Tuesday, 19 September 2017

Text-AIR News Bullettin, Aurangabad 19.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

उत्तर कोरियाच्या अणु प्रसार उद्योगांची तपासणी करण्याची मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी न्यूयॉर्क इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या चालू सत्रात अमेरिका आणि जपानसोबत झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत उत्तर कोरियाच्या सध्याच्या धोरणावर टीका केली.  

****

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी तीन साथीदारांसह काल ठाणे पोलिसांनी अटक केली. या सर्वांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल यानं खंडणीपोटी चार सदनिका घेतल्या असून, अधिक सदनिकांची मागणी केल्यावर संबंधित व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. इक्बाल यानं आणखी काही व्यावसायिकांकडूनही खंडणी मागितल्याचं ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

संघटित क्षेत्रातल्या कंपन्यांना एक ऑक्टोबरपासून आपल्या नवीन कर्मचाऱ्यांची माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला ऑनलाईन स्वरुपात द्यावी लागणार आहे. फॉर्म-९ भरण्याची प्रक्रिया बंद केली असल्याचं संघटनेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

****

शाळेमधल्या मुलांच्या सुरक्षेसंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी शालेय मुलांच्या सुरक्षेसंदर्भातले उपाय आणि योजनांवर चर्चा झाली. शालेय मुलांची वाहतूक करत असलेल्या वाहनांमध्ये महिला सेविका नियुक्त करण्याबरोबरच आणखी काही उपाय या बैठकीत सुचवण्यात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी तातडीनं व्हावी यासाठी सहा सचिवांची एक समिती नियुक्त केली जाईल, असं बैठकीनंतर मनेका गांधी यांनी सांगितलं. गुरुग्राम इथल्या रायन इंटरनॅशनल स्कूल या शाळेत एका सात वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

****

दरम्यान, रायन इंटरनॅशनल स्कूल येत्या शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे. मुलाची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केल्यानं शाळा बंद ठेवण्यात आली होती. या प्रकरणातल्या तीन आरोपींना स्थानिक न्यायालयानं २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्यानं, मराठवाड्यात गोदावरी नदी काठालगतच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात सध्या पाच हजार ३६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. लातूर जिल्ह्यातल्या मांजरा प्रकल्पातही ९० पूर्णांक ४१ टक्के इतका पाणीसाठा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

राज्यात आगामी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव आणि नांदगाव या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांदा लिलाव पूर्ववत सुरु झाले. प्राप्तीकर विभागानं कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकल्यानं गेल्या सहा दिवसांपासून या बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले होते. काल लासलगाव आणि नांदगाव वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले होते.

****

पतंजली योगपीठाचे मराठवाडा प्रमुख, पतंजली उत्पादनांचे मराठवाडा वितरक, तसंच बांधकाम व्यावसायिक मिलिंद शुक्ल यांचं आज पहाटे निधन झालं. शुक्ल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर पुण्याच्या रूबी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज प्रतापनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांनी, वैजापूर ते कोपरगांव आणि औरंगाबाद ते चाळीसगाव लोहमार्गास निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तीन जून रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू औरंगाबाद इथं आले असता, त्यांनी नांदेड विभाग हा मध्य रेल्वेस जोडण्याची, तसंच वैजापूर ते कोपरगाव आणि औरंगाबाद ते चाळीसगांव लोहमार्गाला निधी देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा करण्याची मागणी सावे यांनी केली आहे.

****

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून टोकियो इथं सुरु होत आहे. भारताकडून पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, के. श्रीकांत, एच. एस. प्रणय, बी. साई प्रणित या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पहिल्या फेरीत सिंधूचा सामान जपानच्या मिनात्सू मितानी बरोबर, सायनाचा सामना थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग बरोबर, तर के. श्रीकांतचा सामना चीनच्या तियान हुवेई बरोबर होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...