Saturday, 2 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०२ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

केरळमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाचा जोर अजूनही कायम असून, वादळामुळे राज्यात बळी गेलेल्यांची संख्या सात झाली आहे. हे चक्रीवादळ आता अधिक शक्तीशाली झालं असून, ते आता लक्षद्वीपकडे सरकत असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळ आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर मासेमाऱ्यांना पुढील चोविस तासांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच केरळमधल्या २२३ मासेमाऱ्यांना सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणण्यात आल्याचं राज्य प्रशासनानं म्हटलं आहे. तामिळनाडूमध्येही कन्याकुमारी जिल्ह्यात या ओखी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात काल रात्री एक कार ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला, तर एक जवान जखमी झाला. श्रीनगरहून जम्मू इथं जाणारी ही कार महामार्गावर शैतानी नाल्याजवळ घसरुन बनीहाल पट्टयाजवळ दरीत कोसळली. जखमी जवानाला बनीहाल रुगणालयात दाखल केलं आहे. दक्षिण काश्मीरच्या त्राल इथं तैनात असलेल्या या जवानांची ओळख पटली आहे.

****

दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी, राष्ट्राशी, संस्कृतीशी अथवा मानव वंशाशी संबंध जोडता कामा नये, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. त्या रशियामधल्या सोची इथं आयोजित शांघा सहकार्य संस्था शिखर परिषदेत बोलत होत्या. दहशतवाद हा सबंध मानवजाती विरोधातलाच गुन्हा असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. स्वराज यांनी यावेळी सर्व सदस्य राष्ट्रांना, गुप्तहेर माहितीची देवाणघेवाण वाढवणं, उत्तम तंत्रज्ञान विकसीत करणं, परस्पर कायदेशीर सहकार्य, गुन्हेगारांचं सुलभ हस्तांतरण आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी क्षमतेमध्ये वाढ करण्याचं आवाहन केलं. 

****

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ए के ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकाऱ्यांच एक पथक गुजरात निवडणुकांच्या तयारींचा आढावा घेण्यासाठी आज अहमदाबाद इथं दाखल झालं. हे पथक यावेळी राजकीय पक्षांशी तसंच पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. गुजरातमध्ये पहिल्या फेरीचं मतदान नऊ डिसेंबरला तर दुसऱ्या फेरीचं मतदान १४ डिसेंबर रोजी होणार आहे; तर मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

****

हैदराबाद इथं नुकत्याच झालेल्या जागतिक उद्योजकता संमेलनाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. भारत आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या या संमेलनाचं आयोजन केलं होतं. दोन्ही नेत्यांनी या संमेलनावर समाधान व्यक्त केल्याचं व्हाईट हाऊसनं सांगितलं.

****

आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड करण्यात आली आहे. लंडनस्थित या संस्थेच्या काल झालेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. निवडप्रक्रियेमध्ये भारतानं जर्मनीच्या १४६ मतांनंतर १४४ मतं मिळवत दुसरं स्थानं पटकावल. भारत या संस्थेचा अतिशय जुना सदस्य असून या संस्थेच्या अनेक करारांवर भारतानं स्वाक्षऱ्या केल्या आहे.

****

रायगड जिल्ह्यातल्या जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची ने-आण करणाऱ्या दोन नाविक सोसायट्यांच्या वादानं गंभीर वळण घेतल्यानं महाराष्ट्र सागरी मंडळाला राजपुरी जेटी ते जंजिरा किल्ला या मार्गावरची जलवाहतूक बंद करावी लागली आहे. जंजिरा पर्यटक सोसायटी आणि नव्यानं आलेल्या वेलकम सोसायटीत वाद सुरू झाल्यानं मंडळानं हा निर्णय घेतला.

****

ईद ए मिलाद निमित्त आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं मदरसा सुन्निया हन्फिया इथून सकाळी मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. लहान बालकांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. याशिवाय नाशिक शहरात जुने नाशिक आणि वडाळा या भागातही मिरवणूक काढण्यात आली.

****

पाच वेळेची विश्वविजेती आणि आशियाई विजेती मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोमनं बॉक्सिंगमधल्या राष्ट्रीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी, सक्रिय खेळाडू पर्यवेक्षक राहू शकणार
नाही, असं स्पष्ट करताच मेरीनं हे पद सोडलं.

****

भुवनेश्श्वर इथं जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या गटात काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना एक एकनं बरोबरीत सुटला. गटाच्याच दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीनं इंग्लंडचा दोन - शून्य असा पराभव केला. आज भारताचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. जगातले अव्वल आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.    

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २६ षटकात दोन बाद ११६ धावा झाल्या होत्या. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं प्रत्येकी २३ धावा काढल्या, तर मुरली विजय ५१ आणि विराट कोहली १७ धावांवर खेळत आहे.

*****


No comments: