Saturday, 16 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६  डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोराम राज्यातल्या ऐझवाल इथं ६० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचं राष्ट्रार्पण केलं. पंतप्रधान मिझोराम आणि मेघायलच्या दौऱ्यावर असून, ते याठिकाणी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत.

****

   १९७१ च्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचं स्मरण करण्यासाठी आज देशभर विजय दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्तानं देशभर होणाऱ्या कार्यक्रमांत या युद्धात सहभागी झालेले अनेक माजी लष्करी अधिकारी आणि जवान सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक विजयाला यावर्षी ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. १९७१ मध्ये आजच्या दिवशीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.ए.ए. के नियाझी यांनी ९३ हजार सैनिकांसह लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यदलासमोर शरणागती पत्करली होती.

****

   राहुल गांधी आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राहुल गांधी यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ते पक्षाचे एकोणिसावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती त्यांना अध्यक्षपदाचं औपचारिक प्रमाणपत्र देणार आहे.

****

    देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काही इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दूरदर्शन संच, भ्रमणध्वनी, प्रोजेक्टर, हीटर आदी वस्तुंचा समावेश आहे. सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. दूरदर्शन संचावर आकारलं जाणारं सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन १५ टक्के, प्रोजेक्टरवरचं सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन २० टक्के, भ्रमणध्वनीवरचं सीमा शुल्क १५ टक्के वाढवण्यात आलं आहे.

****

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल ग्राहक जागरण पंधरवाड्यानिमित्त विद्यार्थी ग्राहक रॅली काढण्यात आली. तहसिलदार महेश सावंत यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना ग्राहक कायद्याचं ज्ञान मिळणं आवश्यक असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं.

*****










No comments: