Saturday, 16 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासंदर्भातल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

** संसदेच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ; पहिल्याच दिवशी विविध मुद्यांवरून राज्यसभेत गदारोळ

** कापसावरच्या बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करण्याचं कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आश्वासन

आणि

** येत्या २४ आणि २५ डिसेंबरला अंबाजोगाई इथं मराठवाडा साहित्य सम्मेलन

****

तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासंदर्भातल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळानं, २००० रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर लागणारं शुल्क - एमडीआरची भरपाई सरकार करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर आलेल्या नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर तीन आजी आणि सात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करुन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज सोमवार पर्यंत स्थगित केलं.

राज्यसभेतही पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि पक्षाचे नेते अली अन्वर यांना पक्षानं पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरुन अपात्र घोषित केल्यानंतर त्यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द केल्याचं सांगितलं. या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यामुळे सभापतींनी कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा आरोप केल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत काल विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे कामकाज वारंवार तहकुब करावं लागलं. दुपारी अडीच वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली, मात्र उपसभापती पी जे कुरीयन यांनी ती मान्य न केल्यानं काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

****

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशमधल्या कापूस पिकावर बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल विधानसभेत केली. कापूस बियाणे विक्री केलेल्या कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई वसूल केली जाईल आणि अशा कंपन्यांवर धाडी टाकल्या जातील असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी, बोंडअळी बाधीत झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, तर धानावर तुडतड्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

****

शिवजयंती दोनदा साजरी होण्याच्या मुद्यावरुन विधानसभेत काल विरोधकांनी गदारोळ केला. सरकारतर्फे शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते, मात्र महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी लाऊन धरली. यावरुन विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली.

****

मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य सुविधा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असून त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य शरद रणपीसे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

येत्या २४ आणि २५ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं होणाऱ्या एकोणचाळीसाव्या मराठवाडा साहित्य सम्मेलनाचं उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, असं स्वागतअध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, खासदार रजनीताई पाटील, पद्मश्री ना. धो.महानोर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल, असं देशमुख यांनी सांगितलं.

****

महिलांच्या मानवाधिकारासाठी सद्य:स्थितीत खूप आव्हानं असली तरी आज महिला आपल्या मानवाधिकारासाठी संघर्ष करत  असल्याचं समाजसेविका रझिया पटेल यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं ‘मानवी हक्क आणि महिला’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. देशात सर्वच जाती धर्माच्या स्त्रियांना न्याय देणारे कायदे निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अश्या सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. जालना इथं आयोजित तीन दिवसीय ‘रोटरी जालना एक्स्पो २०१७’चं उद्घाटन काल खोतकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालन्यात राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणीची स्थानिक उद्योजकांची मागणी असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव सादर केल्यास मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईलं, अशी ग्वाही खोतकर यांनी यावेळी दिली.

****

उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं आयोजित ‘राज्यस्तरीय अंधकल्याण शैक्षणिक सप्ताहा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,आणि  राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ बारड यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या २२ अंध शांळांमधले ३०० विद्यार्थी या सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यानिमित्त आज उस्मानाबाद इथं अंधांच्या क्षमतांची प्रात्यक्षिकं दाखवणारी जनजागृती फेरी काढली जाणार आहे.

****

आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी…..



मी दिनेश जगंनाथ वाघ.राहणार साकली रोड धुळे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी  साहेबांनी अपंगांना दिव्यांग हे नाव देणे व त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून दिव्यांग्यांचे नवे बायोमेट्रिक आयडी युनिक कार्ड तयार करणे. हि आम्हा अंपंगासाठी खुप फायदेशीर  गोष्ट आहे. पुर्वी हे आमचे अपंग ओळखपत्र महाराष्ट्रा पुरते मर्यादित होते.आता युनिक कार्ड मुळे अम्हा अपंगाना संपूर्ण देशात अपंगत्वाचे लाभ घेणे सोपे होईल. शासकिय कार्यालय, रेल्वे स्टेशन, अशा अनेक सार्वजनिक स्थानी अपंगाना रेम्प ,व्हिल चेयर, ब्यॉटरी चलीत वाहणे लिफ्ट, स्वतंत्र स्वच्छतालय उभारली जात आहेत. वर्तमान सरकारच्या नव्या धोरणा मुळेच हा बदल होत आहे. नविन अपंग कायद्या मुळे दिव्यांग व्यक्तीचे जिवन अधिक सुखकारक होईल. व कोणीही दिव्यांग लाभापासून वंचीत राहणार नाही.या सर्व बदला बद्दल आम्ही दिव्यांग नागरीक भारतसरकारचे रुणी आहोत. धन्यवाद जय हिंन्द, जय भारत.



****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथली यात्रा आजपासून सुरु होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल ग्राहक जागरण पंधरवाड्यानिमित्त विद्यार्थी ग्राहक रॅली काढण्यात आली. तहसिलदार महेश सावंत यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना ग्राहक कायद्याचं ज्ञान मिळणं आवश्यक असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथं होणाऱ्या बालमहोत्सवाचं उदघाटन आज राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातल्या अनाथ तसंच दिव्यांग बालकांसाठी विविध स्पर्धा होणार आहेत.

****

नाशिकमधल्या चांदवड इथं मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी शस्रास्रांचा मोठा साठा काल जप्त केला असून याप्रकरणी, तिघांना अटक करण्यात आली आहे. २५ बंदुका १९ रिव्हॉल्वर्स आणि ४ हजार १४० जिवंत काडतुसं या तिघांकडून जप्त करण्यात आल्याचं नाशिक ग्रामीण पोलिसांनी सांगितलं.

*****


No comments: