आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०५ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
ओखी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्या लगत आलं
असून, कोकणासह उत्तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली.हे वादळ
सुरतच्या दिशेनं जात आहे.त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे.नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातली ढगाळ वातावरण आहे.
****
सोनं किंवा अंमली
पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नवीन प्रभावी उपाय शोधून काढावे असं आवाहन
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महसूल गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना केलं आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या हीरक
महोत्सवानिमित्त काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बनावट नोटा, वन्य
प्राण्यांची किंवा त्यांच्या अवयवांची तस्करी, वन्य जीवन
आणि पर्यावरणाला घातक कारवाया असे अपप्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, तसंच बदलत्या आर्थिक स्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे, असं ते
म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरूम बाजार समितीचं
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं रद्दबातल ठरवला आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं बाजार समितीचा
कारभार पुन्हा संचालक मंडळाकडे सोपण्याचे निर्देश दिले आहेत.
****
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरात पोलिसांनी केलेल्या
कथित मारहाणीचा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल आंदोलन करून निषेध करण्यात
आला. औरंगाबाद इथंही जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करून या घटनेचा निषेध
करण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या
शिऊर इथं दोन ट्रकची समोरासमोर धडक होउन तीन जण ठार तर एक जण जखमी झाला.काल रात्री
हा अपघात झाला.पैठण इथं दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर २ जण जखमी
झाले.पैठण पाचोड रस्त्यावर काल दुपारी हा अपघात घडला.
****
वाहनधारकांना आता फिटनेस
सर्टिफिकेट अर्थात वाहन योग्यता प्रमाणपत्र कोणत्याही प्रादेशिक परिवहन
कार्यालयातून घेता येणार आहे. वाहनाची नोंदणी ज्या कार्यालयात केली तिथूनच योग्यता
प्रमाणपत्र मिळवण्याची अट शिथील करण्याचा निर्णय परिवहन खात्यानं घेतला असल्याची
माहिती, परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी काल मुंबईत दिली.
****
No comments:
Post a Comment