Saturday, 2 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
ठळक बातम्या
****
** राष्ट्रीय पोषण मिशनची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
** तिहेरी तलाक पद्धत अवैध ठरवणारं महिला अधिकार संरक्षण आणि विवाह विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता
** जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषी विकास दर शून्यावरून साडे बारा टक्क्यांवर - मुख्यमंत्री
** सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचा अजित पवार यांचा आरोप
आणि
** लातूर निलंगा रस्त्यावर बस आणि ट्रकच्या अपघातात तीन जण ठार
****
आता सविस्तर बातम्या
****
राष्ट्रीय पोषण मिशनची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. याअंतर्गत एक तज्ज्ञांचा गट देशभरात पोषणासंबंधी एक लक्ष्य निर्धारित करुन त्याविषयी मार्गदर्शन आणि निरीक्षण करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यावेळी उपस्थित होत्या. देशातलं प्रत्येक मूल, गर्भवती आणि स्तन्यदा मातांना योग्य पोषण आहार पुरवण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तिहेरी तलाक पद्धत अवैध ठरवणारं महिला अधिकार संरक्षण आणि विवाह विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सदनासमोर मांडलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटानं या कायद्याचा मसूदा तयार केला असून, तो राज्य सरकारांच्या अवलोकनार्थ पाठवला जाणार आहे. त्यावर राज्य सरकारांनी आपली मतं तत्काळ नोंदवायची असून, त्यानंतर तो मसूदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे. या विधेयकानुसार लेखी, तोंडी अथवा एसएमएस वा ई मेल द्वारे दिलेला तिहेरी तलाक अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, त्यासाठी तीन वर्षे कारावासाची शिक्षा प्रस्तावित आहे. विधेयकातल्या तरतुदीनुसार पीडितेला स्वत:च्या तसंच आपल्या अल्पवयीन बालकांसाठी पोटगीकरता दाद मागता येणार आहे.
****
न्यायालयात दोषी ठरलेल्या राजकीय नेत्यांना निवडणूक लढण्यासाठी तसंच राजकीय पद ग्रहण करायला बंदी घालायची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार तसंच निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. निवडणूक प्रणाली दोष मुक्त करण्यासाठी तसंच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.
****
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॉमा सेंटर उभारण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ज्या राज्यांनी अद्याप रस्ते सुरक्षा धोरण आखलेलं नाही, त्यांनी जानेवारी २०१८ च्या अखेरपर्यंत ते तयार करावं आणि पूर्ण गांभीर्यानं आणि काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सशस्त्र सेना दलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या सात डिसेंबर पर्यंत सशस्त्र सेना सप्ताह पाळला जात आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्राणांची पर्वा न करता कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास सदैव सज्ज असलेले शूरपूत्र आणि शूरकन्यांना सलाम करण्याचं आवाहन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशवासियांना केलं आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषी विकास दर शून्यावरून साडे बारा टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल बीड जिल्ह्यातल्या ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचं जलपूजन केल्यानंतर ते बोलत होते. कर्जमाफीचे दीड लाख रुपये, येत्या काही दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर जमा होणार असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी, या योजनेअंतर्गत १३ लाख बोगस शेतकरी आढळून आल्याची माहिती दिली. विरोधी पक्षांच्या हल्लाबोल आंदोलनावरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी टीका केली.
वडवणी इथं सरपंच मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाडयातल्या सर्व प्रकल्पांसाठी राज्य शासन भरीव मदत करत असल्याचं सांगितलं. बीड इथं एका दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ब तसचं क वर्ग वृत्तपत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचं सांगितलं.
****
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मन:स्थितीत नाही, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यवतमाळ ते नागपूर पदयात्रेला काल यवतमाळ इथं प्रारंभ झाला, त्यावेळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत ते बोलत होते. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं मुंडे यावेळी म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली.
****
डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्याप्रकरणात तपास यंत्रणा ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पानसरे यांच्या कुटंबिंयांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विधीमंडळ आधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
प्रसार भारती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ए सूर्यप्रकाश यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ आठ फेब्रुवारी २०२० पर्यंत असेल.
****
राज्य सरकारनं बलात्कार आणि अन्य घटनांमध्ये पीडित महिलांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवून दहा लाख रुपये करण्यासंदर्भातल्या मनोधैर्य या योजनेची अधिसूचना जारी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरु केलेल्या या मूळ योजनेमध्ये सुधारणा करण्यात येईल, असं सरकारनं न्यायालयात सांगितलं.
****
लातूर निलंगा रस्त्यावर एस टी बस आणि ट्रकच्या अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले. लातूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या बसची औसा नजिक विरूद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकशी धडक झाली, अपघातात बसची एक बाजू कापली गेल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर काल दुचाकी आणि टँकरच्या धडकेत वर्षभराच्या एका बालिकेसह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
****
राज्यातल्या दहा हजार किलोमीटर रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना या योजनेची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील येत्या मंगळवारी ‘वेबीनार’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. देश तसंच परदेशातल्या कंत्राटदारांशी अशा प्रकारे संवाद साधून कामासाठी निमंत्रित करण्याचा राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे.
दरम्यान, पाटील यांनी काल औरंगाबाद इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. वेरुळ इथं शहाजीराजे स्मारकालाही पाटील यांनी भेट दिली. १५ डिसेंबरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
****
नांदेड जिल्ह्यात बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातही बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानं पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या हंगामात करण्याच्या उपाययोजनांची माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे. सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कापूस काढून शेत स्वच्छ करण्याचं आवाहन विभागानं केलं आहे.
****
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं गरजेचं असल्याचं, भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं संघाच्या सभेत बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित या सभेला ३४ प्रांतांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. उद्या या सभेचा समारोप होणार आहे.
****
अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्स्प्रेस १२ तास उशिरा धावत असल्यामुळे आज नांदेडहून अमृतसरला जाणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दुपारी पावणे तीन वाजता निघणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
हैदराबाद रेल्वे विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे नांदेड मेदचल नांदेड ही प्रवासी रेल्वे निझामाबाद ते मेदचल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. येत्या आठ डिसेंबरपर्यंत ही गाडी नांदेड निझामाबाद नांदेड अशी धावेल.
****
हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिंगोली इथं काल विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. हिंगोली नगर परिषदेचं स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्र, अण्णाभाऊ साठे वाचनालय, महात्मा गांधी चौक सुशोभीकरण आणि नगर परिषद बालक मंदिराच्या नवीन इमारतीचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई इथल्या महिला बचत गटांसह अन्य महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दारू दुकानासमोर आंदोलन सुरूच असून, दुकान कायमचं बंद होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे.
****
भारत आणि श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू होत आहे. मालिकेत भारत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****

No comments: