Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रकरणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे
यांच्या विरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव
** पीक विमा योजनेला पाच ऑगस्टनंतर मुदतवाढ न देण्याची सरकारची घोषणा
** नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांचा राजीनामा
** औरंगाबाद महानगर पालिकेची बेकायदेशिर धार्मिक स्थळ हटवण्याची मोहीम सुरूच;
कारवाईत भेदभाव होत असल्याचा शिवसेनेचा आरोप, कारवाई थांबवण्याची खासदार चंद्रकांत
खैरे आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची मागणी
आणि
** मराठवाडा विकास आंदोलनातले मार्गदर्शक
पत्रकार हेमराज जैन यांचं निधन
****
मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होतील अशी ग्वाही देऊनही, ते
जाहीर न केल्याबद्दल, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेनं
काल विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. शिवसेनेचे अनिल परब यांनी मांडलेल्या या
प्रस्तावावरुन विरोधकांबरोबर खडाजंगी झाली. हा प्रस्ताव मांडताना सात जणांचं अनुमोदन
हवं तसंच सत्ताधारी सदस्यांना मंत्र्यांविरोधात हक्कभंग मांडता येत नाही, असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सांगितलं. आधी सत्ता सोडा, मग हक्कभंग मांडा असा टोला,
काँग्रेसचे नारायण राणे यांनी लगावला. मात्र उपसभापतींनी प्रस्ताव स्वीकारत, यावर खुलासे
नोंदवल्यावर निर्णय दिला जाईल असं स्पष्ट केलं. याच मुद्यावरुन आधी विरोधकांनी गदारोळ
केला. मंत्री तावडे यांनी राजीनामा द्यावा, आणि कुलगुरुंना पदावरुन हटवावं अशी त्यांची
मागणी होती. त्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित आलं होतं.
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर आणि प्रभारी
कारागृह अधीक्षक तानाजी करबुडवे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित
पाटील यांनी काल विधानपरिषदेत केली. आरोपींचा बचाव केल्याचं समोर आल्याबद्दल, या प्रकरणातल्या
तत्कालीन तपास अधिकारी, कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी, सचिव
वर्गाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल, असं गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
****
पीक विमा योजनेसाठी पाच ऑगस्टनंतर मुदतवाढ देता येणार नसल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी आज कामकाज सुरु होताच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या
रांगा लागल्या असून, त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. या योजनेसाठी
पैसे भरण्याची पूर्वीची ऑनलाईन पद्धत वाढत्या गर्दीमुळे ऑफलाईन केल्याची माहिती कृषीमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
****
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी हिंगोलीचे
खासदार राजीव सातव यांनी केली आहे. काल लोकसभेत २०१७-१८ साठीच्या पुरवणी मागण्यांवरील
चर्चेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी,
तसंच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, असंही सातव म्हणाले.
****
दहीहंडीची उंची वाढवण्याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयात
वर्ग केली आहे. त्यामुळे या याचिके संदर्भात यापुढची सुनावणी येत्या सात ऑगस्टला मुंबई
उच्च न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयानं २०१४ साली दहीहंडीची उंची २० फुटांहून
कमी आणि गोविंदांचं वय १८ वर्षांहून जास्त ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दहीहंडी
आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, सुरक्षेची हमी घेत असल्याचं सांगत, दहीहंडीची
उंची वाढवण्याची परवानगी मागितली होती. यंदा येत्या १५ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा
होत आहे.
****
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार
असल्याचं काल जाहीर केलं. शिक्षण क्षेत्रात पुन्हा काम करण्यासाठी ते राजीनामा देत
असल्याचं, पीटीआयनं म्हटलं आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंतच ते पदभार सांभाळतील. नियोजन
आयोगाच्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या
उपाध्यक्षपदी अरविंद पनगरिया यांची २०१५ मध्ये नियुक्ती झाली होती.
****
येत्या नऊ ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चापूर्वी, आंदोलकांनी सरकारबरोबर चर्चा
करावी, असं आवाहन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद
शहरातून वाहन फेरी काढण्यात आली.
****
तूर खरेदी घोटाळा प्रकरणी जालना जिल्ह्यातल्या
४९ व्यापाऱ्यांची बँक खाती संशयास्पद आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे
यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली. यासंदर्भातला अहवाल राज्य शासनाकडं पाठवला असल्याचं
त्यांनी सांगितलं. जालना बाजार क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडच्या केंद्रावर तूर विक्री केलेल्या ८०० खात्यांची
चौकशी करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या कारवाईत
काल औरंगाबाद महानगर पालिकेनं तीन मंदिरं हटवली. यात पहाडसिंगपुरा इथले दोन मंदिरं,
आणि सिडकोतल्या एका मंदिराचा समावेश आहे. या कारवाईत सगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं
पाडली जात नसून, महानगर पालिका यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या नगर
सेवकांनी काल औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त डी. एम मुंगळीकर यांना दोन तास घेराव
घातला.
दरम्यान, महानगरपालिकेनं सुरू केलेली कारवाई थांबवण्याचे
आदेश राज्य सरकारला द्या, अशा मागणीचं एक निवेदन काल खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिलं.
तर ही कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मध्यस्थी करावी,
अशी मागणी, एम.आय.एमचे आमदार इम्तियाज जलील यांनी काल विधानसभेत केली.
****
मराठवाडा विकास आंदोलनातले मार्गदर्शक, ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचं काल परभणी इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८५
वर्षांचे होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निर्मिती आंदोलनात त्यांचं मोलाचं योगदान
होतं. मॉडेल एज्युकेशन
सोसायटीचे सचिव म्हणूनही
त्यांनी काम पाहिलं होतं. परभणी
नगरपालिकेचे नगरसेवकासह अन्य विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं. आज सकाळी ९ वाजता
त्यांच्यावर परभणी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
औरंगाबाद इथले मजलिस-ए-इतेहाद्दुल
मुस्लिमीन -एमआयएम पक्षाचे नगरसेवक जमीर कादरी यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतला.
कादरी यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केल्यामुळे हा निर्णय घेण्यात
आला.
****
संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या ८२४ व्या जयंतीनिमित्त
काल औरंगाबाद शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पैठण दरवाजा
ते संस्थान गणपती मंदीर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं
सहभागी झाले होते.
****
लातूर शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण
हटाव मोहिमेत विस्थापित दुकानदार, फेरीवाले यांचं पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेचे
अधिकारी अभ्यास करत असून गरजूंना महापालिका योग्य तो मोबदला देईल, अशी माहिती महापौर
सुरेश पवार यांनी दिली. यासंदर्भात आयोजित वार्ताहर परिषदेत ते काल लातूर इथं बोलत
होते. ही मोहीम अजून काही दिवस सुरु राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे. या योजनेतून शहरातल्या प्रत्येक बेघरांना घर बांधण्यासाठी
अर्थसहाय्य मिळणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली.
****
संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणी साठी काल हिंगोली इथं शेतकरी
संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आगामी काळात दहा वर्षांच्या
कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचं न्यायिक लेखा परीक्षण
करावं, यासह अन्य काही मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना राज्यभरात आदरांजली वाहण्यात
आली.
विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक आणि साठे
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
No comments:
Post a Comment