रिझर्व्ह बँकेला या विधेयकामुळे प्राप्त होणार आहेत.

****

पॅरालिम्पिक खेळांमधे सुवर्ण पदक पटकावलेला देवेंद्र झाझरीया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांची क्रिडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड समितीनं शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस केली आहे. यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रित कौर, पॅरालिम्पिक पदक विजेता मरीयप्पन थंगवेलू आणि वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया आणि हॉकीपटू एस व्ही सुनिल यांच्या नावाची शिफारस केली आहे. यावर अंतिम निर्णय क्रिडा मंत्रालय घेणार आहे.

****

आधार क्रमांकाशी सरकारी योजना जोडण्याच्या महत्वाकांक्षी उद्दीष्टाअंतर्गत आता शासकीय अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई इथं महाडीबीटी आणि महावास्तू या महत्वपूर्ण प्रणालींची सुरुवात झाली. त्यात एक थेट लाभ हस्तांतरण योजना असून, दुसरी बांधकाम व्यवस्थापनाबाबत योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा होईल, तसंच बांधकामासंबंधीची परवानगी घरबसल्या ऑनलाईन मिळणं शक्य होणार आहे. सामाजिक न्याय, उच्च आणि तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक, शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागासंबंधी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होईल.

****

महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अवैध लॉटरीवर कारवाई करण्यास मान्यता देणारा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबई इथं झालेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं महाराष्ट्र लॉटऱ्यांवरील कर अधिनियम २००६ रद्द झाला असून, या पार्श्वभूमीवर राज्य लॉटरी संचालनालयाला येणाऱ्या अडचणींचा आढावाही मनुगंटीवार यांनी यावेळी घेतला.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवस अखेर भारताच्या तीन बाद ३४४ धावा झाल्या. चेतेश्वर पुजारा १२८ आणि अजिंक्य रहाणे १०३ धावांवर नाबाद आहेत.

****

No comments: