Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
भारतीय विशिष्ट ओळख
प्राधिकरणानं भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट्स बँकेला ई-केवायसी प्रक्रियेद्वारे
ग्राहकांच्या सिम कार्डची पडताळणी आधार कार्डाशी जोडून करण्यास तात्पुरती मनाई
केली आहे. भारती एअरटेलनं आधार ईकेवायसी द्वारे सिम कार्डची पडताळणी करुन एअरटेल पेमेंट्स बँकेत ग्राहकांची
संमती न घेताच त्यांची खाती उघडल्याचा आरोप आहे. एलपीजी गॅस सबसिडी मिळवण्यासाठीही
या खात्यांचा वापर केला जात असून, त्यावर प्राधिकरणानं आक्षेप घेतला आहे.
****
राज्य व्यापार महामंडळ -
एस टी सी ला बावीसशे कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक
गैरव्यवहार चौकशी दरम्यान २४५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. ग्लोबल स्टिल होल्डींग कंपनी, तिचे संचालक प्रमोद कुमार मित्तल
आणि इतर काही जणांवर अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल
करण्यात आला होता.
****
रेल्वे तिकीटं पूर्ण विकली गेली नसतील तेव्हा तिकीट दर कमी ठेवण्याची योजना
लवकरच रेल्वे विभाग राबवणार असल्याचे संकेत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले
आहेत. ते नवी दिल्ली इथं वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. विमान कंपन्या आणि हॉटेल्स अशा
सवलती देत असतात. हंगाम नसताना भाडे कमी ठेवण्याच्या योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी
रेल्वेनं सहा सदस्यांची समिती नेमली आहे. मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी २०१८ पासून रेल्वे गाडयांमध्ये सी सी टी
व्ही कॅमेरे लावण्याचा विचार करत असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. रेल्वेनं नुकतंच ९८३ रेल्वे स्थानकं, निर्भया निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निश्चित केली
आहेत.
****
कर्णबधीरांसाठीच्या कोहलर इम्प्लँट बसवण्याच्या योजनेचा लाभ देशभरातल्या सहा
वर्षाखालील शंभर मुलांना झाला आहे. काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय आणि
सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी ही माहिती दिली. अशा योजनांमधे कार्पोरेट क्षेत्रानं आणि नागरिकांनी पुढाकार
घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
इस्लामचे वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक यांच्या विरुध्द असलेली रेड कॉर्नर
नोटीस इंटरपोलनं रद्द केली असल्याचं राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं म्हटलं आहे. आता तपास संस्थेच्या मुंबई
न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून, एनआयए इंटरपोलला नव्यानं विनंती करणार असल्याचं सूत्रांनी
सांगितलं. झाकीर नाईक यांच्यावर प्रक्षोभक भाषणातून द्वेष पसरवणं, दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य
पुरवणं तसंच आर्थिक गैरव्यवहार असे आरोप आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंडी दरम्यान आगपेटी भरलेल्या
ट्रकला अचानक आग लागल्यानं ट्रक जळून खाक झाला. आज सकाळी ही घटना घडली. महानगर पालिकेच्या
चार बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली असून, सुदैवानं यात कुठलीही जीवीत हानी झाली
नाही.
****
राज्यातल्या १२ जिल्हाधिकाऱ्यांना हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं दिले
आहेत. नांदेड, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, जळगाव,
नागपूर आणि भंडारा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. फ्लोराईड मिश्रित पाण्यामुळे
होणाऱ्या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या असा
आदेश, लवादानं या जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. मात्र तीन वर्षानंतरही या आदेशाचं पालन
न केल्यामुळे लवादानं त्यांना हजर राहण्यास
सांगितलं आहे.
****
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं यशस्वीपणे राबवली
होती, त्यामुळे आता ऑनलाईन मतदान घेण्याचा विचार असल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त
जे एस सहारिया यांनी सांगितलं आहे. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
ते काल पंढरपूर इथं बोलत होते. नवमतदार वाढवण्यासाठी माहविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या
वेळी १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी करण्याबाबत प्रतिज्ञापत्र
लिहून घेतलं जात असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
युक्रेन इथं सुरु असलेल्या वलेरीया डेमियानावो स्मृती अंतरराष्ट्रीय
मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताच्या युवा महिला संघानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि एक
कांस्य पदक पटकावलं. स्पर्धेच्या
शेवटच्या दिवशी १५ वर्षाच्या झलक तामोरनं ५४ किलो ग्रॅम गटात रौप्य पदक पटकावलं.
****
दुबई इथं सुरु असलेल्या
दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना आज भारताची पी व्ही सिंधू आणि जपानच्या
अकाने यामागुची यांच्यात होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधुनं
चीनच्या चेन युफेईच्या २१- १५, २१ - १८ असा पराभव केला
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तिसरा आणि
शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं खेळला जाणार
आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ
एक - एकनं बरोबरीत आहेत.
*****
No comments:
Post a Comment