Saturday, 14 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात जागतिक दर्जाचे १० सार्वजनिक विद्यापीठ आणि १० खाजगी विद्यापीठं उभारण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केलं. पाटणा विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. या विद्यापीठांच्या निवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या विद्यापीठांवर सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसेल आणि त्यांना अभिमत विद्यापीठांचा दर्जा देण्यात येईल असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. यासाठी सरकार दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.   

****

पोलाद उद्योगात कच्चा माल पुरवण्यासाठी पुनर्प्रक्रिया उद्योग महत्वाची भुमिका बजावू शकतो, असं पोलाद मंत्री बीरेन्दर सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं जागतिक पुनर्प्रक्रिया संमेलनात ते आज बोलत होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन केलं जात असल्यामुळे भारतात पुनर्प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याचं ते म्हणाले.

****

दोन पाकिस्तानी नागरिकांना भारतात यकृत प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी व्हिसा देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. नसीम अख्तर आणि शब्बीर अहमद या दोन पाकिस्तानी नागरिकांना यकृत प्रत्यारोपणासाठी व्हिसा देण्यास पाकिस्तानमधल्या भारतीय उच्चायुक्तांना सांगितलं असल्याची माहिती स्वराज यांनी दिली. नसीम अख्तर यांच्या मुलानं स्वराज यांच्याकडे विनवणी केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी वरील निर्णय घेतला. 

****

भारतीय मानक ब्युरो, २०१६ हा कायदा कालपासून देशभरात लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत वस्तूंचा दर्जा तपासण्यासाठी भारतीय राष्ट्रीय मानक मंडळ ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या अंतर्गत सार्वजनिक हितासाठी वर्गीकृत उद्योगांमधल्या सर्व वस्तू, माल, प्रक्रिया आणि सेवांना प्रमाणीकरणाच्या कक्षेत आणलं आहे. तसंच मौल्यवान धातूंच्या वस्तूंना हॉलमार्क बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथक - एसआयटीनं आज दोन मुख्य संशयित आरोपींचे रेखाचित्र जारी केले. एसआयटीनं आज बंगळुरु इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. स्थानिकांनी आणि तांत्रिक विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारे दोन पुरुष संशयितांचे रेखाचित्र बनवले असल्याचं, एसआयटीचे प्रमुख बी के सिंग यांनी यावेळी सांगितलं.

****

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं गुरूवारी हिमाचल प्रदेशमधल्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर तिथं तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळातही मुख्यमंत्री आणि इतर मंत्री राज्य महामंडळ आणि पोलिस दलाच्या भरतीमध्ये उमेदवारांना पूर्वीच्या तारखांच्या नेमणुका देत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.    

****

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची सुमारे पाच कोटी साठ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय - ईडीनं जप्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत जप्त केलेली संपत्ती ४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ईडीनं सिंह आणि त्यांच्या कुटुंबाची दिल्ली इथली सुमारे २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

****

विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी पैसा आणि सत्तेचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेनं भाजपवर केला आहे. भांडूपमधली स्थानिक पोटनिवडणूक भाजपनं जिंकल्यानंतर शिवसेनेनं हा आरोप केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे भ्रष्ट पर्याय वापरले जात असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

****

एखाद्या विद्यार्थ्याविरोधात केवळ गुन्हा दाखल झाल्यामुळं त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढून टाकता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर म्हणजे अंतिम सत्य नसल्याचं मतही न्यायालयानं नोंदवलं आहे. या आधारे उच्च न्यायालयानं एका अभियांत्रिकी महाविद्यालयानं एका विद्यार्थ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय रद्द केला आहे.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केंद्र शासनाच्या मेगा टुरिझम मार्केट योजनेअंतर्गत आज नांदेड तालुक्यातल्या विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विकास कामांची पाहणी केली. या योजनेअंतर्गत विष्णुपुरी काळेश्वर मंदिरासाठी २३ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत पूर्ण झालेली विविध विकासकामे वापरात राहण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी त्वरीत हस्तांतरण प्रक्रिया करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...