Sunday, 3 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
****
** येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
** दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच हजार शाळांमधले विद्यार्थी तसंच शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार
** रुपवेद प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान प्रसिद्ध रंगकर्मी सतीश आळेकर यांना जाहीर
** शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पक्ष संघटनांची आंदोलनं
आणि
** श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर भारताच्या चार बाद ३७१ धावा
****
****
येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल मुंबईत, राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वातावरणात बदल आणि प्रदुषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ.डी.वाय.चंद्रचूड, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, प्रदुषणाच्या तक्रारी ऑनलाईन स्वीकारल्या पाहिजेत, असं मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केलं, तर विकासाच्या मागे धावताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी व्यक्त केली.
****
दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातल्या पाच हजार दोन शाळांमधले विद्यार्थी तसंच शिक्षकांचं त्याच परिसरातल्या इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट केली. गुणवत्ते अभावी विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या लक्षात घेता, हा निर्णय घेतल्याचं, तावडे यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात एक हजार ३१४ शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या ६८, औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४०, जालना सहा, बीड २३, परभणी १४, हिंगोली चार, लातूर आठ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सात शाळांचा समावेश आहे.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा वर्गात हजर राहणं आवश्यक आहे, त्यानंतर आलेल्या परीक्षार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असं तावडे यांनी स्पष्ट केलं. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर, दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे.
****
मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान वीजचोरी विरोधात धडक कृती कार्यक्रम राबवण्यात आला. या मोहिमेत एक हजार ४२१ वीजसंचांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६९ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून अनधिकृत वीजवापर करणाऱ्या ५३ वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय १५३ ग्राहकांच्या वीज मीटरची कार्यप्रणाली संशयास्पद आढळल्यानं सदर मीटर अंतिम चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चाचणी अहवालानुसार दोषी ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
****
रुपवेद प्रतिष्ठानच्या वतीनं तन्वीर लागू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान यंदा प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. तर नाट्यधर्मी पुरस्कारासाठी मुंबई फॅट्स थिएटरचे संस्थापक फैजे जलाली यांची निवड झाली आहे. काल पुण्यात ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, अभिनेत्री दीपा लागू यांनी ही माहिती दिली. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ९ डिसेंबरला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर बोंड फेका आंदोलन करण्यात आलं. कापसावरील बोंड अळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडे १२ हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, कपाशी बियाणं विक्रेत्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, महावितरण तर्फे करण्यात येणारी कृषी पंपाची वीज वसूली थांबवण्यात यावी आणि तोडलेली वीज जोडणी पूर्ववत करण्यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात शिवसेनेच्या वतीनंही काल औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आलं. बोंड अळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, कापूस खरेदी केंद्र, कांदा आयात निर्यात धोरण, कृषी पंपाची वीज वसुली, तसंच भरडधान्य खरेदीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं.
****
काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल सिल्लोड इथं रास्ता रोको आंदोलन करून, बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. पैठण इथं काँग्रेसच्या शिष्टमंडळानं प्रशासनाला निवेदन सादर करून, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयच्या शतकी खेळीच्या बळावर चार बाद ३७१ धावा झाल्या. मुरली विजयनं १५५, शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं प्रत्येकी २३ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा विराट कोहलीच्या १५६ आणि रोहीत शर्माच्या सहा धावा झाल्या होत्या. विराटचं कसोटी क्रिकेटमधलं हे विसावं शतक आहे. कसोटी किक्रेटमध्ये सलग तीन सामन्यात शतकी खेळी करणारा विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. विराटच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावाही काल पूर्ण झाल्या, अशी कामगिरी करणारा तो अकरावा भारतीय फलंदाज आहे.
****
ताणतणाव मुक्तीसाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त असल्याचं विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं महसुली क्रीडा स्पर्धांचा भापकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३६ प्रकारात सुमारे दोन हजारावर क्रीडापटू सहभागी झाले होते, विजयी खेळाडू तसंच संघांना भापकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं.
****
जिल्हा परिषदेच्या शाळांना बदलत्या काळानुसार विविध सुविधा उपलब्ध करुन देत या शाळा अधिक मजबुत करणार असल्याचं, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेंकर यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं, जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. खासदार सुनील गायकवाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी २० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला देविसिंह चव्हाण आदर्श पुरस्कार श्रीराम गुंदेकर यांना प्रदान करण्यात आला.
****
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजे ईद-ए-मिलाद-उन-नबी काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं पैगंबरांच्या पवित्र पोषाखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नांदेड इथं यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातही मुस्लिम बांधवांनी मिरवणुका काढल्या. परभणी इथं मिरवणुकांसह रक्तदान शिबीर, सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
जालना जिल्ह्यात अंबड मार्गावर कर्जत पाटीजवळ ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मयत दोघेही भोकरदन तालुक्यातले रहिवासी असल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं.
****
महाराष्ट्र राज्य महावितरणचे हिंगोली इथले कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या वाहनाला काल दुपारी शेतकऱ्यांनी घेराव घातला. रोहित्रं बदलून देण्यासाठी सतत पाठपुरावा करुनही रोहित्रं बदलण्यात आले नसल्यानं, संतप्त शेतकऱ्यांनीहे आंदोलन केलं. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.
****
गोव्यातल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीनं आयोजित, तेराव्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. हनुमंत भोपळे यांची निवड झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. येत्या १६ आणि १७ डिसेंबर ला गोव्यात हे संमेलन होणार आहे.
दरम्यान, नांदेड इथं इसाप प्रकाशन संस्थेच्यावतीने 'संस्कार ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मुलांसाठी दोन दिवस मोफत वाचन उपक्रम राबवण्यात आला. अनेक बालवाचकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
****
दुसरं अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन नऊ ते ११ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत लातूर इथं होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
औरंगाबाद शहरातल्या १९ धर्मादाय रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सहधर्मादाय आयुक्त श्रीकांत भोसले यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत नोंदणी असलेल्या दोन हजार ४२८ संस्थांचा लेखापरिक्षणाचा अहवाल तपासून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
*****

No comments: