Monday, 4 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०४ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.



****

ओखी चक्रीवादळ सुरतच्या दिशेनं येत असून, मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यातल्या समुद्र, खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे.

या वादळाचा फटका सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला सुद्धा बसला आहे. समुद्राला काल मध्यरात्री उधाण आल्यानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, मालवण बंदरात उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या गस्ती नौकांना लाटांचा तडाखा बसला. या गस्ती नौकांपैकी सिंधू-५ ही गस्ती नौका समुद्रात उलटली असून, ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, ओखी चक्रीवादळामुळे केरळमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. काल आणखी सहा मृतदेह हाती लागले आहेत. समुद्रात अडकलेल्या ६९० मासेमारांना नौदल, तटरक्षक दल, आणि हवाई दलाच्या संयुक्त बचाव मोहीमेद्वारे सुखरुप परत आणण्यात आलं असून, अजूनही ९६ मासेमार बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, राहुल गांधी यांच्याशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याचं पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी सांगितलं. या पदासाठी राहुल यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. गरज पडली तर येत्या १६ डिसेंबरला मतदान होणार असून, १९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी उपस्थित होते.

****

राजधानी दिल्लीत वायू प्रदुषण रोखण्यासाठी असलेल्या पर्यायांवर दिल्ली सरकारनं अद्याप कृती आराखडा दाखल न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं नाराजी व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात हा आराखडा सादर करण्याचे निर्देश लवादानं दिले आहेत. दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावलेली असूनही, फिरोजशहा कोटला मैदानात भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट सामना आयोजित केल्याबद्दलही लवादानं संबंधित अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.  

****

कोट्यावधी रुपयाचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण  करण्यासाठीच्या खटल्याच्या सुनावणीला केंद्रीय अन्वेषण विभागाचं विशेष पथक आज उपस्थित राहणार आहे. लंडन इथल्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा खटला चालवला जाणार आहे. या खटल्यात ब्रिटन सरकारची क्राऊन प्रोझिक्युशन सर्व्हिस भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणार आहे. बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून मार्च २०१६ मध्ये इंगलंडला पळून गेलेल्या मल्ल्यावर भारतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नव्यानं स्थापन केलेल्या पंधारव्या वित्त आयोगाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. माजी खासदार एन के सिंग या आयोगाचे अध्यक्ष आहेत. हा आयोग एक एप्रिल २०२० पासून पुढच्या पाच वर्षासाठीच्या शिफारशी देणार आहे. केंद्र आणि राज्यांदरम्यान असलेल्या कराच्या भागीदारीवरही आयोग सूचना देणार असून, वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केल्यानंतर त्याच्या परिणामाचा अभ्यासही करणार आहे. २० ऑक्टोबर २०१९ पर्यंत आयोग आपला अहवाल सादर करणार आहे.

****

जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या दीपिका कुमारीनं कांस्य पदक पटकावलं आहे. बँकॉक इथं झालेल्या या स्पर्धेत तृतीय मानांकित दीपिकानं रशियाच्या खेळाडूचा ७ - ३ असा पराभव केला. द्वितीय मानांकित असलेली कोरियाची किम सुरीन हिनं दीपिकाचा ६-५ असा पराभव केल्यानं दीपिकाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

ओडीशातल्या भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या हॉकी विश्व लीगच्या अंतिम स्पर्धेमध्ये आज भारताचा सामना जर्मनीशी होणार आहे. याआधी पूल बीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सामना एक एकनं बरोबरीत सुटला. त्यानंतर इंग्लंडबरोबर झालेल्या सामन्यात भारताला तीन - दोन असा पराभव पत्करावा लागला होता.

****

जानेवारी २०१८ मध्ये न्यूझीलंड इथं होणाऱ्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मुंबईचा पृथ्वी शॉ भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ही स्पर्धा १३ जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

*****


No comments: