Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** जैविक शेती आणि स्वयंरोजगारासह विविध योजनांमध्ये महिला
शेतकऱ्यांना सरकारचं प्रोत्साहन
** जालना जिल्ह्यातल्या गटशेती करणाऱ्या
देळेगव्हाणला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देऊन पाहणी करणार
**
राज्यातल्या ३७०० ग्रामपंचायतींच्या
निवडणुकीसाठी आज मतदान
आणि
** पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर
बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप; मालमत्तांशी काहीही संबंध नसल्याचं लोणीकर यांचं स्पष्टीकरण
****
सरकार जैविक शेती आणि स्वयंरोजगारासह विविध योजनांमध्ये
महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन
देत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री
राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय महिला शेतकरी विकास
दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शेतकरी देशाला दुसऱ्या हरित क्रांतीच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतात,
आणि महिलांना योग्य संधी आणि सुविधा उपलब्ध करुन दिल्या, तर विकासाची व्याप्ती आणखी
वाढू शकते, असं ते म्हणाले.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना
काल त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात
विविध उपक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित
विशेष अभिवादन सभेत अब्दुल
कलाम यांना अभिवादन करताना, राष्ट्रनिर्माणात अब्दुल कलाम यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही, असं
नमूद केलं. यावेळी राष्ट्रपतींनी कलाम संदेश
वाहिनी
- व्हिजन २०२० या वाहनाचं स्वागत केलं. याअंतर्गत १६ राज्यात २०२० मधल्या भारताबद्दलच्या
कलामांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं डॉ. कलाम
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर
यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली
वाहिली. कलाम यांची जयंती राज्यभरात
वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्तानं गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वाचन प्रेरणा उपक्रम
आयोजित करण्यात आले.
****
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध
योजनांसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी सहकार, पणन
आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीमध्ये अन्य
मंत्र्यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या योजनांबाबत धोरण
तयार करण्याचं कामही या उपसमितीवर सोपवण्यात आलं आहे.
****
कायम दुष्काळाचे चटके सहन केलेल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गटशेतीच्या
माध्यमातून अर्थकारणात मोठं परिवर्तन घडवलं आहे. जाफराबाद तालुक्यातल्या देळेगव्हाण आणि
अकोलदेवसह १९
गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत, ॲग्रो इंडिया गटशेती संघाची
स्थापना करून फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवान कापसे
यांच्या मार्गदर्शनाखाली गटशेती सुरू केली. या गटशेतीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भेट देऊन पाहणी करणार आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
गटशेतीचा हा प्रयोग
प्रचंड यशस्वी ठरला असून या शेतीनं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवलं तसंच ते आर्थिकदृष्ट्या
स्वयंपूर्ण ही झाले आहेत, या गटशेतीबाबत अधिक माहिती सांगतांना डॉ भगवानराव कापसे म्हणाले,
२००४ मध्ये सुरू
झालेल्या या गटशेतीमध्ये मोसंबीचं पिक
घेतलं, मात्र २०११
ते २०१४ या
दरम्यानच्या दुष्काळात मोसंबीच्या या
बागा वाळून गेल्या. तरीदेखील शेतकऱ्यांनी
खचून न जाता पीक पद्धतीत बदल करून
कापूस, अद्रक, हळद, तसंच शेडनेटमध्ये
मिरची, द्राक्षं, डाळींब लागवडीचा निर्णय घेतला. प्रायोगिक पातळीवर एका
शेतात केलेला, अतिघन या नवीन पद्धतीनं कपाशी लागवडीचा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. यामुळे हेक्टरी १५ क्विंटल मिळणारं कापसाचं उत्पादन थेट हेक्टरी ५५
क्विंटल पर्यंत गेलं. याचबरोबर उत्पादनाचा दर्जाही निर्यातक्षम इतका वाढला.
जाफराबादमधल्या या शेतकऱ्यांच्या गटशेतीच्या या प्रयोगाची राज्य सरकारनंही दखल घेतली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज देळेगव्हाण गावांला भेट देऊन
या गटशेतीची पाहणी करणार आहेत.
बाबासाहेब
मस्केसह मी रमेश जायभाये, आकाशवाणी औरंगाबाद
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातल्या ३७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं आज मतदान
होत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या
१५८ सरपंच
पदासाठी ५०८ तर एक हजार ५६१ सदस्य पदांसाठी तीन
हजार ५६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ६७० मतदान केंद्रांवर तीन लाख ३७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार
आहेत.
याशिवाय ठाणे
४१, पालघर ५६, रायगड २४२,
रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा
३१९, सांगली ४५३, कोल्हापूर ४७८,
नागपूर २३८, वर्धा ११२, चंद्रपूर
५२, भंडारा ३६२, गोंदिया ३५३, आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या २६ ग्रामपंचायतींसाठीही आज मतदान होणार आहे.
****
विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी
कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष
माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी केला आहे. ते काल जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंठा-परतूर
मतदार संघात जलयुक्तचे एकच काम चार वेळेस दाखवून कोट्यवधींची देयकं काढण्यात आली, तसंच लोणीकर आणि त्यांच्या
स्वीय सहाय्यकानं
मुंबईतल्या मलबार हिल इथं दोनशे कोटीं रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप करत, जेथलिया यांनी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी
करण्याची मागणी केली.
दरम्यान, जेथलिया यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते
सांगत असलेल्या मालमत्तांशी आपला काहीही संबंध नसल्याचं लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल,
लोणीकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत सर्व आरोप
फेटाळून लावले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचही त्यांनी नमूद केलं.
****
औरंगाबादनजिकच्या मांडकी शिवारातील
नारेगाव इथलं कचरा संकलन केंद्र इतरत्र हटवण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात
आलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. काल, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नारेगावला भेट देऊन ग्रामस्थांशी
संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं आंदोलनाचे समन्वयक मनोज गायके यांनी
सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर नजीक कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस शेल्हाळच्या पुलावरून
उलटल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. काल सकाळी
हा अपघात झाला. जखमींना उदगीर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यात खैरगाव
इथं एक शेतकरी शेतात काम करत असतांना अंगावर वीज कोसळल्यामुळे मरण पावला. त्याची पत्नी
आणि मुलगा जखमी झाले आहेत. अन्य एका घटनेत मोरे इकळी इथंला युवक वीज कोसळल्यामुळे जखमी
झाला, मात्र त्याच्या जनावरांचा यात मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग तालुक्यातल्या
हलगरा तांडा परिसरात एका युवकाचाही वीज कोसळल्यानं
मृत्यू झाला. काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
****
औरंगाबादनजीक भालगाव परिसरात कंटेनर आणि कारची धडक होऊन दोन
जण ठार झाले. काल मध्यरात्री हा अपघात झाला. भरधाव कंटेनरनं धडक दिल्यानं कारमधील दोघं
जागीच ठार झाले. मृतांमध्ये एक जण कोल्हापूरचा तर एकजण लातूरचा रहिवासी होता. जालना
जिल्ह्यात जालना-राजूर मार्गावर रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन
झालेल्या अपघातात दुचाकीवरचे दोघेजण जागीच
ठार झाले. अंबड तालुक्यातल्या महाकाळा फाट्यावर
रात्री साडेसात वाजता झालेल्या अन्य एका अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकजण जखमी
झाला.
****
दिवाळीच्या सणाला आजपासून प्रारंभ झाला आहे. आज या सणाचा
पहिला दिवस वसुबारस आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये
गर्दी दिसून येत आहे. विद्युत रोषणाईसह आकाश कंदीलांमुळे हा प्रकाशोत्सव हर्षोल्हासात
साजरा होत असल्याचं वातावरण आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कुकडी कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कुंडलिकराव
जगताप यांचं काल
कोईमतूर इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज कुकडी कारखाना परिसरात अंत्यसंस्कार होणार
आहेत. श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप यांचे ते वडील होत.
****
No comments:
Post a Comment