Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 4 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे.
सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत संसदेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी
होणार आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे
उमेदवार एम व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्ष आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यात
ही निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ
येत्या १० ऑगस्टला पूर्ण होत आहे.
****
सीमेवर सतत होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा
चौक्या आणखी भक्कम बनवण्यात आल्याचं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे.
लोकसभेत ते आज बोलत होते. आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराला अधिक आधुनिक बनवण्यासाठी
उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले.
देशात १४ नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स
स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी
आज लोकसभेत सांगितलं. कर्करोग, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी
राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत राज्यांना २० कर्करोग संस्था आणि ५० कर्करोग देखभाल संस्था
स्थापन करण्यासाठी केंद्राकडून मदत केली जाईल, असं ते म्हणाले.
लोकसभेत दुपारच्या सत्रात भारतीय जनता पक्षाचे खासदार
किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हवाला प्रकरणात काँग्रेसनं
चार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं सोमय्या म्हणाले. यावरुन काँग्रेस सदस्यांनी
केलेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. आता सदनाचं कामकाज
आठ ऑगस्टला सुरु होणार आहे.
****
विधीमंडळाच्या कामकाजातही आज विरोधकांच्या गदारोळामुळे
अनेकवेळा व्यत्यय आला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी
विरोधकांनी आजही विधानसभेत लाऊन धरली. यावेळी झालेल्या गदागारोळामुळे सभागृहाचं कामकाज
सुरवातीला १५ मिनिटांसाठी तहकूब झालं. प्रकाश मेहता यांच्याबाबत अनेक गंभीर प्रकरणं
पुढे येत असून, खडसे आणि मोपलवारांप्रमाणेच मेहता यांनाही पदावरुन हटवून चौकशी करावी
अशी मागणी विरोधकांनी लाऊन धरली. त्यावर विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत
तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधकांनी
घोषणाबाजी सुरु करुन, सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभात्याग
केला.
****
प्राथमिक शिक्षकांकरता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक
अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा - टी. ई. टी. अनिवार्य केली असल्याची
माहिती, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली. डी. एड. आणि बी. एड. ही
शैक्षणिक योग्यता असून, टी. ई. टी. ही पात्रता परीक्षा आहे, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे
ही परीक्षा लागू केली असल्याचं ते म्हणाले.
****
विधान परिषदेतही प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या
मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब झालं. विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांनी, मेहता यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका
घेतली. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, यासंदर्भात मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत
उत्तर देतील, असं सांगत विरोधकांकडून सदनाची आचारसंहिता पाळली जात नसल्याचा आरोप केला.
****
मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा
निर्णय सरकारनं घेतला आहे. गृह मंत्रालयानं ही माहिती दिली. एक ऑक्टोबर २०१७ पासून
हा नियम लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
येत्या नऊ ऑगस्टला मुंबई इथं आयोजित केलेल्या मराठा क्रांती
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज परभणी शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली. नागरिक मोठ्या
संख्येनं या वेळी सहभागी झाले होते.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या
कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन
बाद ५० धावा झाल्या. रविचंद्रन अश्विननं दोन बळी घेतला. तत्पूर्वी भारतानं आपला डाव
६२२ धावांवर घोषित केला.
****
तोंडाच्या कर्करोगाचं निदान आणि प्रतिबंध या उद्देशानं
मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरनं भारतीय दंत चिकित्सक संघाच्या सहकार्यानं देशातल्या
पहिल्या डिजिटल अभियानाला सुरुवात केली आहे. या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन २७ जुलैपासून
मुख कर्करोग या विशेष अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. मुख कर्करोगाचं निदान लवकर व्हावं
आणि त्याविषयी जागरुकता वाढावी यासाठी यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment