Wednesday, 13 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.12.2017 06.50AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.
****

** शेतकरी कर्जमाफीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज ठप्प
** नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा काँग्रेसचा आरोप तर संपूर्ण कर्जमाफी देईपर्यंत सरकारशी असहकार पुकारण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनतेला आवाहन
** गोसेखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणी २० जणांविरूद्ध गुन्हे दाखल
** राज्यातल्या ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग
आणि
** भारत -श्रीलंकेदरम्यान आज मोहालीत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज काल दुपारपूर्वीच दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधीमंडळात कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करत अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज सुरवातीला तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.
विधानपरिषदेतही कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचं कामकाज लोकशाही मार्गानं चाललं पाहिजे असं सांगत, कामकाज सुरू करण्याचं आवाहन केलं. या गोंधळातच "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान" कर्जमाफीच्या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या २०१७-१८ च्या २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि अन्य कागदपत्रं सभागृहासमोर मांडण्यात आली. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. नागपूर इथं काल काँग्रेसच्यावतीनं जनआक्रोश मोर्चा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. दीक्षाभूमी इथून निघालेल्या या मोर्चाचं मॉरिस कॉलेज चौकात जाहीर सभेत रूपांतर झालं, या सभेला संबोधित करताना, आझाद यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफी देत नाही तोपर्यंत राज्यातल्या जनतेनं सरकारशी असहकार पुकारावा. आणि सरकारचं कुठलंही देणं देऊ नये असं आवाहन केलं आहे. यावेळी रिपब्लीकन पार्टी कवाडे गटाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते. जनसामान्यांचा आक्रोश बुलंद करण्यासाठी हा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला असल्याचं, अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्याप्रकरणी काल नागपूर इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं २० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. यात तत्कालीन मुख्य अभियंता आणि अधिकारी, तसंच भागीदार असलेल्या कंत्राटदारांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या या सिंचन घोटाळ्यात निविदा प्रक्रियेत आणि  कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
*****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातल्या ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये मराठावाड्यातल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ७९ हजार २६ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. या कर्जापोटी ३०१ कोटी ७० लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण ९ हजार चारशे १० शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी ८५ लाख रुपये,  नांदेड जिल्ह्यात एकूण ८३ हजार ९५० शेतकऱ्यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३४ हजार ५९९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १७५ कोटी १० लाख रुपये राज्य सरकारनं जमा केले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या ५३ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रूपये तर जालना जिल्ह्यातल्या एक लाख २२ हजार ६१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६५७ कोटी ३९ लाख ५१ हजार रूपये कर्जमाफीपोटी जमा करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २०५ कोटी ७० लाख रुपये जमा करण्यात आले असून बीड जिल्ह्यातल्या  ७५ हजार ९०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे ३४ कोटी ४७ लाख रुपये जमा करण्यात आल्या सरकारी सूत्रानं सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातल्या १० नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतींचा यात समावेश आहे. बीडमधल्या अंबाजोगाई आणि परभणीतल्या जिंतूर नगरपरिषदेच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होणार आहे. दरम्यान, मतदान होत असलेल्या सर्व ठिकाणी आज सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतमोजणी उद्या होणार आहे.
*****
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. या मशीनद्वारे आधारकार्डच्या क्रमांकाच्या आधारे धान्य वाटप करण्यात येते. यामुळे झालेल्या लाभाबद्दल औरंगाबाद शहरातल्या सिडको एन ६ संभाजी कॉलनी इथल्या रहिवासी अर्चना ठाकूर सांगताहेत ..
मेरा नाम अर्चना नरेंद्रसिंग ठाकूर में औरंगाबाद एन ६ सिडको की रहीवासी हूं.हमारे राशनकार्ड पे जो राशन मिलता था.अभी हमारे को मशिन आनेसे बहोत फायदा हुआ है. क्यूंकी अब जिसके नाम पे राशन कार्ड है उनको राशन बराबर मिलता.पहले कैसा था के लोग बोलते थे के आज आएंगा कल आएंगा.अब हमें महिने के महिने को बराबर राशन मिलता.वो मशिनसे हमको फायदा हुआं है.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात बनेगाव पाटीजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही कार जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरहून नांदेडकडे जात असताना, ही दुर्घटना घडली.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पंजाबमध्ये मोहाली इथं होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता सामन्याला सुरुवात होईल. धरमशाला इथं झालेला पहिला सामना सात गडी राखून जिंकल्यानं श्रीलंका मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
परभणी महानगरपालिकेकडून होणारी स्थानिक संस्था कर वसुली, मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना येणाऱ्या नोटिसा तसंच, वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना शेतीत येणाऱ्या अडचणींच्या विरोधात येत्या १९ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार असल्याचं खासदार संजय जाधव यांनी सांगितलं. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी, व्यापारी तसंच सामान्य नागरिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्यांना तोंड देत असल्यानं हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाधव म्हणाले.
****
उस्मानाबाद शहरात काल सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला. या आवाजामुळे इमारतीच्या खिडक्यांची तावदानं हादरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती काल गोपीनाथ गड इथं साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी कारखाना दुर्घटनेतल्या मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जयंती निमित्त नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
****
शेतकरी संघटनेचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष तसंच राष्ट्र सेवा दल सैनिक रवि देवांग यांचं काल शेगाव इथं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शेगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले असता काल देवांग यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर आज देवपूर, धुळे इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
*****

No comments: