Sunday, 15 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सरकार जैविक शेती आणि स्वयंरोजगारासह विविध योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय महिला शेतकरी विकास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शेतकरी देशाला दुसऱ्या हरित क्रांतीच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतात, आणि महिलांना योग्य संधी आणि सुविधा उपलब्ध करुन दिल्या, तर विकासाची व्याप्ती आणखी वाढू शकते, असं ते म्हणाले.

****

पंजाबमध्ये गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार स्वर्ण सलारिया यांचा एक लाख ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपा खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५८ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातल्या १५८ सरपंच पदासाठी ५०८ तर एक हजार ५६१ सदस्य पदांसाठी तीन हजार ५६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ६७० मतदान केंद्रांवर तीन लाख ३७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कलाम यांची जयंती राज्यभरात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात येत आहे.

****

सामाजिक माध्यमांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यानं अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रमेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. हा पोलीस कर्मचारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अंगरक्षक आहे.

****

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात वरणगाव इथल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात डिसेंबरअखेर नऊ एम एम बंदूक गोळीचे उत्पादन सुरू होणार आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक राजीव गुप्ता यांनी ही माहिती दिली. या कारखान्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस विभाग, केंद्रीय राखीव पोलिस दल, तसंच आसाम रायफल्सकडून नऊ एमएम गोळीची मागणी वाढल्यानं, संरक्षण मंत्रालय तसंच कलकत्ता इथल्या केंद्रीय ऑर्डनन्स बोर्डानं या गोळ्यांचं उत्पादन करण्यास परवानगी दिल्याचं, गुप्ता यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या विविध योजनांसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीमध्ये विविध मंत्र्यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनांबाबत धोरण तयार करण्याचं कामही या उपसमितीवर सोपवण्यात आलं आहे.

****

विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केला आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंठा-परतूर मतदार संघात जलयुक्तचे एकच काम चार वेळेस दाखवून कोट्यवधींची देयकं काढण्यात आली, तसंच लोणीकर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकानं मुंबईतल्या मलबार हिल इथं दोनशे कोटीं रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप करत, जेथलिया यांनी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कुकडी कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कुंडलिकराव जगताप यांचं आज सकाळी कोईमतूर इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या कुकडी कारखाना परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप यांचे ते वडील होत.

****

अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणात आज सकाळी सुमारे बारा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणाचे अठरा दरवाजे सध्या अर्ध्या फुटानं उचललेले असून, त्यातून चौदा हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण शंभर टक्के भरलेलं आहे.

****

ढाका इथं सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. अ गटात भारत आपले दोन सामने जिंकून सहा गुणांसह प्रथम स्थानी असून पाकिस्तान दोन सामन्यात चार गूण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...